बेपत्ता मोलकरीण प्रमुख संशयित

वृद्ध दाम्पत्याची हत्या करून त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू चोरण्यात आल्याची धक्कादायक घटना खार परिसरात घडली. गुरुवारी सकाळी या घटनेला वाचा फुटली. नानक मखिजानी (वय ८५) आणि दया (८१) अशी या दोघांची नावे असून त्यांच्याबरोबर वास्तव्यास असलेली मोलकरीण प्रमुख संशयित आहे. तिला अटक झाल्याचे समजते.

या फरारी मोलकरणीबरोबरच तिच्या मित्रालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते. ही कारवाई रेल्वे पोलिसांच्या मदतीने पार पडली. मात्र या कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. सहआयुक्त देवेन भारती यांच्यापासून खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र जाधव यांच्यापर्यंत एकाही अधिकाऱ्याने त्याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली.

हे दाम्पत्य वास्तव्यास असलेल्या इमारतीत सीसीटीव्ही नाहीत. तसेच घरी येणाऱ्या नोकरांचे तपशीलही दाम्पत्याने पोलीस ठाण्यात दिलेले नाहीत. त्यामुळे तपासात अडथळे येत आहेत. मखिजानी दाम्पत्य खार पश्चिम येथील एकता एलीट इमारतीत वास्तव्यास होते. त्यांची दोन्ही मुले परदेशात आहेत. तीन नोकर आणि एक वाहनचालक त्यांच्या दिमतीला होते. तीन आठवडय़ांपूर्वीच त्यांनी या मोलकरणीला कामावर ठेवले होते. ती या दोघांसह याच घरात राहात होती. उर्वरित तिघे त्यांच्या ठरलेल्या वेळेत येऊन काम करून निघून जात.

गुरुवारी सकाळी नानक यांच्या घरी दुसरी मोलकरीण आली. मात्र कोणीच दार उघडले नाही. रोजचे वृत्तपत्र, दूध या वस्तूही दाराबाहेरच आढळल्या. त्यामुळे तिने शेजाऱ्यांना बोलावले. सुरक्षा रक्षकाने शिडी लावून घराच्या खिडकीतून वाकून पाहिले तेव्हा नानक आणि दया बेशुद्धावस्थेत दिसले. घरातल्या सर्व वस्तू इतस्तत: पसरल्या होत्या. अखेर पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा या दोघांची हत्या उघड झाली.

अमेरिका आणि सिंगापूर येथे वास्तव्यास असलेली त्यांची मुले मुंबईला येत आहेत. ते परतल्यानंतरच घरातून किमती वस्तू चोरीला गेल्या आहेत का, याची शहानिशा होईल, असे पोलिसांनी सांगितले.