दोन तरुणांवर चेंबूरच्या हुक्का पार्लरमध्ये गोळीबार

आपल्या अस्तित्वाची, प्रत्येक हालचालीची माहिती सातत्याने समाजमाध्यमांवरून जगाला कळवणे किती धोकादायक बनू शकते याचा अनुभव सायन कोळीवाडय़ात राहणाऱ्या दोन तरुणांनी गुरुवारी मध्यरात्री घेतला. वाढदिवस सोहळा साजरा करण्यासाठी चेंबूरच्या ‘ऑरेंज मिंट कॅफे’त आहोत, अशी माहिती देणारी छायाचित्रे दोघांनी समाजमाध्यमांवर दिली. ती पाहून नवी मुंबईतून त्या हॉटेलमध्ये धडकलेल्या अन्य एका तरुणाने दोघांवर गोळीबार केला. मात्र ते थोडक्यात बचावले.

राकेश सोनवणे आणि श्वेता पांडे अशी गोळीबारातून बचावलेल्यांची नावे आहेत. तर जतीन आहुजा (३५) असे गोळ्या झाडणाऱ्याचे नाव आहे. जतीन नवी मुंबईत वास्तव्यास असून तेथे व मुंबईत घर खरेदी-विक्री व्यवहारांमधला दलाल आहे. काही महिन्यांपूर्वी राकेशने जतीनकडून शेव्हरलेट क्रूझ कार विकत घेतली होती. दोन लाख ६० हजारांचा व्यवहार ठरला. त्यापैकी ८० हजार रुपये राकेशने दिले. उर्वरित रक्कम देण्यासाठी मात्र राकेशने चालढकल सुरू केली. गुरुवारी रात्री राकेश आणि श्वेता ऑरेंज मिंट कॅफेत एका मित्राने वाढदिवसानिमित्त आले होते. दोघांनी तेथे टिपलेली छायाचित्रे समाजमाध्यमांवर लगोलग जाहीर केली.

गोवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसक स्वभावाच्या जतीनने ही छायाचित्रे पाहिली. दारूच्या नशेतच तो प्रवीणा राठोड, राहुल भोसलेसह नवी मुंबईतून मध्यरात्री दोनच्या सुमारास ‘ऑरेंज मिंट कॅफे’जवळ पोहोचला. गाडीतून उतरताच त्याने एक गोळी हवेत झाडली. त्यानंतर कॅफेत जाऊन त्याने राकेश, श्वेताच्या रोखाने दुसरी गोळी झाडली. त्यात दोघे थोडक्यात बचावले. कसेबसे कॅफेतून बाहेर पडून दोघे पळू लागले. जतीनही त्यांच्या मागे धावू लागला. मात्र त्याच वेळी गस्तीवर असलेले गोवंडी पोलीस कॅफेबाहेर धडकले. पोलिसांना पाहून जतीन माघारी वळला. त्याने आपली पिस्तूल अश्फाक अख्तर आणि राशिद शेख या दोन साथीदारांकडे दिली आणि त्यांना तेथून पसार होण्यात मदत केली.

या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जतीनसह प्रवीणा, राहुल यांनाही ताब्यात घेण्यात आले. अश्फाक आणि राशिद या त्याच्या दोन साथीदारांना अटक केल्यानंतर त्याने गोळीबार केल्याचे कबूल केले. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून राकेश व्यवहार टाळत होता. समाजमाध्यमांवर राकेश चेंबूरमधील ‘ऑरेंज मिंट कॅफे’त आहे हे समजताच तेथे धडकल्याचेही जतीनने सांगितले. जतीनकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना नसल्याचे तपासात समोर आले आहे. हत्येचा प्रयत्न, मारहाण, सरकारी कामात अडथळा आणि अवैधपणे शस्त्र बाळगणे, असा गुन्हा जतीन आणि सहआरोपींविरोधात नोंदवून निरीक्षक पवार यांनी तपास सुरू केला आहे.

कॅफेवर याआधीही कारवाई

गोवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑरेंज मिंट कॅफे’ हुक्का पार्लर म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे वाढदिवसाच्या किंवा अन्य निमित्ताने पाटर्य़ा आयोजित केल्या जातात. नियमभंग करून बेरात्री कॅफे सुरू ठेवल्याप्रकरणी चालकांवर याआधी कारवाई करण्यात आली होती.