News Flash

‘लोकसत्ता’ दिवाळी अंक : वैविध्यपूर्ण साहित्याची पर्वणी

अंकाची सुरुवात होते ती प्रताप भानू मेहता यांच्या ‘धर्म, राष्ट्रवाद आणि हिंसा’ या लेखाने.

मुंबई – दरवर्षी वाचकांना दर्जेदार साहित्याची मेजवानी सादर करून त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करणं ही ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकाची खासियत. कसदार साहित्यमूल्य असलेले लेखक आणि त्यांचे उत्तमोत्तम साहित्य वाचकांना उपलब्ध करून देण्याची ही परंपरा ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकाने यंदाही कायम राखली आहे. अर्थात, ही दिवाळी नेहमीसारखी नाही. या वर्षीच्या दिवाळीवर करोना महामारीचे गडद सावट आहेच, परंतु दिवाळी अंकांच्या माध्यमातून काही तरी नवे, सकस वाचायला मिळेल आणि मनावरचे करोनाचे मळभ काही अंशी दूर सारण्यात ‘लोकसत्ता’ दिवाळी अंक महत्त्वाचा ठरेल.

अंकाची सुरुवात होते ती प्रताप भानू मेहता यांच्या ‘धर्म, राष्ट्रवाद आणि हिंसा’ या लेखाने. आज जगभर सर्वत्र धर्म, राष्ट्रवाद आणि त्यापायी घडवल्या जाणाऱ्या भीषण हिंसाचाराचे थमान सुरू आहे. एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत असल्याचा भास होत असतानाच दुसरीकडे अस्मिता, प्रांतवाद, अतिरेकी राष्ट्रवाद यामुळे माणसामाणसांत फूट पडत आहे. या सद्य:परिस्थितीचे अचूक विश्लेषण करणारा हा लेख. काश्मीरमधील मेहबूबा मुफ्ती स्थानबद्धता प्रकरणाच्या संदर्भात कोणतीही राजकीय भूमिका न घेता न्यायालयीन संकेत व प्रक्रियांची बूज राखणे महत्त्वाचे मानणारा ‘‘तारखे’चा न्याय’ हा अ‍ॅड. अभिनव चंद्रचूड यांचा लेख वाचनीय आहे.

आजकालचं हिंदी चित्रपट संगीत पूर्वीसारखं जनमानसावर ६०-७०-८० वष्रे इतकं प्रदीर्घ काळ गारूड करीत नाही, अशी चर्चा रसिकांमध्ये अधूनमधून होत असते. गेल्या १५-२० वर्षांतल्या चित्रपट संगीताचा विचार करता या विधानावर शिक्कामोर्तब व्हावं अशीच परिस्थिती दिसते. हल्ली चित्रपट बघत असतानाच नवीन गाणी काना-मनाआड जातात. म्हणूनच या विषयाचा जाहीर ऊहापोह करणारा डॉ. आशुतोष जावडेकर यांचा ‘कधी गीत, कधी नाद’ हा लेख वास्तवदर्शी मांडणी करणारा आहे.

तसेच पंडित रविशंकर यांचे रमेश गंगोळी यांनी रेखाटलेले प्रांजळ शब्दचित्र.. मंगला नारळीकर यांची भागाकाराविषयी ‘भागम् भाग भागाकार’ ही बालनाटिका, ‘हायपेशिया’ हा अंजली चिपलकट्टी यांचा प्राचीन इजिप्तमधील गणितज्ञ,  खगोलशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानाची अभ्यासक, संशोधक आणि व्याख्याती हायपेशियाविषयीचा लेख, अश्विनी पाटील यांचा ‘वुहानमधले ‘ते’ दिवस’,  प्रशांत कुलकर्णी यांची ‘कृत्रिम बुद्धी, अकृत्रिम भावना’ ही खुमासदार व्यंगचित्रमालिका, राशिभविष्य आणि देवदत्त पाडेकर यांचे देखणे मुखपृष्ठ.. असा हा वैचारिक, वैविध्यपूर्ण साहित्याने सजलेला ‘लोकसत्ता’चा दिवाळी अंक आवर्जून वाचावा असाच आहे.

