गेली २८ वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून औषध संशोधन क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या आपल्या यंदाच्या पाचव्या दुर्गा आहेत, डॉ. कल्पना जोशी. त्यांनी आत्तापर्यंत कर्करोग व सांधेदुखीवरच्या औषधांची १० आंतरराष्ट्रीय  पेटंटस् मिळवली असून कर्करोग, अल्झायमर, एड्स, हिपॅटॅटायटीस सी व हृद्रोग यावरच्या २५ औषधांच्या पेटंटस्साठी अर्ज केला आहे. व्यवसायाबरोबरच सामाजिक भानही जपणाऱ्या डॉ. कल्पना जोशी यांच्या कर्तृत्वाविषयी.

‘ड्रग डिस्कव्हरी’ म्हणजे विविध रोगांसाठी औषध शोधून काढणं, हे अतिशय आव्हानात्मक क्षेत्र! त्यामुळे संशोधनाच्या या क्षेत्रात स्त्रियाही अगदी मोजक्याच, पण गेली २८ वर्षे बुद्धिमत्तेच्या जोरावर अत्यंत चिकाटीने कर्करोग व सांधेदुखीवरच्या औषधांची १० आंतरराष्ट्रीय पेटंटस् ज्यांनी मिळविली आहेत व आता कर्करोगाबरोबरच अल्झायमर, एड्स, हिपॅटॅटायटीस सी व हृद्रोग यावरच्या तब्बल २५ औषधांच्या पेटंटस्साठी ज्यांनी अर्ज केला आहे, असं  या क्षेत्रातील महत्वाचं नाव म्हणजे डॉ. कल्पना जोशी!

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

त्यांचं आयुष्य म्हणजे एक रोलर कोस्टर राइड आहे. प्रचंड बुद्धिमत्ता, संयम, सोशिकता, व निष्ठा या गुणांनी परिपूर्णता एकीकडे आणि नियतीचे सततचे फटकारे दुसरीकडे अशा दोन टोकांवरून त्यांच्या आयुष्याचा प्रवास सतत चाललेला आपल्याला दिसतो. पण त्यातल्या कोणत्याही फटकाऱ्याने त्या कोसळून पडल्या नाहीत वा खचून गेल्या नाहीत. आपल्या या संशोधन प्रवासाविषयी त्या म्हणाल्या, ‘‘ड्रग डिस्कव्हरी हे अतिशय थकविणारं, अनेकदा वैफल्य आणणारं क्षेत्र आहे. अनेकदा तर २४ मॉलिक्युल्सपैकी एखादा यशस्वी ठरतो. पण तो वैद्यकीय चाचण्यांच्या स्तरावर जाईपर्यंत कधी १२ ते १५ वर्षेही लागू शकतात. अनेकदा तो माणूस निवृत्तही होऊन जातो. पण त्याने शोधलेलं औषध वैद्यकीय चाचण्यांच्या स्तरापर्यंतही गेलेलं त्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे या क्षेत्रात यायला फारसे कुणी इच्छुक नसतात. इथे पगार कमी, रिटर्न्‍स कमी व कष्ट जास्त. त्यामुळे स्त्रिया तर या क्षेत्रात फारच कमी आहेत. पण मी भाग्यवान आहे म्हणा किंवा मला ते तंत्र जमलंय म्हणा मी शोधलेली पाच औषधं क्लिनिकल ट्रायलला गेली आहेत.’’

