नवी मुंबईतील सानपाडा येथील बँक ऑफ बडोदा या बँकेच्या लॉकरवर पडलेल्या दरोडय़ाने साऱ्यांनाच हादरवून सोडले. जमिनीखालून भुयार खणून त्या मार्गाने दरोडा टाकण्यात आला होता. नेमका कसा ठरला दरोडय़ाचा बेत?

छोटय़ा-मोठय़ा घरफोडय़ा करून सरावलेले पाच तरुण एक दिवस असल्फा व्हिलेजच्या मेट्रो स्थानकाखाली जमले. गाडीत बसले असतानाच त्यांचा मोठा दरोडा टाकण्याचा बेत ठरला. एक तर आयुष्य बदलून जाईल किंवा तुरुंगात जाऊ, असा विचार करून या तरुणांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील बँकांची टेहळणी करण्यास सुरुवात केली. सहा महिने चाललेल्या अभ्यासानंतर दरोडय़ासाठी अतिशय सोपी आणि सोयीस्कर अशी बँक नवी मुंबईत सापडली. सानपाडा-जुईनगर सेक्टर ११ मधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेची दरोडय़ासाठी निवड करण्यात आली..

बँकेपर्यंत ३० फूट लांबीचे भुयार खोदून लॉकरमधील पावणेचार कोटीचे सोने, चांदी आणि रोख रक्कम लुटण्यात आली आणि संपूर्ण पोलास दल चक्रावून गेले. पण पोलिसांनीही तितक्याच कुशलतेने या प्रकरणातील काही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

या गुन्ह्य़ातील मास्टर माइंड अली मिर्झा बेग ऊर्फ अज्जू हा ६०-७० सत्तर चोऱ्या, घरफोडय़ा करुन अट्टल गुन्हेगार झालेला आहे. घरफोडी करताना कोणती खबरदारी घ्यायची, याची त्याला चांगली अक्कल आली आहे. दरोडय़ासाठी भुयार खोदण्याच्या कामासाठी स्थानिक मजूर न वापरता उत्तर प्रदेशातून मजूर आणण्याची जबाबदारी याच टोळीतील दीपक मिश्राने घेतली. हा मिश्रा अद्याप फरार आहे. बँक ऑफ बडोद्याच्या जवळ एक दुकान ग्यान प्रसादच्या नावावर घेण्यात आले. हा प्रसाद या टोळीतील चोरलेल्या सोन्याची विल्हेवाट लावणारा. त्यासाठी अज्जूने त्याला मुंबईत एक सोन्याचे दुकान पण टाकून दिले होते पण ते दिवाळखोरीत निघाले. खोटी कागदपत्र बनवून या ग्यान प्रसादने बँकेजवळचे दुकान एक लाख डिपॉझिट आणि २४ हजार मासिक भाडय़ावर घेतले. निर्जनस्थळी असलेल्या दुकानालाही २४ हजार रुपये भाडे मिळाल्याने दुकान मालकानेही हसत हसत गाळा दिला. दुकानात विक्रीचे सामान तुरळक ठेवण्यात आले. जेणेकरून या दुकानाकडे फारसे कोणाचे लक्ष जाणार नाही. उत्तर प्रदेशातून आणण्यात आलेल्या मजुरांची जवळ राहण्याची व्यवस्था न करता बँकेपासून दहा ते बारा किलोमीटरवर असलेल्या उलवा येथील उन्नती टॉवरमध्ये करण्यात आली. त्यांना सकाळ-संध्याकाळ आणून सोडले जात होते.

दुकानापासून बँकेपर्यंत भुयार खोदण्याचे काम पाच महिने सुरू होते. त्यासाठी दुकान आणि काम यांच्यामध्ये एक पार्टिशन घालण्यात आले. या पार्टिशनच्या आडून भुयार खोदण्याचे काम सुरू झाले. पण त्याआधी प्रश्न होता बँकेच्या अंतर्गत रचनेचा. यासाठी आरोपींनी शक्कल लढवली. बँकेच्या वर्धापनदिनी शेजारचे दुकानदार या नात्याने अज्जू आणि ग्यानप्रसाद बँकेत गेले. ठेवी ठेवायच्या आहेत सांगून लॉकर रूम पाहण्यात आला. खिशाच्या पेनाला लावण्यात आलेल्या छुप्या कॅमेऱ्यात लॉकर रूम आणि बँकेची सर्व माहिती साठविण्यात आली. त्यानंतरच जुलै महिन्यात खोदकामाला सुरुवात करण्यात आली. त्यासाठी आतमध्ये मजूर, दुकानावर एक जण आणि दुकानासमोर गाडीत दोघेजण अशी टेहळणीची तयारी करण्यात आली.

