दोन सख्ख्या बहिणींकडून पतींची हत्या

दोन सख्ख्या बहिणींनी आपापल्या पतींची निर्घृणपणे हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दोन्ही हत्या अहमदनगर, बीडमध्ये चार वर्षांच्या अंतराने घडल्या. मुंबईच्या मालवणी पोलिसांनी या हत्याकांडांची उकल केली आहे. दोन्ही हत्या विवाहबाह्य़ संबंध, चारित्र्यावरील संशयातून घडल्याची माहिती पुढे येते आहे.

चारकोप परिसरात राहाणारे निवृत्त बँक अधिकारी अशोक वानखेडे वर्षभरापासून बेपत्ता होते. ते हरविल्याची तक्रार त्यांची पत्नी आशा हिने दिली होती. खूप तपास करूनही वानखेडे यांचा शोध न लागल्याने पोलिसांनी तपास थांबवला होता. मात्र परिमंडळ ११चे उपायुक्त विक्रम देशमाने यांनी पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या तांत्रिक तपासात तक्रार देण्याआधी वानखेडे व आशा दोघेही अहमदनगरमध्ये सोबत होते, अशी माहिती समोर आली. चौकशीत मात्र आशा उडवाउडवीची उत्तरे देत होती. त्या काही तरी दडवू पाहत आहेत, असा संशय निर्माण झाल्याने फटांगरे व पथकाने त्यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली. तेव्हा विवाहित बहीण वंदना थोरवे, तिचा प्रियकर नीलेश सुपेकर यांच्या मदतीने वानखेडे यांची वर्षभरापूर्वी हत्या केल्याची कबुली अशाने दिली. आशाच्या चारित्र्यावर वानखेडे संशय घेत. त्यातून वरचेवर वाद होत. संशयी वृत्ती व सततच्या वादाला कंटाळून वानखेडेंचा काटा काढल्याचे आशाने कबूल केले. तेव्हा मालवणी पोलिसांनी आशा, वंदना व नीलेश यांना अटक केली. दरम्यान, वर्षभरापूर्वी नगरच्या पारनेर पोलिसांना अनोळखी मृतदेह सापडला होता. मृतदेहाची ओळाख न पटल्याने पारनेर पोलिसांचा तपास पुढे सरकला नव्हता. तो मृतदेह वानखेडे यांचा असल्याचे खात्री पटल्याने पारनेर पोलिसांनी आशा, वंदना, नीलेश यांचा ताबा घेत पुढील तपास सुरू केला.

आशा, वंदना यांना आणखी दोन बहिणी आहेत. या तिघींचे पती तरी जिवंत आहेत का की त्यांच्याही हत्या झाल्या याची खातरजमा करण्याचे फटांगरे व त्यांच्या पथकाने ठरवले. त्यानुसार चौकशीची सुरुवात वंदनाचे पती अशोक थोरवे यांच्यापासून झाली. मूळचे साताऱ्याचे थोरवे कामानिमित्त नगरमध्ये स्थायिक होते. पण गेल्या पाच वर्षांपासून त्यांचा ठावठिकाणा नव्हता, अशी माहिती समोर आल्याने पथकाला शंका आली. उपायुक्त देशमाने यांच्या मार्गदर्शनाखालील विविध पथके स्थापन करून सातारा, नगरमध्ये थोरवेंबाबत चौकशी सुरू झाली. त्यातच ११ नोव्हेंबर २०१२ रोजी नगर-बीड सीमेवरील अंबोरा पोलीस ठाण्यात अनोळखी मृतदेह सापडल्याची नोंद आहे, अशी माहिती या पथकाला मिळाली. या मृतदेहाची अद्यापपर्यंत ओळख न पटल्याने याही प्रकरणाचा तपास खुंटला होता. मृतदेहाचे फोटो मालवणी पोलिसांनी साताऱ्यातील थोरवे कुटुंबीयांना दाखवले. त्यांनी मृतदेह ओळखला व तो अशोक यांचा असल्याचे सांगितले. त्यानंतर नगर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या वंदनाकडे चौकशी करण्यात आली. तिने पाच वर्षांपूर्वी घटस्फोट झाल्यानंतर अशोक कुठे गेले माहीत नसल्याचे पोलिसांना सांगितले. मध्यंतरी ते कर्नाटकमध्ये असल्याची माहिती मिळाली होती, फोनही आला होता, असे सांगत तिने हत्याकांड दडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांची चौकशी फार काळ न झेलू शकल्याने तिनेही अशोक यांच्या हत्येची कबुली दिली.

आपल्या पतीची हत्या केल्यानंतर वंदनाने आशालाही वानखेडेंच्या हत्येची कल्पना सुचवल्याचा संशय मालवणी पोलिसांना आहे. त्याबाबत नगर व बीड पोलीस अधिक तपास करतील, असेही सांगण्यात आले.

  • वंदनाचे सहआरोपी व जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असलेल्या नीलेशसोबत विवाहबाहय़ संबंध होते. ते समजताच अशोक आणि वंदना यांच्यात वाद सुरू झाले. त्यामुळे वंदना, नीलेश यांनी आपल्या अन्य साथीदारांसोबत मिळून अशोक यांना ११ नोव्हेंबर २०१२ रोजी नगरच्या घरी खूप दारू पाजली. त्यानंतर त्यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह अंबोरा पोलीस ठाण्याच्या हददीत जंगलात फेकण्यात आला, अशी माहिती समोर आली आल्याचे उपायुक्त देशमाने यांनी सांगतात.
  • अशोक व वानखेडे यांच्या हत्येनंतर आरोपींनी ठरवून चेहरे विद्रूप केले, त्यांची ओळख पटू नये असा प्रयत्न केल्याचे मालवणी पोलिसांकडून सांगण्यात आले.