|| ज्योती तिरपुडे

डॉक्टरीसेवा करत असतानाच सोशल आंत्रप्रनरशिप अभ्यासक्रम पूर्ण करून हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजन करणं असो की आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं असो, अपंगांसाठी ‘निजबल’ आणि बेरोजगार युवकांसाठी ‘युवाग्राम’ उपक्रम राबवणे असो, ‘आनंद मूकबधिर विद्यालय’ आणि ‘आनंद अंध विद्यालय’ या शाळांचं डिजिटलाझेशन असो किंवा मियावाकी पद्धतीने चार जंगलं वसण्याचं पर्यावरणीय योगदान असो, आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा डॉ. शीतल आमटे, सशक्तपणे पुढे चालवत आहेत. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चा ‘यंग ग्लोबल लीडर’ पुरस्कार जिंकलेल्या आजच्या दुर्गा आहेत, डॉ.शीतल आमटे-करजगी.

ग्रामीण संस्कृतीचे रक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळून तरुणाईचे शहराकडे पलायन थांबवणं, हा ध्यास घेतलेल्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांना आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवायचं आहे. तांत्रिक, आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा खेडय़ांनाच सक्षम करणारा हा उपक्रम असून सौर ऊर्जा, ‘हेल्थ एटीएम’, उपक्रमशीलतेला या स्मार्ट व्हिलेजमध्ये स्थान असेल. त्याचबरोबर अपंगांसाठी ‘निजबल’, बेरोजगार तरुणांसाठी ‘युवाग्राम’ या प्रकल्पाबरोबरच ‘मियावाकी’ पद्धतीने चार जंगले वसवत पर्यावरण रक्षणाचाही विडा त्यांनी उचलला असून सध्या त्या आनंदवन येथील ‘महारोगी सेवा समिती’च्या कार्यकारी अधिकारी आहेत.

आजोबा बाबा आमटे, आईवडील विकास-भारती आमटे यांच्यासह संपूर्ण आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टीने डॉ. शीतल यांनी २००३ मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतले. सामाजिक उद्यमता (सोशल आंत्रप्रनरशिप) हा अभ्यासक्रम पूर्ण केला. याचमुळे हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजन त्याच करतात. वयाच्या चाळिशीच्या आत केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च २०१६ मध्ये ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून त्यांची निवड केली, ती त्यामुळेच.

डॉक्टर म्हणून काम करताना असे काही अनुभव आले की ज्याने त्यांचा शिक्षणाप्रतिचा दृष्टिकोन बदलून गेला. मूळगव्हाण या खेडय़ात काम करताना एक खरजेने भरलेले मूल घेऊन एक आदिवासी स्त्री त्यांच्याकडे येत असे. तिला महिनाभर औषधे देऊनही मूल बरे न झाल्याने शीतल त्यांना रागावल्या. तेव्हा ती म्हणाली, ‘ताई,  एका कडेवर सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन तीन किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. प्यायलाच पाणी पुरत नाही. त्यामुळे मुलाला रोज आंघोळ घालणे शक्य होत नाही. खरूज आमचा रोग नाही ताई, पाणी नसणे हा आहे. ’ डॉक्टर होण्याबरोबरच त्या प्रश्नाच्या पलीकडे बघायची गरज लक्षात आल्यावर त्या गावात पाणी व वीज उपलब्ध करून देऊन शीतल यांनी त्यांचे आरोग्याचे प्रश्न सोडविले.

पुढे अमेरिकेत जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून लीडरशिपचा कोर्सही शीतल यांनी पूर्ण केला असून मेडिकल लीडरशिप क्षेत्रात ‘लॅन्सेट कमिशन ऑन ग्लोबल सर्जरी’ सोबत ‘मशाल’ आणि ‘चिराग’ असे दोन कार्यक्रम सुरू केले आहेत. समाजात काम करण्यास उत्सुक डॉक्टरांना लीडरशिप क्षेत्रात अधिक सक्षम बनविले जाते. दरवर्षी यातून सुमारे ५०डॉक्टर  सक्षम बनतात.