बँकेवर शुक्रवारी रात्री दरोडा टाकण्याचा मूळ बेत होता. शनिवार-रविवारी बँक बंद असल्याने कोणालाही काही कळणार नव्हते व त्या कालावधीत आपल्याला सुरक्षित स्थळी पोहोचता येईल, अशी त्यामागची कल्पना होती. पण नेमक्या त्याच शुक्रवारी रात्री बँकेच्या रांगेत असलेल्या एक एंजटचा मुलगा ऑफिसमध्ये मद्यप्राशन करीत रात्री उशिरापर्यंत बसला होता. त्यामुळे काम न करण्याच्या सूचना बाहेरून देण्यात आल्या होत्या. एखादी हालचाल संशयास्पद वाटली तर दुकानावरचा माणून ड्रिल मशिन थेट बंद करीत होता. आदल्या दिवशी बेत फसल्यानंतर शनिवारी मात्र या टोळीने दरोडा यशस्वी केला.

तपासही कौशल्याने..

या दरोडय़ाने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले. पण त्यांनी नेटाने तपास सुरूच ठेवला. भुयारामध्ये आढळून आलेली उत्तर प्रदेशमध्ये विकल्या जाणाऱ्या गुटख्याची पाकिटे आणि एका हिंदी वर्तमानपत्राच्या तुकडय़ावरून पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली. त्याचप्रमाणे या परिसरातील एका सोसायटीच्या समोर लावण्यात आलेल्या एका सीसी टीव्ही कॅमेऱ्यात मारुती अर्टिगा गाडी अनेक वेळा ये-जा करीत असल्याचे आढळून आले होते. बँकफोडीसाठी वापरण्यात आलेल्या गाडीला बोगस नंबर प्लेट लावण्यात आली होती. ती नंबर प्लेट दरोडा टाकल्यानंतर काढायला हे गुन्हेगार विसरले आणि नेमके पोलिसांच्या जाळ्यात सापडले. खोटय़ा क्रमांकाच्या नंबर प्लेटचा क्रमांक घेऊन पोलिसांनी घाटकोपर येथे दीड हजार गाडय़ांची तपासणी केली. वर्तमानपत्रावरील प्रकाशन पत्त्यावरून हे आरोपी घाटकोपर परिसरातील असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. दीड दिवस वाहनांच्या तपासणी केल्यानंतर घाटकोपरच्या पार्क साईटला ही गाडी आढळून आली, पण पोलिसांनी या गाडीला हात लावला नाही. सकाळी साडेदहाला या गाडीचे दरवाजे उघडले गेले. तीन जण गाडीत बसले. पोलीस लांबून हे सर्व पाहात होते. दीडशे पोलीस विविध वेषात आजूबाजूला उभे होते. गाडी नवी मुंबईच्या दिशेने निघाली. शिवाजीनगरला आणखी एक जण गाडीत बसला. सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज पाडवी, तुर्भे एमआयडीसीचे उल्हास कदम आणि सुरज जाधव या अधिकाऱ्यांनी ही अर्टिगा गाडी वाशी टोल नाक्यावर अडवली आणि तिच्यावर बंदुका रोखल्या. आपला खेळ संपल्याचे लक्षात येताच गाडीतून उतरलेल्या चार जणांनी स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. या गुन्ह्य़ात ११ जणांना अटक झाली असून अजून चार जण फरार आहेत. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहआयुक्त प्रशांत बुरडे, उपायुक्त सुधाकर पाठारे, तुषार दोषी आणि साहाय्यक आयुक्त किरण पाटील व कौसाडिकर यांनी आरोपींना अटक केली.