‘देशातील प्रत्येक क्षेत्रात बदल होत असला तरी माध्यमे बदलास तयार नाहीत,’ अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या या वक्तव्याचा समाचार घेणाऱ्या ‘अजून येतो वास फुलांना’ या अग्रलेखावर  आपले मत मांडणारा पुण्यातील ‘डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड सायन्स’चा विद्यार्थी रोहन सपकळ ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाचा विजेता ठरला; तर या स्पर्धेत पुणे विद्यापीठातील ‘डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड सायन्स’चा विद्यार्थी प्रशांत हाके याने दुसरे पारितोषिक पटकावले आहे.

‘अजून येतो वास फुलांना’ अग्रलेखावर मत मांडणाऱ्या रोहन आणि प्रशांत यांनी चांगले लेखन करीत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. रोहन यास सात हजार आणि प्रमाणपत्र तर प्रशांत यास पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.

या अग्रलेखावर व्यक्त होताना अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारी वृत्तीला चालना देत लेखन केले आहे. राज्यातील बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत सहभाग वाढत आहे.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकांची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला लाभले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.