मंत्र्यांनाच धाडलेल्या ई-मेलमुळे घोटाळा उघड

रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवत अनेक तरुणांची फसवणूक करणाऱ्या दोन भामटय़ांना माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी (एमआरए मार्ग) अटक केली. प्राथमिक चौकशीत मुंबईसह राज्यातील तरुणांकडून या दोघांनी सुमारे ९० लाख उकळल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, ही कारवाई खुद्द रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या तक्रारीवरून करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीनेच गोयल यांना ई-मेल धाडून या फसवणुकीची माहिती दिली होती.

मनजीतसिंग चिलोत्रा  आणि रूफसान डाबरे अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी मनजीत दिल्लीचा रहिवासी असून गुंतवणूक दलाल आहे. मनजीतने रेल्वे भरतीतील उमेदवारांना फसवण्याची योजना आखली. त्याने राज्याच्या विविध भागांतील ओळखीच्या दलालांना विश्वासात घेत योजना सांगितली. या भरतीत रेल्वेमंत्री गोयल यांचा एक कोटा आहे. त्यातून हमखास नोकरी मिळवून देतो, असे मनजीत आणि त्याचे साथीदार उमेदवारांना सांगू लागले. या कामासाठी प्रत्येकाकडून त्यांनी पाच ते सहा लाख रुपये स्वीकारले. दरम्यान, पैसे दिलेल्या उमेदवारांनी काम कधी होणार, असा तगादा या दलालांमागे लावला.

त्यातच डाबरेने फसवणुकीचा संपूर्ण तपशील लिहिलेला ई-मेल गोयल यांना धाडला. तो गोयल यांनी वाचला आणि सचिव प्रवीण गेडाम यांच्या करवी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव कांबळे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून डाबरे, चिलोत्रे  यांना अटक केली. तर अन्य दलालांचा शोध सुरू केला.