प. बंगालात बालमृत्यू झाले तेव्हा ममतांच्या राजीनाम्याची मागणी करणारे भाजप नेते गोरखपूरमधील बालमृत्यूंबाबत मात्र शांत बसतात. आजपासून सहा वर्षांपूर्वी, २०११ सालच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कोलकाता येथील बी. सी. रॉय बाल रुग्णालयात पंधरवडय़ात जवळपास ५० अर्भके दगावली. यातील डझनभर बालकांचे मृत्यू केवळ डेटॉलच्या ऐवजी काबरेलिक अ‍ॅसिडसारखे रसायन वापरण्याचा बेजबाबदारपणा रुग्णालयाने दाखवला म्हणून झाले. त्या वेळी विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरला आणि या निर्घृण अनास्थेबद्दल प्रशासनावर सडकून टीका केली. त्या वेळी या प्रशासनाच्या प्रमुख होत्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. त्या वेळी केंद्रात आणि अर्थातच प. बंगालात सत्तेबाहेर असलेल्या भाजपने बॅनर्जी यांना लक्ष्य केले. तेव्हा मुद्दा असा की ५० बालकांच्या निधनावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राजीनामा मागणाऱ्या भाजपने ६० बालकांच्या मृत्यूंसाठी आपल्याच मुख्यमंत्र्याचा राजीनामा का घेऊ  नये? स्वच्छतेची सुरुवात स्वत:पासून होते असे म्हणतात आणि सध्या तर देशात स्वच्छता अभियानच सुरू आहे. तेव्हा ही प्रशासकीय स्वच्छता सुरुवात आपल्याच पक्षापासून करण्याची हिंमत भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार का? असे मत ‘योगिक बालकांड’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयाची विद्यार्थिनी शंृखला कदम ही ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरली आहे. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी सुनील जमालने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या शृंखलाआणि सुनील यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. शृंखलाला सात हजार आणि प्रमाणपत्र तर सुनीलला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers  या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.