कार्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ कर्मचारी ते यशस्वी व्यावसायिक ते सामाजिक कार्यकर्त्यां असा प्रवास असणाऱ्या आपल्या यंदाच्या नवव्या आणि शेवटच्या दुर्गा आहेत, अनुराधा देशपांडे. परफेक्ट एम अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील युवकांना उद्योगक्षेत्राशी जोडून रोजगाराचे प्रमाण वाढविण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या, कोकणातील नारळ उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आणि स्वयंसिद्धासंस्थेच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेल्या सामाजिक उद्योजिका अनुराधा देशपांडे यांच्या कर्तृत्वाविषयी

जिद्द, चिकाटीच्या जोरावर आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करीत कॉर्पोरेट क्षेत्रात आपला ठसा उमटवून स्वत:ला सिद्ध केल्यानंतर सुखेनैव आयुष्य जगण्यापेक्षा कौशल्याधारित विकासाच्या अभावाने नोकरीच्या संधी गमावणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या अनुराधा देशपांडे. पण इतपतच त्यांचे काम मर्यादित नाही तर ‘स्वयंसिद्धा’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्त्रियांना उद्योग करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कामही त्या करीत आहेत. कोकण, गोव्यातील नारळ उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची त्यांची सध्या धडपड सुरू आहे.

तरुणांचे समुपदेशन, व्यवसाय मार्गदर्शन, महिला समुपदेशन, महिला सक्षमीकरण हीदेखील कामे त्या गेल्या सहा वर्षांपासून हिरिरीने करीत आहेत. कार्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ  कर्मचारी ते यशस्वी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना कौशल्य विकासातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देणासाठी कार्यरत ते महिला सक्षमीकरणाकरिता झटणाऱ्या कार्यकर्त्यां असा त्यांचा प्रवास आहे.

वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर लगेचच विसाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले, मुलांचीही जबाबदारी फार लवकर खांद्यावर आली. दरम्यान, नोकरीसाठी  त्या रुजू झाल्या ‘आयसीआयसीआय’मध्ये. सुरुवातीलाच आव्हानात्मक काम मिळाले, तेही आय.टी. क्षेत्रात. चढती पदे मिळत गेली आणि यशाची शिखरं तिथूनच काबीज करायला सुरुवात झाली.

ही नोकरी करीत असतानाच त्यांना आगामी शिक्षण खुणावू लागले. त्यांनी वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी, जीएनआयआयटीचा पदवीधर अभ्यासक्रम आणि मनुष्यबळ विकास अधिकारी (एचआर) या विषयात एमबीए हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. नोकरी, घर, कुटुंब सांभाळून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले. मुलांना पाळणाघरात ठेवून सकाळी साडेआठला घर सोडायचे ते रात्री आठलाच परतायचे. रात्री मुलांचा अभ्यास आणि सगळी आवराआवरी झाली की पहाटेपर्यंत अभ्यास. जेमतेम तीन-चार तासांची झोप असा त्यांचा दिनक्रम असायचा.

२००४ मध्ये मुंबईतील कॉर्पोरेट क्षेत्रातील १४ वर्षांचा अनुभव गाठीशी बांधून त्या पुण्यात रुजू झाल्या त्या झेन्सार टेक्नॉलॉजीज्मध्ये. पुढे अधिक आव्हानात्मक काम मिळालं २००५ ला, ‘टेक महिंद्रा’मध्ये. सीनियर रिसोर्स मॅनेजर म्हणून त्यांनी सुरु केलेले काम आणखी आव्हानात्मक. कारण अमेरिका, इंग्लंड आदी सात देशांची जबाबदारी त्यांच्यावर होती. आणि ती त्यांनी कौशल्याने पार पाडली. या क्षेत्रात वीस वर्षांपेक्षा जास्त काम केल्यानंतर त्यांनी स्वत:ची अ‍ॅकॅडमी सुरू केली.

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थी उद्योग क्षेत्रात खूपच कमी निवडले जात. कारण आधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत माहितीचा अभाव. हे विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्राची मागणी यात मोठी तफावत असून यामध्ये हे विद्यार्थी खूपच मागे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उद्योग क्षेत्राची नेमकी गरज महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सांगण्याच्या हेतूने त्यांनी डिसेंबर २०१० मध्ये ‘परफेक्टएम एचआर अ‍ॅकॅडमी’  सुरू केली. महाराष्ट्रातील बहुसंख्य महाविद्यालयातील पदवी घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी करिअर काऊन्सिलिंग आणि रोजगार संधीची माहिती देणे यासाठी मार्गदर्शन करण्याचे कामही त्यांनी केले आहे. या सहा वर्षांच्या कालावधीत अ‍ॅकॅडमीमार्फत १५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. त्यासाठी त्यांच्याबरोबर उद्योगक्षेत्रातील पन्नासहून अधिक जाणकारांचा चमू असून पुण्यात औंध येथे ही अ‍ॅकॅडमी आहे. भविष्यात ‘परफेक्ट एम’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना उद्योगक्षेत्राशी जोडून रोजगाराचे प्रमाण वाढवायचे या अ‍ॅकॅडमीच्या सीईओ अनुराधा यांचे लक्ष्य आहे.

