चौकशीदरम्यान पळाल्याचा पालघर पोलिसांचा दावा

शिकारीची बंदूक बाळगल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आदिवासी तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईक आणि आदिवासी संघटनांनी केला आहे.

पालघर तालुक्यातील कोकणेर ग्रामपंचायत हद्दीतील राइपाडा या आदिवासी पाडय़ातील नरेश पागी या तरुणाकडे गावठी बनावटीची बंदूक असल्याचा पोलिसांना संशय होता. पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी १९ ऑक्टोबरला त्याच्या घरची झडती घेऊन २० ऑक्टोबरला त्याला ताब्यात घेतले होते. बोईसर येथील चौकीवर त्याची काही तास कसून चौकशी करण्यात आली. त्या दरम्यान त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. चौकशीकरिता नेताना नरेश हा गुंदले येथून पोलिसांच्या ताब्यातून निसटून पळाला, असा दावा पोलिसांनी केला आहे. रविवारी सकाळी नरेशचा मृतदेह राईपाडा येथील त्याच्या शेताजवळील जंगलात दिसून आला.

याबाबत पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांनी सांगितले की, नातेवाईकांनी केलेले आरोप पाहता या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येईल. नरेशच्या शवविच्छेदन अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

कोणाचीही परवानगी न घेता पोलिसांनी घरात शिरून झडती घेतली होती, असे नरेशच्या पत्नीने ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. शनिवारी नरेश आपला मामा रघुनाथ व लहान भाऊ कैलास याला घेऊन बोईसर येथील पोलीस ठाण्यात पोचला. तिथे पोलिसांनी नरेश याला ताब्यात घेऊन एका खोलीत डांबून ठेवले. नंतर त्याला पोलिसांनी गाडीत बसवून चौकशीसाठी त्याच्या मामाच्या गावी गुंदले येथे नेले, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

तीन महिन्यांपूर्वी नरेशचा चुलतभाऊ व त्याच्या पत्नीचे भांडण झाले होते. पोलिसांनी त्याला चौकीत बोलावून खूप मारहाण केल्याने त्यानेही नरेशचा जेथे मृतदेह आढळला, त्याच भागात आत्महत्या केली होती.

कोणतीही कागदपत्रे वाचून न दाखवता पोलिसांनी माझ्या आणि नरेशच्या भावाच्या सह्या घेऊन आम्हाला सोडले. मात्र दुसऱ्या दिवशी तो झाडाला लटकला असल्याचे कळल्याने आम्हाला धक्काच बसला. पोलिसांच्या दबावाला घाबरून नरेशने जीवन संपविले.     – रघुनाथ पालवा, नरेशचे मामा