शीतल सध्या अपंग मुले आणि तरुणांच्या क्षेत्राबरोबरच पर्यावरणावर लक्ष केंद्रित करीत आहेत. ‘आनंद मूकबधिर विद्यालय’ आणि ‘आनंद अंध विद्यालय’ या अपंगांसाठी असलेल्या शाळांसाठी त्यांचे काम सुरू आहे. त्यात अपंगांच्या शिक्षणात गुणवत्ता आणणे आणि त्यांच्या शिक्षकांची क्षमता वाढवण्यावर त्या मुख्यत्वे भर देत आहेत. अपंगांचा सर्वागीण विकास साधण्यासाठी प्रत्येक मुलाची क्षमता बांधणी आणि शिक्षकांचेही प्रशिक्षण, शाळा डिजिटल करणं या कामांना त्यांनी सुरुवात केली आहे.   आनंदवनात आता १८०० कुष्ठरोगी आहेत.  संस्थेने आतापर्यंत २७ लाख लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केल्याचे डॉ. शीतल अभिमानाने सांगतात.

अपंगांचं केवळ शिक्षण, प्रशिक्षणच नव्हे तर त्यांना रोजगार मिळण्यासाठी ‘निजबल’ हा उपक्रम तीन वर्षांपासून डॉ. शीतल यांनी हाती घेतला आहे. तेथे १८ ते ३५ वयोगटातील अपंग आहेत. या केंद्रात वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण प्रशिक्षण, वेगवेगळ्या उद्योगात नोकरी लावून देणं, व्यक्तिमत्त्व विकास, समुपदेशन जेणे करून स्वत:च्या पायावर उभे राहून आत्मविश्वासानं ते आयुष्य जगू शकतील. आतापर्यंत शेकडो मुले पायावर उभी राहिलेली आहेत. दरवर्षी १३५ मुले त्या ठिकाणी येतात. गेल्या एक वर्षांत १७२ मुलांना वेगवेगळ्या उद्योगांमध्ये नोकरीस लावल्याचं शीतल यांनी सांगितलं. याशिवाय सामान्य तरुण जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी ‘युवाग्राम’ हे केंद्र अलीकडेच उभे करण्यात आले आहे. शीतल यांचे आजोबा बाबा आमटे यांचे ते स्वप्न होते. त्याची इमारतही उभी करण्यात आली आहे. लवकरच हे केंद्र सुरू होईल. ३५ मुलांनी प्रवेश घेतला आहे.

पर्यावरणाच्या क्षेत्रात एक वेगळ्या प्रकारचे जंगल साकारण्याची शीतल यांची मनीषा आहे. नुसतं झाडे लावून काही होत नाही. त्याला पोषक इतर गोष्टीही असाव्यात. विशिष्ट पद्धतीनं झाडे लावली तरच त्याचं जंगल होते. ‘मियावाकी’ पद्धतीने जंगल लावण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली असून आनंदवन, सोमनाथ भागात चार जंगले लावण्यात आलेली आहेत. त्याचं १० वर्षांत पूर्ण मोठे जंगल होईल, असं त्यांना वाटतं. हे जंगल १०० टक्के सेंद्रिय असणार आहे. त्यासाठी आपल्याच मातीत येणारी स्थानिक झाडे निवडून जवळजवळ विशिष्ट पद्धतीनं लावण्याचा धडाका त्यांनी सुरू केला आहे.

आनंदवनला पहिले ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तांत्रिक, आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा खेडय़ांनाच सक्षम करून स्मार्ट करण्याची त्यांची योजना आहे. केवळ तंत्रज्ञानाचा उदो उदो न करता तळागाळातील, सर्वात शेवटच्या माणसाचे जगणे सुकर करण्याचा प्रयत्न या ‘स्मार्ट व्हिलेज’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शिवाय आनंदवनात लवकरच ‘हेल्थ एटीएम’ची सोयही करण्यात येणार आहे. ते एटीएम माणसाच्या आरोग्याची पूर्ण छाननी करणार आहे. आमटे कुटुंबाचं महाराष्ट्रातील योगदान नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्यांचा वारसा लाभलेल्या डॉ. शीतल यांनी स्वप्रयत्नांतून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

डॉ. शीतल आमटे-करजगी

महारोगी सेवा समिती वरोरा आनंदवन, वरोरा, चंद्रपूर- ४४२ ९१४

संपर्क -९८२२४६५८३४

sheetalamte@anandwan.in