हे यश अर्थातच सहजसाध्य नव्हतं. कल्पनाताई आजतागायत सतत विपरीत परिस्थितीशीच झगडत आल्या आहेत. त्यामुळेच त्याचं यश जितकं नेत्रदीपक आहे, तितकीच त्यांची जीवन कहाणीही प्रेरक आहे. त्यांचे वडील गजाननराव पळशीकर याचं अकाली निधन झालं आणि ते कुटुंब विपन्नावस्थेच्या गर्तेत ढकललं गेलं. मात्र त्याही परिस्थितीत कल्पनाताईंनी घरची सगळी कामं सांभाळून, रोज एक-एक तास चालत नाशिकच्या बिटको कॉलेजमध्ये जाऊन जिद्दीने अभ्यास चालू ठेवला. बीएस्सीला त्या नाशिक जिल्ह्य़ात मुलींमध्ये पहिल्या आल्या. पुढे त्या एमएस्ससीच्या दुसऱ्या वर्षांला असतानाच पुणे विद्यापीठाने ‘मॉलिक्युलर बायॉलॉजी’ (आता ‘बायोटेक्नॉलॉजी’) हा विषय सुरू केला. हा विषय घेऊन त्या पुणे विद्यापीठात एमएस्सीला मुलींमध्ये दुसऱ्या आल्या, पण त्यांचे कष्ट संपले नव्हते. त्या सांगतात, ‘‘काबाडकष्ट करूनच अभ्यास हा माझ्या जीवनाचा स्थायिभाव बनला होता. एमएस्सीला असतानाच मी पीएच.डी.ची प्रवेश परीक्षा दिली होती. प्रवेशही मिळाला होता. दरम्यान, पुणे विद्यापीठातून ‘एन्टोमॉलॉजी’मध्ये एम्एस्सी केलेले माझे सहाध्यायी संजय जोशी यांच्याशी माझं लग्न झालं. तेव्हा मला ‘लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट’ची ६०० रुपयांची फेलोशिप मिळाली होती. त्या अंतर्गत ‘कॅन्सर रिसर्च इन्स्टिटय़ूट’मधून मी ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) वर संशोधन करत होते. एकीकडे सांसारिक जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे संशोधन असा संघर्ष करत मी अवघ्या साडेचार वर्षांत पीएच.डी. मिळविली. त्याच सुमारास मला मातृत्वाची चाहूलही लागली आणि ‘पोस्ट डॉक्टरल स्टडीज्’साठीचा माझा अर्ज अमेरिकेतील आयोवा विद्यापीठाने मंजूरही केला. पण आमच्या क्षेत्रात नुसतं पीएच.डी. होऊन उपयोग नसतो. पोस्ट डॉक्टरल स्टडीज् केल्या असतील तरच करिअरला आकार येतो. त्यामुळे संजयच्या आग्रहावरून माझ्या तीन महिन्यांच्या लेकीला त्याच्यावर सोपवून मी अमेरिकेला गेले. आज मागे वळून पाहताना आश्चर्य वाटतं की, खेडेगावातून आलेली, कधी काळी इंग्रजी बोलण्याचाही आत्मविश्वास नसलेली मी.. अमेरिका म्हणजे काय याची कल्पनाही नसताना तिथे एकटीने पोहोचायचं.. संशोधन करायचं धाडस केलं कसं?’’

त्या धाडसामागे त्यांचा ध्यास होता. त्यामुळेच संशोधन पूर्ण झाल्यावर तिथेच लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळणं शक्य असतानाही त्या परत आल्या. आधी काही काळ परळच्या वाडिया रुग्णालयात काम केलं. नंतर ‘हेक्स्ट मॅरिऑन, रसेल’ या आंतरराष्ट्रीय कंपनीत त्या संशोधक म्हणून रुजू झाल्या. ही कंपनी पुढे ‘निकोलस पिरामल’नं विकत घेतली. तिथे त्या कर्करोग विभागाच्या संचालिका होत्या. पण पुढे तीही बंद पडली. आज त्या ‘सिप्ला’ कंपनीत ‘सेल बायॉलॉजी अ‍ॅण्ड डिस्कव्हरी इंजिन’च्या प्रमुख म्हणून काम करतायत.

या क्षेत्रात एक तर कंपन्या कमी त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी आणि त्यात अन्य क्षेत्रांप्रमाणे यात एक नोकरी सोडली आणि दुसरी धरली असं स्वरूप नसतं. ती कंपनी बंद झाली म्हणजे तिथे तोवर अगदी चिकाटीने केलेल्या सगळ्या संशोधनावर पाणी सोडायचं आणि शुन्यापासून पुन्हा सुरुवात करायची.. कल्पनाताईंनी खचून न जाता, हार न मानता तेच केलंय. अवघ्या साडेतीन वर्षांत कर्करोगाबरोबरच अल्झायमर, एड्स, हिपॅटॅटाटीस सी व हृद्रोग या पाचही रोगांवरील ‘फ्री क्लिनिकल रिसर्च’ यशस्वीपणे संपवत आणलंय. आता त्या ‘मॉलिक्युल्स’चं प्रोफायलिंग चालू आहे. २५ औषधांच्या पेटटंसाठी त्यांनी अर्जही केलाय. हे यश लक्षणीय आहे.’

व्यावसायिक आणि सांसारिक जबाबदाऱ्यांबरोबर कल्पनाताईंनी सामाजिक भानही जपलंय. कर्करोग हा त्यांचा अभ्यासाचाच विषय असल्याने अनेक हतबल कर्करोगग्रस्तांना मानसिक बळ देण्यापासून ते त्यांच्या योग्य उपचारासाठी दिशादर्शन करण्यापर्यंत सारं काही त्या करतात. तसंच तरुणांना करिअरच्यादृष्टीने योग्य मार्गदर्शन करून अनेक हुशार मुलांना विदेशातील विद्यापीठात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कल्पनाताईंचं व्यावसायिक यश तर प्रेरणादायी व समाजाला आपल्या ऋणात बांधून घेणारं आहेच. पण त्यांनी दाखवलेली ही सामाजिक जबाबदारीची जाणीवही कौतुकास्पद आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम!

डॉ. कल्पना जोशी

kalpanajoshi2004@yahoo.co.in

विमप्रस्तुत लोकसत्ता दुर्गा २०१६चे सहप्रायोजक आहेत केसरी.

 नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत एबीपी माझा’.