News Flash

तपास चक्र : सहज सावज

हे वयोवृद्ध दाम्पत्य नोकर आणि शेजाऱ्यांवरच पूर्णपणे अवलंबून होतं.

|| जयेश शिरसाट

काळ सांगून येत नाही. खारच्या कोकिलकुंज इमारतीत पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या मखिजानी या वयोवृद्ध दाम्पत्यासोबत नेमकं हेच घडलं. नानक (८६) आणि त्यांच्या पत्नी दया (८४) असे दोघेच या घरात राहात होते. आपापल्या कुटुंबासोबत परदेशात वास्तव्यास असलेली दोन मुलं अधूनमधून आईवडलांच्या भेटीला येत होती. अनेक वर्षांमध्ये घरात काम करणारे नोकर आणि शेजारी हेच या दोघांचे सख्खे सोबती. काही लागलं, मदत हवी असली तर अमेरिका किंवा सिंगापूरहून मुलं येणार का? शक्यच नव्हतं. त्यामुळे हे वयोवृद्ध दाम्पत्य नोकर आणि शेजाऱ्यांवरच पूर्णपणे अवलंबून होतं.

२२ जूनच्या सकाळी कपडे धुण्यासाठी ठेवलेली मोलकरीण मखिजानी राहत असलेल्या घराचा दरवाजा ठोठावून थकली. आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. दार आतून बंद होतं. दाम्पत्याच्या देखभालीसाठी नव्याने कामावर रुजू झालेली आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या मुलीनेही काम सोडलं की काय, हा विचार दाराबाहेर खोळंबलेल्या मोलकरणीच्या मनात घोळत होता. बराच वेळ आतून काहीच हालचाल होत नसल्याने मात्र ती घाबरली. तिने शेजाऱ्यांकडे विचारपूस केली. अखेर पोलिसांना बोलवण्यात आलं. आत वयोवृद्ध मखिजानी दाम्पत्य हातपाय बांधलेल्या आणि निपचित जमिनीवर पडलेलं आढळलं. दोघांचीही नाक-तोंड, गळा दाबून हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी संपूर्ण घर मौल्यवान वस्तूंच्या शोधार्थ उसकलेलं. चोरीच्या उद्देशाने हे हत्याकांड घडलं हे अवघ्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट झालं.

मृतदेह शवचिकित्सेसाठी धाडून खार पोलिसांच्या पथकाने लगोलग दारावर खोळंबलेल्या मोलकरणीकडे आणि शेजाऱ्यांकडे चौकशी सुरू केली. नाव, मुलं, नातेवाईक, घरात काम करणारे नोकर, गेल्या काही दिवसांमध्ये घडलेला वाद, दाम्पत्याचा नित्यक्रम.. सरबत्ती सुरू झाली. या चौकशीत तीन आठवडय़ांपूर्वी या दाम्पत्याने एका तरुणीला कामावर ठेवल्याचं उघड झालं. ती गायब होती. त्यामुळे पोलिसांचा संशय तिच्याकडे वळला. मात्र, या तरुणीचे नाव, पत्ता किंवा आणखी कोणताच तपशील कुणाकडेही नव्हता. त्यामुळे तपासाला दिशा मिळाली पण सुरुवात कुठून करावी, हेच कळेनासे झाले. मखिजानी दाम्पत्याकडे या तरुणीव्यतिरिक्त चार नोकर होते. त्यांच्यापैकी कोणालाच या तरुणीबाबत फार माहिती नव्हती. शेजाऱ्यांचीही तीच गत. डोकं खाजवून शेजाऱ्यांनी बरीचशी ख्रिश्चन नावं पुढे केली. हे दाम्पत्य घरातल्या नोकरांना त्यांच्या सोयीने टोपण नाव ठेवत होतं. अम्मी, सोनू, पप्पू, छोटू ही आधीच्या नोकरांना दिलेली नावं पोलिसांसमोर आली. इमारतीत सीसीटीव्ही नव्हते. दोन सुरक्षा रक्षकांपैकी एकानेही तरुणीला बाहेर पडताना किंवा अन्य कोणाला आत येताना पाहिलेलं नव्हतं. परदेशात दोन्ही मुलांना पोलिसांनी संपर्क साधला. मोलकरणीबाबत विचारपूस केली. तेही निरुत्तर होते. घरकाम करणारा नोकरवर्ग सहसा फार काळ एकाच घरी टिकत नाही. विविध कारणांनी मोलकरणी, घरगडी, अचारी नोकऱ्या बदलतात. एक बदलला की त्याच्याजागी दुसरा येतो आणि पुढे तिसरा.. हे चक्र निरंतर सुरू असते. त्यामुळे या दुहेरी हत्याकांडाचा तपास अधांतरी लोंबकळत होता.

