|| सुहास बिऱ्हाडे

वडाळ्याच्या निर्जन जागेवर एका इसमाचा मृतदेह आढळून आला. त्याची काहीच ओळख पटलेली नव्हती. त्या भागात सीसीटीव्ही नव्हते. कुणी बेपत्ता असल्याची फिर्याद नव्हती. कपडय़ावरून काही अंदाज येत नव्हता. पोलिसांना त्याच्या खिशात एक सिनेमाचे तिकीट सापडले होते. या तिकिटावरून काही तपास लागतो का याचा पोलिसांनी विचार केला. मुंबईत अनेक ठिकाणी छोटय़ा पडद्याच्या सिनेमागृहात ‘बी ग्रेड’ सिनेमे दाखवले जातात. तशाच एका सिनेमागृहाचे ते तिकीट होते. या सिनेमाच्या तिकिटावरून सुरू झाला सिनेमातील कथेलाही मागे टाकणारा वास्तवातील तपासाचा प्रवास.

पोलिसांनी या सिनेमागृहाचा शोध घेण्यास सुरुवात केली. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई पालथी घातली. शेवटी हे सिनेमागृह नागपाडा येथे सापडले. पण ‘दररोज हजारो लोक सिनेमा पाहायला आमच्याकडे येतात. त्यातून हा माणूस कसा ओळखणार?’ असे उत्तर सिनेमागृहाच्या मालकाकडून पोलिसांना मिळाले. मात्र, त्याने पोलिसांना एक उपयुक्त माहिती दिली. या सिनेमागृहात येणारे बहुतांश प्रेक्षक मजूर वर्गातील असतात. ते जवळपासच्या बारमध्ये मद्यपान करतात आणि वेश्यावस्तीतही जातात, असे त्याने पोलिसांना सांगितले.

मुंबईतील वेश्यांकडे चौकशी केली तर कदाचित काही माहिती मिळेल असे पोलिसांना वाटले. परंतु जे फोटो होते त्यातील मयताच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग होते. पोलिसांनी मग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रक्ताच डाग काढून फोटो स्वच्छ केला. मुंबईत हजारो वेश्या आहेत. प्रत्येक वेश्येकडे जायचं आणि फोटो दाखवून चौकशी करायची असं ठरलं. त्यासाठी या फोटोच्या तब्बल ३ हजार प्रती काढल्या. वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगोले यांनी महिला पोलिसांना ही छायाचित्रे देऊन मुंबईतील वेश्यावस्त्या पालथ्या घालण्यास सांगितले. सहा वेगवेगळी पथके नेमण्यात आली. पण कुणाकडेच या व्यक्तीची ओळख पटली नाही. आता हा तपास बंद करावा, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला.

अशातच पोलिसांना अंधारात एक प्रकाशाची तिरीप दिसली. हा फोटो पाहून शरीरविक्रय करणाऱ्या एका महिलेच्या चेहऱ्यावरील भाव बदलल्याचे चाणाक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी लगेच टिपले. पण ती महिला काही बोलण्यास तयार नव्हती. अखेर तिला बोलते करण्यासाठी शाकीर पटेल नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. पटेल यांच्या मध्यस्थीनंतर त्या महिलेने पोलिसांना माहिती पुरवली. मयत व्यक्तीचे नाव शिकार खान असून तो आपला नियमित ग्राहक असल्याचे या महिलेने सांगितले. तो आपल्याला घेऊन सिनेमाला जाणार होता. परंतु, त्या दिवशी तो आलाच नाही. तो अनुरूल शेख या ठेकेदाराकडे काम करायचा. हा ठेकेदार पश्चिम बंगालमध्ये राहतो, अशी माहिती या महिलेकडून मिळाली.

पोलीस उपनिरीक्षक शाकीर पटेल आणि त्यांचे पथक रातोरात पश्चिम बंगालला शेखला शोधायला रवाना झाले. एका मोठय़ा झोपडपट्टीतील, दलदलीच्या प्रदेशातून वाट तुडवत पोलिसांनी अनुरूलला शोधून काढलं. तो मद्याच्या नशेत होता. त्याला बोलतं करायला पोलिसांना  बरेच प्रयास करायला लागले. मयत शिकार खान हा उत्तम कार्पेटर होता असे तो म्हणाला. त्याचा एक लंगडा साथीदार होता. त्याने शिकार खानची हत्या केल्याचे तो म्हणाला. पण त्याला पुढची काही माहिती नव्हती. तो लंगडा होता आणि दक्षिण मुंबईतील एका बारमध्ये नियमित येतो अशी माहिती त्याने दिली.

आता तो लंगडा पोलिसांना शोधायचा होता. पोलिसांनी वेशांतर करून बारच्या बाहेर सापळा रचला. बरेच दिवस सावज हाती लागले नाही. शेवटी नागपाडाजवळील रॉयल बारमध्ये तो लंगडा पोलिसांना दिसला. पोलिसांनी श्रीहरी दलाबी (३७) या लंगडय़ा इसमाला ताब्यात घेतले. त्याने सूरज रिषिदेव (२३) आणि मोहम्मद मंसुरी (२२) या दोन साथीदारांसह मिळून शिकार खानची हत्या केल्याचे कबूल केले. श्रीहरी आणि मयत शिकार एकत्र काम करायचे. एकदा शिकारने त्याचा अपमान केला होता. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने दोन साथीदारांसह योजना बनवली. शिकारला मद्य पाजून निर्जन स्थळावर नेऊन त्याची हत्या केली आणि मृतदेह फेकून दिला. ज्या दिवशी शिकारची हत्या झाली त्या दिवशी तो सिनेमा पाहायला प्रेयसीला घेऊन जाणार होता. पण त्याला सिनेमा पाहता आला नाही. मात्र त्याच सिनेमाच्या तिकिटाने मारेकऱ्यांना पकडून दिले.

@suhas_news

suhas.birhdae@expressindia.com