तुळजापूर देवीच्या देवळाचा परिसर स्वच्छ राहावा म्हणून स्वत: स्वच्छता मोहीम हाती घेणाऱ्या, तुळजापूरच्या स्वच्छतेसाठी गेली आठ वर्षे संकल्प म्हणून अनवाणी चालणाऱ्या आणि बचतगटाच्या माध्यमातून अनेकींना आर्थिक स्वतंत्र करणाऱ्या आजच्या सहाव्या दुर्गा आहेत, भारतबाई देवकर. अशिक्षित असूनही शासनाच्या योजनांची इत्थंभूत माहिती असणाऱ्या आणि त्याच्याच आधारे पाचशेच्या वर बचतगट स्थापन करून समाजप्रबोधन करणाऱ्या भारतबाई देवकर यांच्या कर्तृत्वाविषयी.

गेली आठ र्वष भारतबाई देवकर यांनी स्वत:हूनच तुळजापूरची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. देवीच्या या गावात घाणीचे साम्राज्य त्यांना खटकले आणि देवळाजवळच्या पार्किंग परिसरापासून स्वच्छतेची सुरुवात त्यांनी केली. जोपर्यंत तुळजापूर स्वच्छ होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा पण त्यांनी केला आहे आणि खरोखरच गेली आठ र्वष त्या अनवाणी फिरत आहेत. लिहिता वाचता येत नसले तरी सर्व प्रकारच्या सरकारी योजनांची इत्थंभूत माहिती त्यांना आहे. त्यातूनच त्यांनी पाचशेहून अधिक बचतगट सुरू करून हजारो स्त्रियांना रोजगाराचा मार्ग दाखवून दिला आहे. तसेच बचतगटांच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्त्रियांची सावकारी पाशातूनही सुटका केली आहे. देवळाभोवतालच्या स्वच्छतेचं कंत्राट आणि भाविकांना पाणीपुरवठा करण्याचं कंत्राट स्थानिक महिलांना मिळवून दिल्याने त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटला आहे.

banana in 15 thousand hectares of garden dried up in Jalgaon and solapur due to summer heat
उन्हाच्या झळांचा केळीला फटका; जळगाव, सोलापुरात १५ हजार हेक्टरवर बागा सुकल्या
Ramdas Tadas
पेट्रोलपंप, शेती अन् फार्महाऊस… रामदास तडस यांची संपत्ती किती? जाणून घ्या…
Raju Shetty
शेतकरी, कामगारांचा आवाज संसदेत बेधडकपणे मांडण्यासाठी विजयी करा – राजू शेट्टी यांचे आवाहन
E bus service started on behalf of State Transport Corporation during Chaitrotsav nashik
नाशिक-सप्तश्रृंग गड ई बससेवा

भारतबाईंचा सारा प्रवासच थक्क करणारा आहे. तुळजापूरपासून १५ किमी अंतरावरच्या एक छोटय़ाशा खेडय़ात जन्मलेल्या भारतबाई लग्न झाल्यावर बार्शी तालुक्यातल्या मालेगाव येथे राहायला आल्या. एक मुलगा पदरात असताना दुसऱ्या एका बाईसाठी नवऱ्याने भारतबाईंना मारहाण केली इतकी की त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, मात्र तेथून परतल्यावर नवऱ्याकडे परत न जाता आपल्या मुलासह त्यांनी तुळजापूरमध्ये स्वतंत्र राहणे पत्करले. उदरनिर्वाहाचे काहीच साधन नसल्याने त्या रस्त्याची खडी फोडायचे काम करायला लागल्या. तिथेच एका झोपडपट्टीत झोपडी बांधून राहायला लागल्या.  पोटापुरते भागायला लागले तसे त्यांचा मूळ स्वभाव उफाळून आला. आणि त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली.

त्यांचे महत्त्वाचे काम म्हणजे स्वच्छता. तुळजापूरच्या देवीच्या देवळाजवळचा पार्किंग परिसर म्हणजे कचऱ्याचा ढिगारा! गाडीतून खाऊन भिरकावलेले कागद, प्लास्टिक पिशव्या, खरकटं, घाण, त्यातच विधी उरकणारी पोरं, सगळाच गलिच्छ कारभार. भारतबाईंना ही घाण आणि अस्वच्छता खुपत होती. आपल्या देवीचं देऊळ आणि त्याच्याजवळ असली घाण असावी या विचाराने त्या अस्वस्थ झाल्या. मग नुसता विचार करून न थांबता त्यांनी आजूबाजूच्या स्त्रियांना गोळा केले आणि तीन महिने ढोर मेहनत केली. कंबरभर उंचीचे कचऱ्याचे ढीगच्या ढीग जमा झाले होते. टेम्पो भरभरून तो कचरा गोळा करून नेला आणि तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर हा सारा परिसर बऱ्यापैकी साफ झाला. पण त्याचबरोबर त्यांनी एक पणही केला. जोपर्यंत देवीचे गाव स्वच्छ होत नाही तोपर्यंत पायात वहाण घालणार नाही आणि खरोखरच गेली आठ र्वष भारतबाई देवकर अनवाणी फिरत आपले समाजकार्य करत असतात.

