फसव्या ‘डेटिंग अ‍ॅप’च्या माध्यमातून एका तरुणीसोबत मैत्री, वर्षभर ‘डेट’ करण्याच्या आमिषाला भुललेल्या एका सेवानिवृत्त वृद्धाने तब्बल ४६ लाख रुपये भामटय़ांनी सुचविलेल्या विविध बँक खात्यांवर भरले. इतके पैसे भरूनही इच्छा पूर्ण न झाल्याने भानावर आलेल्या या वृद्धाने अखेर कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली.

गोरेगाव पूर्व भागात राहणाऱ्या एका वृद्धाला गेल्या वर्षी मे महिन्यात भ्रमणध्वनीवर डेटिंग अ‍ॅपची माहिती मिळाली. ‘गर्ल्स फॉर डेट’ अशी जाहिरात पाहून त्या वृद्धाने ऑनलाइन पैसे भरून नोंदणी केली. त्यानंतर एका महिलेने वृद्धाशी संपर्क साधला आणि तीन तरुणींची छायाचित्रे पाठवली. त्यांपैकी एका तरुणीची निवड मैत्रीसाठी केली. या तरुणीनेही वृद्धाशी संपर्क साधला. मधाळ बोलण्यात गुंतवून वर्षभर भेटण्यासाठी तसेच प्रोफाइल व्हेरिफिकेशन, प्रीमियम मेंबरशिप यासाठी त्या वृद्धाकडून ४६ लाख रुपये उकळले. हे सर्व व्यवहार ऑनलाइन झाले. इतके पैसे भरूनही तरुणीशी भेट होत नाही, हे लक्षात येताच वृद्धाने संबंधित अ‍ॅपबाबत चौकशी केली तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने संबंधित महिलेकडे सेवा रद्द करून भरलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. पैसे परत करण्यासाठी आणखी रक्कम भरावी लागेल, असे त्या महिलेने वृद्धाला सांगितले. शेवटी त्याने पोलीस ठाणे गाठल्याची माहिती  वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांनी दिली.