‘लोकसत्ता’च्या ‘समलिंगी समानता’ या अग्रलेखावर आपली स्पष्ट भूमिका मांडणारा अमरावतीचा पीयूष देशपांडे ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला आहे. तर कल्याणचा प्रणव आगाशे याने दुसरे पारितोषिक पटकावले आहे.

Untitled-18
पीयूष अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. त्याने पहिल्या क्रमांकाचे सात हजार रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. तर प्रणव हा कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याने पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळविले आहे. बक्षिसाच्या रकमेबरोबरच या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
सामलिंगी संबंधांच्या संदर्भात लैंगिकतेसंबंधीचा कायद्याचा पुनर्विचार करण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायमूर्तीचे खंडपीठ नेमण्याचे आदेश दिले. समलिंगी संबंधांच्या संदर्भात सनातन्यांच्या बुरसटलेल्या भूमिकेवर तुटून पडणाऱ्या ‘लोकसत्ता’त ३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘समलिंगी समानता’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉगबेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे होते. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत पाच आठवडय़ाचे विजेते घोषित करण्यात आले आहेत. आर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, नवउद्यम या विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.
या स्पर्धेत प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षक तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला दिले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.