लोकलमध्ये स्टंटबाजी करत असताना तोल जाऊन विक्रोळीतील गणेश इंगोले हा १७ वर्षीय तरुण ११ जूनला कळवा खाडीत पडला होता. मात्र याविषयी त्याच्या मित्रांनी पाच दिवसांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी त्यानुसार तपास केला असता सात दिवसांनंतर गणेशचा मृतदेह कशेळी खाडीकिनारी आढळून आला. गणेशचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून पालकांनी गणेशची ओळख पटविली आहे.

विक्रोळीतील सूर्यानगर परिसरात गणेश इंगोले (१७) राहत होता. गणेशने कळवा येथे नृत्याची शिकवणी लावली होती. ११ जूनला तो क्लासवरून घरी न परतल्याने पालकांनी पार्कसाइट पोलीस ठाण्यात गणेशची बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर गणेश मित्रांसोबत विक्रोळी स्थानकातून कल्याण दिशेला जाणाऱ्या लोकलमध्ये चढताना दिसला, मात्र तो कळवा स्थानकात उतरलाच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता तो कळवा खाडीत पडल्याचे मित्रांनी पोलिसांना सांगितले. गणेशला नृत्यामध्ये वेगवेगळे स्टंट करण्याची आवड होती, रविवारी तो लोकलमध्येही स्टंटबाजी करत होता. रेल्वे रुळांवर काम करणाऱ्या गँगमनची टोपी उडविण्यासाठी तो लोकलमधून खाली वाकला असता खांदा खांबावर आदळल्याने तो तोल जाऊन कळवा खाडीत पडल्याचे मित्रांनी सांगितल्यावर पोलिसांनी जवाहर बाग अग्निशमन केंद्राशी संपर्क साधून गणेशचा शोध सुरू केला. मात्र भरतीमुळे गणेशचा तपास लागत नव्हता. अखेर शनिवारी रात्री कशेळी खाडीपुलाजवळ त्याचा मृतदेह सापडला.