लोकसत्ता बदलता महाराष्ट्र विचार सोहळ्यातील ‘प्रशासनातील ती’ सत्रामध्ये स्त्री क्षमतेच्या विजयाचा सत्कार
प्रशासनात महिला आली तेव्हा तिला हे जमेल का, या साशंक नजरेनेच पाहिले गेले. परंतु तिने जेव्हा दिलेली जबाबदारी आत्मविश्वासाने पार पाडली तेव्हा हेच नकारात्मक चेहरे खंबीरपणे मागे उभे राहिले. प्रायोगिक चाचणी म्हणून यशस्वी होण्याची जबाबदारी आमच्यावर होती आणि त्यात आम्ही यशस्वी झालो तेव्हा समस्त महिलावर्गाचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे भान होते, असा सूर ‘प्रशासनातील ‘ती’’ या परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. वसुधा कामत, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर आणि ओएनजीसीतील अग्निशमन अभियंता हर्षिणी कान्हेकर या परिसंवादात सहभागी झाल्या होत्या. घरची मंडळी खंबीरपणे पाठीशी उभी राहिल्यामुळे महत्त्वाच्या पदांची जबाबदारी स्वीकारताना न्याय देता आला, असे मतही या वक्त्यांनी व्यक्त केले. या सत्राचे सूत्रसंचालन आरती कदम यांनी केले.

पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत महिलांच्या बाबतीत आजही ‘तिला हे जमेल का’ असा प्रश्न उपस्थित करून समाज आणि वरिष्ठांकडून एक प्रकारे अदृश्य परीक्षा घेतली जाते. त्यात एकदा उत्तीर्ण झालो की, हीच मंडळी तुमच्या पाठीशी उभी राहतात.
– मनीषा म्हैसकर, प्रधान सचिव (नगरविकास)

प्रशासनात खरोखरच ‘ती’ आहे का? प्रशासनातील विविध महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्यासाठी जी समिती नेमण्यात येते त्यात पुरुषांचे वर्चस्व असते. ते महिलांना पुढेच येऊ देत नाहीत. महिलांवर जबाबदारी देऊन तरी पाहा ना. तिला स्वत:ला सिद्ध करू दे.
– डॉ. वसुधा कामत, कुलगुरू, एसएनडीटी महिला विद्यापीठ

उपअधीक्षक परीक्षेत तू पहिली आली आहेस, त्यामुळे आता तू नाही गेलीस तर समाजात चुकीचा संदेश जाईल, असे पतीचे मत होते. त्यानंतर आतापर्यंत ४० महिला अधिकारी या खात्यात आल्या आहेत.
– डॉ. रश्मी करंदीकर, उपायुक्त, ठाणे वाहतूक पोलीस

अग्निशमन अभियंता होताना अगदी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यापासून ते प्रत्यक्ष अधिकारी होईपर्यंत पदोपदी परीक्षा द्यावी लागली. मात्र कुठेच कच खाल्ली नाही वा हार पत्करली नाही.
– हर्षिणी कान्हेकर, अग्निशमन अभियंता, ओएनजीसी