त्यांच्या या करिअरमधला महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या इंजिनीअरिंग कॉलेजच्या ‘बोर्ड ऑफ स्टडीज्’वर त्यांचा झालेला समावेश. दहावी, बारावी किंवा पदवीधर विद्यार्थ्यांना उद्यमशील बनवणे वा रोजगार संधीबाबत मार्गदर्शन करणे, हा अनुराधा यांच्या सध्याच्या कामातला महत्त्वाचा भाग, जो आत्ताच्या काळासाठी पूरक ठरत आहे.

हे काम करीत असतानाच त्यांच्या करिअरला एक वेगळा आयाम मिळाला. कोकणात नारळाचे प्रचंड उत्पादन होते. मग कोकणात नारळाची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनी का नाही? या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी २०१४ मध्ये ‘मंगिरीश अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज’ सुरू केली. आज त्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. या कंपनीचा तिरोडा येथे प्लान्ट आहे. व्यावसायिक दृष्टिकोनाबरोबरच सामाजिक दायित्व म्हणून त्यांनी कोकणातील स्थानिक शेतकरी, स्त्रियांना रोजगार देण्यास सुरुवात केली. ‘मंगिरीश’च्या माध्यमातून स्थानिकांना या व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री, आर्थिक मदतीपर्यंत सर्व गोष्टी पुरवणे सुरू केले. तर स्त्रियांना घर सांभाळून व्यवसाय कसा करावा, त्यांना रोजगार कसा मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचे फलस्वरूप म्हणून आज तिथल्या स्त्रिया आर्थिक स्वतंत्र झाल्या आहेत.

आपल्या पुढील ध्येयाबद्दल त्या म्हणाल्या, ‘‘या कंपनीच्या माध्यमातून आमच्याकडील चमूकडून बाजारपेठेची मीमांसा करून त्यातून तयार होणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर तेथील प्रदेशाला नारळ उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे ध्येय आहे. तसेच पुढील दोन वर्षांत २०-३० टक्क्यांवर पोहोचलेले रोजगाराचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचेही आमचे ध्येय आहे.’’

एक उद्योजिका होण्याबरोबरच आपले सामाजिक भानही त्यांनी जपले आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘सारथी’ या स्वयंसेवी संस्थेकडून ‘संगणक सारथी’ पुरस्कार मिळाला आणि त्या त्याच्याशी कायमच्या जोडल्या गेल्या. ई-कचरा, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा वाचवा, पर्यावरण यासाठीही त्या कार्यरत आहेत. ‘सारथी’च्या माध्यमातून सामाजिक अंगाने गोवा, महाराष्ट्रात उद्योगक्षेत्रातील स्त्रियांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच त्यांचे समुपदेशन त्या करतात. इतकेच नव्हे तर ‘स्वयंसिद्धा’ संस्था स्थापन करून स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून कोकणातील महिलांना रोजगार मिळवून देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, उपलब्ध असलेल्या रोजगारांची त्यांना माहिती देणे, वित्त संस्थांकडून कर्ज मिळवून देणे आदी कामे करताना कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या अनेक महिलांशी संवादही साधतात.

विद्यार्थी, शेतकरी आणि स्त्रिया यांना रोजगार याबाबत मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रात यासाठी जेथे कोठे गरज असेल त्यांनी आम्हाला जरूर बोलवावं. आम्ही त्यांना मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू, असे त्या आवर्जून सांगतात. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असणाऱ्या पु. ल. देशपांडे यांचे बंधु रमाकांत देशपांडे यांच्या स्नुषा असणाऱ्या अनुराधा यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी अविरत प्रयत्नांतून केलेला आजवरचा प्रवास हा प्रेरणा देणारा असाच आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम!

  • अनुराधा देशपांडे (०२०) ६५२२८९९९
  • ceo@perfectm.in
  • ‘विम’ प्रस्तुत ‘लोकसत्ता दुर्गा २०१६’चे सहप्रायोजक आहेत केसरी.
  • नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत ‘एबीपी माझा’.