मान्यवर लेखक..

रवींद्रनाथ टागोर, साहिर लुधियानवी, ज्येष्ठ पत्रकार प्रताप भानू मेहता, गिरीश कुबेर, श्याम मनोहर, दासू वैद्य, सदानंद देशमुख, प्रा. शरद देशपांडे, मंगला नारळीकर, नवनाथ गोरे, राजकुमार तांगडे, डॉ. आशुतोष जावडेकर, रेखा देशपांडे, विजय पाडळकर, अभिनेत्री सुहास जोशी, अ‍ॅड. अभिनव चंद्रचूड, शिल्पा कांबळे.. लेखकांची ही मांदियाळीच या अंकाच्या दर्जेदारपणाची साक्ष पटवून देते. वैचारिक साहित्य, कथा, रवींद्रनाथ टागोर, देवेंद्र सत्यार्थी, सत्यजित रे, पंडित रविशंकर या महान व्यक्तींची अनोखी ओळख करून देणारे लेख ही वाचकांसाठी पर्वणीच!

घडण्याविषयी..

लेखकाचं ‘लेखक’ म्हणून घडणं वाचकांच्या कुतूहलाचा विषय ठरतं. ‘शब्दांची मांडामांड सुरू आहे..’ – दासू वैद्य, ‘जे जे आले अनुभवा..’ – नवनाथ गोरे, ‘शेतीमातीच्या या कथा, शेतीमातीतून आल्या’ – सदानंद देशमुख,  ‘बिनठशाच्या वाटेनं..’ – राजकुमार तांगडे, ‘लोकल गोष्टीचं ग्लोबल विश्व’ – शिल्पा कांबळे या साहित्यिकांच्या जडणघडणीविषयी वाचताना लेखकांचे वेगळे विश्व उलगडत जाते.

वैचारिक ऐवज..

प्रख्यात कवी साहिर लुधियानवी यांनी ‘देवेंद्र सत्यार्थी’ या लेखात रेखाटलेले सत्यार्थीचे दुर्मीळ शब्दचित्र; तसेच फसलेल्या क्रांतीच्या इतिहासातील पाने.. म्हणजे ‘अरबी ‘वसंत’ आणि आफ्रिकेतील आग’ हा गिरीश कुबेर यांचा लेख, ‘टीप : माझी मलाच सूचना’ ही श्याम मनोहर यांची सद्य:परिस्थितीवरची ही दीर्घ कथा, असा वैचारिक आणि साहित्यिक ऐवज साहित्यप्रेमींना वाचायला मिळेल.

कला-संस्कृतीवेध..

‘आठवणींची स्मृतिचित्रे!’ हा अभिनेत्री सुहास जोशी यांचा ‘स्मृतिचित्रे’ या टेलीफिल्म व एकपात्री प्रयोगाविषयीच्या आठवणी.. ‘नाटक एक : संस्करणे अनेक’ हा प्रा. शरद देशपांडे यांचा नाटककार रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘राजा’ या नाटकाची ओळख करून देणारा लेख.. विजय पाडळकर यांनी शांतिनिकेतनमध्ये सत्यजित रे यांचा घेतलेला शोध.. ‘हिंदी सिनेमा सज्ञान होतोय..’ या लेखात रेखा देशपांडे यांनी विशद केलेली हिंदी सिनेमाची सज्ञानाच्या दिशेची वाटचाल असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 2:46 am

Web Title: loksatta diwali issue 2020 published zws 70
Next Stories
1 माता मृत्युदरात टाळेबंदीत वाढ
2 क्रीडा स्पर्धांचे अर्थकारण गाळात
3 फराळाचा परदेश प्रवास महागला!
Just Now!
X