एकदा एका गावात गेल्या असताना त्यांना बचतगटाबद्दल कळलं. तिथल्या एका वार्ताहराने त्यांना अशा बचतगटाची माहिती दिली. त्या गावाहून भारतबाई परत आल्या त्या वेगळं काहीतरी करण्याच्या इराद्यानेच. त्यांनी पंचायत समितीकडून अधिक माहितीसाठी खेटे घालायला सुरुवात केली. पण तुळजापूर हा शहरी भाग असल्याने तिथले नियम वेगळे असे सांगत त्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. मग मात्र भारतबाईंनी अनेक शिबिरं, सभांमध्ये जाऊन माहिती शोधायला सुरुवात केली. त्यांच्या आसपासच्या सगळ्या गरीब कुटुंबांना शेती, आजारपण, सण किंवा इतर काही ना काही कारणाने सावकारांकडून कर्ज काढावे लागत असे. त्याचा व्याजदर प्रचंड असायचा. व्याज फेडतानाच कुटुंब देशोधडीला लागायचे. हे सगळं भारतबाई बघत होत्या. हे बदलण्यासाठी त्यांना बचतगटांचा पर्याय सापडला. अनेक प्रकारे समजावून त्यांनी स्त्रियांचे मन वळवले. त्या काळात बचतगटाची माहिती फारशी कुणाला नव्हती त्यामुळे अनेक बँका खाते सुरू करू द्यायला सहसा राजी होत नसत. पण ‘बँक ऑफ इंडिया’ने त्यांना मदतीचा हात पुढे केला. अशा खात्याची नीट माहिती करून दिली. त्यातून कर्ज कसे घ्यायचे, व्यवसाय कसा वाढवायचा हे सांगितले आणि बचतगट सुरू झाले. त्यांचे या विषयातले ज्ञान पाहून आणि याविषयीची तळमळ जाणून घेऊन सरकारी पातळीवरूनही त्यांना बचतगटाचा प्रसार करण्यासाठी बोलावले गेले. भारतबाईंच्या मदतीने नगर परिषदेने स्त्रियांचे अधिक बचतगट बनवण्यास उद्युक्त केले. आजही दिवसभर भारतबाई वणवण फिरतात, घरोघरी, वस्त्यांमध्ये जाऊन बचतगटांचे महत्त्व समाजावून देतात आणि मदतही करतात. सगळ्या तुळजापुरात सव्‍‌र्हे घेऊन ७७०० उंबरा मोजणी केली आहे, असे त्या अभिमानाने सांगतात. आज सुमारे पाचशेहून अधिक बचतगट तेथे सुरू झाले आहेत. या बचतगटांमार्फत कवडीमाळा बनवणे, कपडे शिवणे, ब्युटीपार्लर चालवणे, गृहोद्योग करणे, गांडूळ खात बनवणे, दुधाचे पदार्थ बनवणे, देवळाची सफाईची कामे आदी सुरू आहेत. पोलिओचा कार्यक्रम राबवण्यासाठी मदतनीस म्हणूनही या स्त्रिया जातात. शाळेच्या मुलांना दुपारचा खाऊ  बनवून देणे, रस्ता सफाई, कचरा उचलण्याचे पालिकेचे काम टेण्डर भरून घेतली जातात. सुमारे साडेतीनशे स्त्रियांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिले गेले होते. त्या सगळ्या आता स्वत:च्या पायावर उभ्या आहेत.

इतकी सगळी कामं करून त्यांनी आपल्या मुलाला वाढवले, त्या मुलाचे लग्न करून देतानाही त्यांनी त्याच मांडवात आणखी तेरा एकटय़ा असणाऱ्या स्त्रियांच्या मुलींचीही लग्न लावून दिली. बालहत्या रोखण्यासाठीही त्यांनी काम केले आहे. भारतबाई रूढार्थाने शाळेत गेल्या नसल्या तरी त्या जगाच्या शाळेत शिकलेल्या आहेत. सरकारी कागदपत्रं असोत, कायदे असोत, गरिबांसाठीच्या योजना असोत, कुठल्या कामाचे टेंडर भरणे असो सगळ्याची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे असते.

तुळजापूरच्या स्त्रियांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देणाऱ्या आणि तुळजापूर देवीच्या देवळाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वत: झटणाऱ्या भारतबाई यांच्या कर्तृत्वाला सलाम!

भारतबाई देवकर,

पत्ता- जिल्हा परिषद झोपडपट्टी, तुळजापूर. ६०५०७७७०४

‘विम’ प्रस्तुत ‘लोकसत्ता दुर्गा २०१६’चे सहप्रायोजक आहेत केसरी.

नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत ‘एबीपी माझा’.