एखादा दुवा मिळेल या आशेने खार पोलिसांनी मखिजानी दाम्पत्याचं घर पुन्हा धुंडाळलं आणि दाम्पत्याचे मोबाइल फोन हाती लागले. त्यातही टोपण नावांनी असंख्य नोकरांचे नंबर आढळले. त्यातूनही तपास पुढे सरकण्याचं कोणतंही चिन्हं दिसत नव्हतं. मुंबई गुन्हे शाखेत बरीच र्वष कर्तव्य बजावलेले अधिकारी खार पोलीस ठाण्यात आहेत. गुंतागुंत असलेले अनेक गुन्हे चिकाटीने, जिद्दीने सोडवलेल्या या अधिकाऱ्यांनी उलटय़ा दिशेने तपास सुरू केला. नानक आणि दया या दोघांच्या मोबाइलवरून आलेल्या-गेलेल्या फोन क्रमांकांची यादी केली गेली. प्रत्येक क्रमांकाचे तपशील गोळा करण्यास सुरुवात झाली. या कवायतीत एका मोबाइल क्रमांकावर खार पोलिसांनी वर्तुळ काढले. हा क्रमांक २१ जूनपर्यंत सुरळीत सुरू होता. मात्र रात्री दहा वाजल्यानंतर बंद झालेला. या क्रमांकावर ओडिसातून एक व्यक्ती सातत्याने संपर्कात होता, अशी माहिती पुढे आली. या तांत्रिक तपासात ओडिसातील या मोबाइल क्रमांकाचं अस्तित्व २१ जूनच्या रात्री मखिजानी यांच्या घरी, घराजवळ होतं. २२ जूनला हा मोबाइल क्रमांक ओडिसाच्या दिशेने प्रवास करतोय हे स्पष्ट झालं. ही माहिती पुढे आली आणि खार पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आता फक्त मोबाइल क्रमांकावरून त्याच्या मालकाची ओळख पटवणं बाकी होतं. खार पोलीस ठाण्यातील अनुभवी अधिकाऱ्यांनी तेही क्षणात शोधून काढलं. सिंघासन मुकुट एक्का (२६) असं त्या मोबाइलधारकाचं नाव होतं. त्याचं छायाचित्रं पथकाने मिळवलं. तपासादरम्यान आदल्या दिवशी संशयित तरुणीला घेऊन दया मखिजानी पार्लरमध्ये गेल्या होत्या. तिथल्या सीसीटीव्ही चित्रणावरून पोलिसांनी तरुणीचं छायाचित्र मिळवलं. दोन्ही छायाचित्रं नागपूर येथील राज्य रेल्वे पोलिसांना पाठवून देण्यात आली. हे दोन संशयित गीतांजली एक्स्प्रेसमध्ये असावेत, असा अंदाजही त्यांना देण्यात आला. गीतांजली नागपूरला थांबली आणि रेल्वे पोलिसांनी छायाचित्रांच्या आधारे दोघांची गचांडी आवळली. खार पोलिसांनी विमानाने दोघांना मुंबईत आणलं आणि पुढील चौकशी सुरू केली.

मखिजानी दाम्पत्याने तीन आठवडय़ांपूर्वी कामावर ठेवलेल्या तरुणीचं नाव पार्वती खाका असं होतं. २० वर्षांची पार्वती आणि एक्का दोघे ओडिसाचे. एक्का ओडिसा पोलीस दलातला निलंबित शिपाई. मैत्रिणीची हत्या केल्याचा आरोप असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. चारेक महिन्यांपूर्वी पार्वती आणि एक्का यांची ओळख झाली. पुढे प्रेम जुळलं आणि लग्नाचा निर्णय घेतला गेला. कामानिमित्त पार्वती मुंबईत आली. वृद्ध दाम्पत्याकडे रुजू झाली. तोवर तिच्या मनात काहीच नव्हतं. प्रामाणिकपणे काम करायचं, नोकरी टिकवायची हाच विचार ती करत होती. पार्वतीकडून वृद्ध दाम्पत्य, घरची परिस्थिती माहीत झाल्यावर एक्काने कट रचला. खूप पैसे मिळतील, लग्नाची तजवीज होईल, त्यानंतरही आयुष्य आरामात घालवू शकू, तुला काम करावं लागणार नाही.. या आणि अशा एक्काच्या भूलथापांना पार्वती बळी पडली. या हत्याकांडासाठी तयार झाली. २१ जूनच्या रात्री पार्वतीनेच एक्काला इमारतीत येण्याचा सुरक्षित मार्ग सांगितला, घरात घेतलं. दोघांचे हातपाय बांधून एक्काने नानक तर पार्वतीने दया यांची हत्या केली. अवघ्या दोन मिनिटांत काम तमाम. घरातून सुमारे १० लाखांचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज घेऊन दोघांनी पळ काढला. या तपासातून एकाकी राहणाऱ्या वृद्धांच्या नेमक्या परिस्थितीबाबत पोलिसांना अंदाज आला. वाढत्या वयामुळे घरातली कामं करण्यासाठी नोकर, गडी लागणारच. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नोकरवर्गाची माहिती घ्या, ती पोलीस ठाण्याला द्या, हे त्यांना पटतंय. पण ही माहिती पोलीस ठाण्याला दिल्यानंतर भीतिपोटी नोकर टिकत नाहीत. एक गेला की दुसरा येईपर्यंत कामं अडून पडतात. जी या वयात करणं शक्य नाही, ही दुसरी बाजू पोलिसांना समजली. इमारतीत सीसीटीव्ही नव्हते. ते असते तर कदाचित पकडले जाऊ या भीतीने पार्वतीने संधी मिळताच नुसती चोरी करून पळ काढला असता, हत्या करण्याची हिंमत दाखवली नसती. दाम्पत्याच्या हत्येनंतर इमारतीतील उर्वरित रहिवाशांनी सीसीटीव्ही बसवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 12:44 am

Web Title: loksatta crime story 9
Next Stories
1 मुंबईची कूळकथा : घारापुरी – इसवीसनपूर्व समृद्ध बंदर
2 जलद पाठोपाठ चर्चगेट-अंधेरी दरम्यान धीम्या मार्गावर वाहतूक सुरु
3 शरद रणपिसे, वजाहत मिर्झांना काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी
Just Now!
X