हजारोंना फसवून आरोपींची सोने खरेदी

सेक्सोक्लब, सेक्सोडेट, इन्स्टाक्लब यासारख्या कामुक संकेतस्थळांद्वारे भुलवून तरुणांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजांआड केले आहे.  मोहम्मद शाकिब मलिक कोटवाला, गिरीश जैस्वाल, कमल सुरेश विश्वकर्मा, अर्जुन कनोजिया आणि शरीफ अफझल अहमद खान अशी या आरोपींची नावे आहेत. तरूणांकडून मिळालेल्या पैशातून ही टोळी सोने खरेदी करायची. तसेच सर्व आर्थिक व्यवहार पेटीएमद्वारे केले जात होते, अशी माहिती सायबर गुन्हे विभागाचे उपायुक्त अखिलेश सिंग यांनी दिली.

दोनेक महिन्यांपूर्वी या टोळीने सेक्सोक्लब, सक्सोडेट आणि इन्स्टाक्लब या नावाने संकेतस्थळे सुरू केली. ‘‘मुंबई आणि इतर शहरांत अनेक तरूण-तरूणी आमचे सभासद असून, आमचे सभासद व्हा’’, असे आवाहन या संकेतस्थळावरून तरूणांना करण्यात येत होते. त्यानंतर पुढे या टोळीने विविध मोबाइल क्रमांकावरून सभासदत्वासाठी आवाहन करणारे लघुसंदेश धाडण्याचा सपाटा लावला. त्यात पेटीएमद्वारे एक हजार भरून सभासद होण्याचे आवाहन तरूणांना करण्यात आले.

पैसे भरल्यानंतर आमचे अधिकारी तुम्हाला फोन करतील, क्लबची कार्यपद्धती समजावून सांगतील, असे या लघुसंदेशात नमूद होते. त्यानुसार मुंबईसह राज्यातील सुमारे दोन हजार जणांनी प्रत्येकी हजार रुपये भरले. मात्र, पैसे भरल्यानंतर टोळी बेपत्ता झाली. पैसे भरलेल्यांपैकी काहींनी पोलीस तक्रार केली. त्यानंतर वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षिका नीता फडके, साहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश गौड, फौजदार शैलेश पवार, पोलीस नाईक सुधाकर इंदप, शिपाई गणेश इंगवले या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

तपासादरम्यान, मुंबादेवीच्या दागिना बाजारातील सराफाच्या खात्यात पेटीएमद्वारे मोठय़ा प्रमाणात व्यवहार होत असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी या सराफावर पाळत ठेवली असता, एक व्यक्ती नियमितपणे त्याच्याकडे येतो आणि सोन्याची नाणी घेऊन जातो, असे समजले. पोलिसांनी या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा या टोळीचा भंडाफोड झाला.

  • घोडबंदर परिसरात या टोळीची तीन कार्यालये आहेत. कामुक संकेतस्थळासोबत डेटा एन्ट्री, घरी बसून पैसे कमवा असे आमिष दाखवून काम देण्याच्या बहाण्याने ही टोळी गरजू तरुणांकडून सुमारे पाच हजार रुपये आगाऊ घेई.
  • महिन्याभराने डेटा एन्ट्रीचे काम पूर्ण करून घेऊन आलेल्या तरुणांना काही तरी निमित्त करून काम अचूक नाही, असे सांगून परत पाठण्यात येत होते. याच तरुणांच्या कागदपत्रांचा वापर करून टोळीने अनेक सिमकार्डे विकत घेतली होती. या सिमकार्डाचा वापर लघुसंदेश धाडण्यासाठी, पेटीएमचे व्यवहार करण्यासाठी होत होता. पेटीएमच्या माध्यमातून ठरावीक रकमेचा व्यवहार झाला, की ही टोळी तो मोबाइल नंबर बंद करायची.
  • या टोळीने सर्वाकडून पैसे गोळा करून त्यातून सोने खरेदी सुरू केली होती. अटक केलेल्या सराफाकडून आतापर्यंत सुमारे २० ते २५ लाखांपर्यंत सोने खरेदी झाल्याची माहिती चौकशीतून समोर आल्याचे सांगण्यात आले.