|| ऋषीकेश मुळे

उत्तर प्रदेशात फसवणुकीच्या गुन्ह्य़ात अटक झाल्यानंतर ‘ते’ दोघे काही महिन्यांत जामिनावर सुटले. हे गुन्हे उघडकीस आल्याने ते पोलिसांच्या रेकॉर्डवर आले होते. त्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेश सोडून मुंबई गाठली. मौजमजा आणि झटपट पैसा कमवण्यासाठी त्यांनी येथेही फसवणुकीचे गुन्हे करून पैसे कमवण्याचे बेत आखले. अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी बारमध्ये ओळख झालेल्या काही तरुणांना सोबत घेतले. सावधगिरीने ही टोळी गुन्हे करत होती आणि या टोळीने वर्षभरात २६ फसवणुकीचे गुन्हे केले. मात्र, एकेदिवशी ही टोळी ठाणे पोलिसांच्या हाती लागली आणि त्यांचे गुन्हे उघडकीस आले.

ठाणे येथील वर्तकनगर भागात राहणारी एक ५५ वर्षीय महिला औषध घेण्यासाठी परिसरातील दुकानात गेली. औषध विकत घेतल्यानंतर पाकिटात पैसे नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे परिसरातच असलेल्या एटीएम केंद्रामध्ये ती पैसे काढण्यासाठी गेली. तिथे तिने एटीएम कार्डाद्वारे पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र यंत्रामधून पैसे काही येत नव्हते. त्याच वेळेस एटीएम केंद्राबाहेर उभा असलेला एक तरुण तिच्या मदतीसाठी आतमध्ये आला आणि त्याने तिचे कार्ड घेऊन पैसे काढण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मात्र त्यानंतरही पैसे येत नसल्यामुळे ती हताश होऊन घरी जाण्यास निघाली. काही अंतरावर गेल्यानंतर तिच्या मोबाइलवर एक संदेश आला. बँकेच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्यासंबंधीचा हा संदेश होता. त्यामुळे तिला आश्चर्याचा धक्का बसला आणि तिने बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी तिला एटीएमद्वारे पैसे काढण्यात आल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. मात्र एटीएममधून पैसे निघाले नसल्याचे तिने बँक अधिकाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. अखेर तिने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच प्रकारचे गुन्हे अन्य भागांतही घडले होते आणि अशा गुन्ह्य़ांमध्ये वाढ होऊ लागली होती. त्यामुळे पोलीस या टोळीच्या मागावर होते. मात्र ही टोळी पोलिसांच्या हाती लागत नव्हती.

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटचे अधिकारी आणि कर्मचारी १० मे रोजी कार्यालयात दैनंदिन कामात व्यग्र होते. त्यावेळेस एक खबरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना भेटण्यासाठी आला. या भेटीदरम्यान त्याने एटीएम केंद्रामध्ये मदतीच्या बहाण्याने नागरिकांना गंडा घालणारी टोळीबाबत माहिती दिली. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, पोलीस उपनिरिक्षक शिवराज बेंद्रे, श्रीनिवास तुंगेनवार यांच्या पथकाने वसई येथील नायगाव भागातील एटीएम केंद्राजवळ सापळा रचून सहा जणांच्या टोळीला अटक केली. त्यात आफताब खान (२८), संतोष गिरी (३८), कमलेश यादव (२७), विजय पांडे (४८), अलोक सिंग (३०), अहमद खान (२४) या सहा जणांचा समावेश होता. चौकशीमध्ये या टोळीने वर्तकनगरमधील फसवणुकीच्या गुन्ह्य़ांची कबुली दिली. त्याचबरोबर अन्य भागात केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्य़ांचीही कबुली दिली.

अफताब आणि संतोष गिरी हे दोघे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. संतोषचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून त्याने काही महिने एटीएम केंद्रामध्ये देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली होती. त्यामुळे त्याला या यंत्राबाबत काहीसे ज्ञान होते. त्यातूनच त्याने अफताबच्या मदतीने एटीएम केंद्रामध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मदतीच्या बहाण्याने गंडा घालण्यास सुरुवात केली होती. मदतीचा बहाणा करत एटीएम यंत्र हँग करायचे. पैसे निघत नसल्याने कार्डधारक हाताश होऊन निघून जायचा. मात्र त्याचा यंत्रामधील व्यवहार सुरूच राहायचा. त्याचाच फायदा घेऊन ते बँकेतून पैसे काढायचे. या गुन्ह्य़ात दीड वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी दोघांना अटक केली. अटकेनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. पोलिसांच्या नजरेत आल्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेश सोडून मुंबई गाठली. येथेही त्यांनी अशाच प्रकारे फसवणुकीचे गुन्हे सुरू करण्याचे बेत आखले. त्याच वेळेस बारमध्ये त्यांची काही तरुणांसोबत ओळख झाली आणि या तरुणांनाही त्यांनी या गुन्ह्य़ासाठी टोळीत सामील करून घेतले. गेल्या वर्षभरापासून ही टोळी अशा प्रकारच्या गुन्ह्य़ात सक्रिय होती.

या टोळीने ठाणे शहर, ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आतापर्यंत २६ गुन्हे केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. फसवणुकीच्या रकमेचा आकडा २५ ते ३० लाखांच्या घरात आहे. मौजमजा करण्यासाठी आणि झटपट पैसे कमविण्यासाठी ही टोळी अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचेही तपासात उघड झाले.