स्त्री-पुरुष समानतेच्या पलीकडे जात स्वत्वाचा शोध घेणाऱ्या स्त्रीचे विश्व अंतर्बाहय़ बदलले आहे. बाहेरच्या जगात आपल्या आवडीच्या क्षेत्रात पाय रोवून उभी राहणारी आणि त्याच वेळी आपले कौटुंबिक विश्वही तितक्याच सहजतेने सांभाळणाऱ्या स्त्रीच्या आधुनिकता आणि  नव्या विचारांच्या व्याख्येने कात टाकली  आहे. तिच्या या बदलत्या रूपाचा आढावा ‘लोकसत्ता’ आयोजित ‘कर्ती आणि करविती’ या उपक्रमाच्या व्यासपीठावरून घेतला जाणार आहे.

प्रशासनातील अधिकारी पदापासून फॅ शन, जाहिरातीसारख्या सर्जनशील क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांना भेटण्याची आणि त्यांच्याकडून स्त्रीच्या या बदलत्या जगाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न ९ आणि १० मार्च रोजी होत असलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या आठव्या पर्वात घेतला जाणार आहे. स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि त्यावर त्यांनी शोधलेली सडेतोड उत्तरे हे जाणून घेणाऱ्या या पर्वातील ‘कर्ती आणि करविती’ या परिषदेचे उद्घाटन अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या हस्ते होणार आहे. तर सामाजिक चळवळीतून विस्थापित समाजाला पुन्हा उभे करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांच्या हस्ते या परिषदेचा समारोप होणार आहे.

शिक्षणाच्या बळावर खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेल्या आणि समाजात स्वकर्तृत्वाने बदलाचे आदर्श घालून देणाऱ्या या स्त्रियांचा त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन कसा आहे? पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून वेगाने प्रत्येक क्षेत्रात पुढे जाणाऱ्या या स्त्रियांनी आपल्या वाटेवरचे अडथळे पार करून समाजात एक उंची गाठली आहे. त्यांच्या या प्रवासातील अडथळे, आपापल्या क्षेत्रातील उंची गाठल्यानंतरही आपल्या यशातले सातत्य कायम राखण्याचा त्यांचा हा प्रवास त्यांच्या आयुष्यात अनेक आठवणींची, अनुभवांची आणि सतत बदलत्या विचारांची शिदोरी देऊन जातो. त्यांच्या या शिदोरीतील अनमोल क्षण दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांच्या माध्यमातून वेचता येणार आहेत.

याआधी शिक्षण, उद्योग, अर्धनागरीकरण, सामाजिक चळवळी, शेती, पर्यावरण आणि पायाभूत सुविधातील बदलांचा मागोवा ‘बदलता महाराष्ट्र’च्या व्यासपीठावरून घेतला गेला आहे. जागतिक महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर या बदलत्या स्त्री-रूपाची कथा नव्याने या परिषदेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल.

‘बदलता महाराष्ट्र’मध्ये ‘कर्ती आणि करविती’

टीजेएसबी सहकारी बँक लि. प्रस्तुत लोकसत्ता बदलता महाराष्ट्र, सहप्रायोजक एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर्स डेव्हलपर्स लि., टेलिव्हिजन पार्टनर ‘झी २४ तास’.