|| समीक कर्णुक

माहुलमधील पालिकेच्या २०० घरांची परस्पर विक्री; आणखी बडे मासे लवकरच अडकणार

प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या माहुलमधील २०० हून अधिक घरांची परस्पर विक्री करणाऱ्या मुख्य आरोपीला तब्बल तीन महिन्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

काही माफियांनी परस्पर या घरांची विक्री केली होती. खरेदीदारांची व पालिकेला कोटय़वधींचा गंडा घालणाऱ्या या प्रकरणाला ‘लोकसत्ता’ने १ मे, २०१८ला लोकसत्ता मुंबईत वृत्त छापून वाचा फोडली होती. त्यानंतर आरसीएफ पोलिसांनी यात गुन्हा दाखल करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. यामध्ये आणखी काहींचा समावेश असल्याने त्यांना देखील लवकरच अटक होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शहरातील नाले, रस्ते, रेल्वे आणि इतर प्रकल्पांमध्ये बाधीत होणाऱ्या झोपडीधारकांसाठी चेंबूरच्या माहुल परिसरात पालिकेच्या ४६ इमारती असून यामध्ये साडेबारा हजार घरे आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून यातील अनेक इमारती या रिकाम्याच होत्या. याचाच फायदा घेत याच परिसरात राहणाऱ्या काही माफियांनी पालिकेच्या एम पश्चिम कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरत या घरांची तीन वर्षांपूर्वी परस्पर  विक्री सुरु केली. सात ते आठ लाखात चेंबूरमध्ये घर मिळत असल्याने अनेक गरीब लोकांनी कर्जबाजारी होऊन याठिकाणी आपल्या घरांचे स्वप्न पूर्ण केले. मात्र पालिकेच्या मुख्य कार्यालयाला याची माहिती मिळताच त्यांनी घुसखोरी केलेल्या या सर्वाना सहा महिन्यांपूर्वी बाहेर काढले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या कुटुंबियांनी अनेकदा पालिका आणि पोलिसांकडे याबाबत लेखी तक्रारी दाखल केल्या. मात्र पालिका आणि पोलिसांकडूनदेखील या माफियांवर काहीही कारवाई केली जात नव्हती. अखेर ‘लोकसत्ता’ने या गरीब रहिवाशांच्या व्यथेला वाचा फोडली. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या पोलिसांनी १७ एप्रिलला प्रकाश जाधव यांच्या तक्रारीच्या आधारे सुरेशकुमार दास आणि नझीर शेख या दोघांवर गुन्हे दाखल केले. गुन्हा दाखल होताच हे दोन्ही आरोपी पसार झाले होते. मात्र आरसीएफ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांनी या आरोपींवर अनेक दिवस पाळत ठेवून अखेर सुरेशकुमार दास या मुख्य आरोपीला आठ दिवसांपूर्वी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून पोलीस त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत.

फसवणूक झालेल्या अनेक गरीब लोकांकडून या माफियांनी सात ते आठ लाख रुपये उकळले होते. त्यामुळे ही फसवणूक करोडो रुपयांच्या घरात आहे. पालिकेच्या एम पश्चिम वार्डातील काही अधिकाऱ्यांच्या सहमतीने या माफियांनी बनावट कागदपत्रे तयार केले होते. त्यामुळे त्यांचा देखील यामध्ये मोठा वाटा आहे. याची सर्व कल्पना पालिकेला आहे. मात्र अद्यापही पालिकेने या अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावरदेखील कडक कारवाई करण्यात यावी अशी तक्रारदारांची मागणी आहे.

‘फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे’

मुंबईबाहेर राहणाऱ्या अनेकांनी चेंबूरमध्ये स्वस्तात घर मिळत असल्याने याठिकाणी घरांसाठी पैसे भरले होते. मात्र पालिकेने या सर्वाना बाहेर काढल्यानंतर यातील अनेकजण गावी अथवा पुन्हा मुंबईबाहेर गेले आहेत. त्यामुळे ज्यांची अशाप्रकारे फसवणूक झाली आहे, त्यांनी आरसीएफ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे अवाहन आरसीएफ पोलिसांकडून करण्यात येत आहे.