नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गेली पाच वर्षे समाजातील कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला सन्मानित करण्याचा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ सोहळा यंदाही उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा खणखणीत ठसा उमटवत समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या ‘दुर्गा’ची नावे पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कष्टाची, टीकेची तमा न बाळगता अनेक स्त्रियांनी कार्यकौशल्याने आभाळाची उंची गाठली आहे. आपल्या कार्याने पर्वतालाही खुजे केले आहे. आज असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे स्त्रियांचा सहभाग नाही. परंतु त्या सहभागापलीकडे जाऊन त्या क्षेत्रात ठसठशीत नाममुद्रा कोरणाऱ्या स्त्रियांचा ‘लोकसत्ता’ शोध घेत आहे. काय आहे त्यांचे वेगळे योगदान जे त्यांना सामान्यांपासून असामान्य ठरवते, आमच्यापर्यंत अशा दुर्गाना पोहोचवा आणि त्यांच्या सन्मानासाठी आमच्याबरोबर या.

या दुर्गाचे काम विधायक आणि समाजावर चांगला परिणाम करणारे असावे. ही माहिती फक्त पाचशे शब्दांत आणि नोंदी स्वरूपात पाठवावी. सोबत त्यांचे छायाचित्र, त्यांचा पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल आयडीही असावा. तुम्ही पाठवलेल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधून नऊ दुर्गाची निवड परीक्षक समिती करील आणि नवरात्रीचे नऊ दिवस त्यांची माहिती दररोज ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर एका भरगच्च कार्यक्रमात नामवंतांच्या हस्ते त्यांच्या कर्तृत्वाचा जाहीर सन्मानही केला जाईल.

निवड करण्यासाठी..

उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य, विज्ञान, संशोधन, क्रीडा, मनोरंजन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक कार्य वा अन्य कोणतेही क्षेत्र असो, तुम्ही किंवा तुमच्या परिचयातील कर्तृत्ववान ‘दुर्गा’ची माहिती पुरस्कारासाठी पाठवू शकता. दुर्गाची नावे सुचविण्यासाठी आमचा पत्ता- लोकसत्ता नवदुर्गा, द इंडियन एक्स्प्रेस लिमिटेड, प्लॉट नंबर ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी महापे, नवी मुंबई- ४००७१०. तसेच loksattanavdurga@gmail.com या ई-मेलवरही आपण आपली माहिती पाठवू शकता.