गर्भवती महिला आणि कुपोषित मुले यांचे आरोग्य सुधारणे हे लक्ष्य ठेवून विक्रमगड तालुक्यातील २५ गावांमध्ये आरोग्य सुविधा निर्माण करणाऱ्या आणि गावे कायमस्वरूपी कुपोषणमुक्त करण्याचा विडा उचलणाऱ्या आपल्या यंदाच्या आठव्या दुर्गा आहेत

डॉ. सुजाता गोडा. आदिवासी महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यातल्याच ५० जणींना स्वास्थ्यसेविका म्हणून तयार करणाऱ्या आणि यंदा १६ हजारहून अधिक रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. सुजाता गोडा यांच्या कर्तृत्वाविषयी..

पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड तालुक्यातील भोपोली या गावासह अन्य २५ गावं कुपोषणमुक्त करण्याचा विडा डॉ. सुजाता गोडा यांनी उचलला आहे. या गावांमध्ये काम करायला प्रांरभ करून आता २० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात डॉक्टरांवर विश्वास ठेवण्यापासून ते त्यांच्याचकडून उपचार करून घेण्यापर्यंत बदल झाले आहेत. त्यामुळे यावर्षी डॉ. सुजाता यांना जवळपास १६ हजारहून अधिक रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले आहे. महिलांचे सबलीकरण, किशोरवयीन मुलींचे आणि लहान मुलांचे आरोग्य सुधारणे याशिवाय बचतगटाद्वारे स्त्रीसक्षमीकरण, पर्यावरण जाणीव व संवर्धनआणि ग्राम विकास यात डॉ. सुजाता यांचा प्रामुख्याने सहभाग आहे.

१९८७ मध्ये वैद्यकीय सेवा, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून डॉ. एम.एल. ढवळे यांचे विद्यार्थी आणि रुग्ण यांनी मिळून ‘डॉ. एम.एल. ढवळे ट्रस्ट’ची स्थापना केली. डॉ. सुजाता त्या ट्रस्टच्या सदस्य झाल्या. १९८९ मध्ये त्यांचे एम.डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांनी या ट्रस्टच्या माध्यमातून दहिसर, देवनार, माहुल येथील झोपडपट्टीत चालवणाऱ्या दवाखान्यांमध्ये काम केले. तेथे काम करताना त्यांना समाजात आरोग्यविषयक अनास्थेची जाणीव झाली आणि तेथेच त्यांना भविष्याचा मार्ग सापडला.  ट्रस्टच्या माध्यमातूनच पती डॉ. चंद्रशेखर गोडा यांच्याप्रमाणेच ग्रामीण भागात जाऊन काम करायचे त्यांनी ठरवले.

१९९० मध्ये त्यांनी पालघर आणि आसपासच्या गावांमध्ये कामाला सुरुवात केली ते आजतागायत सुरूच आहे. तेथे काम करताना त्यांना गावा-गावांत अनेक समस्या जाणवल्या. त्यातील प्रमुख समस्या होती रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये  दुवा नसण्याची. डॉक्टरवर विश्वास निर्माण व्हावा याचीच. यातूनच डॉ. सुजाता यांना आदिवासींमधूनच स्वास्थ्यसेविका तयार करण्याचा मार्ग सुचला. डॉ. सुजाता यांनी त्या काळात पाडे न पाडे पालथे घातले. तेथील काही आदिवासी महिलांना विश्वासात घेऊन तयार केले आणि त्यांना आरोग्यविषयक प्रशिक्षण देण्याचे शिवधनुष्य उचलले. आज ट्रस्टच्या ५० स्वास्थ्यसेविका विक्रमगड तालुक्यात कार्यरत आहेत. या स्वास्थ्यसेविकांना किरकोळ आजारांत औषधोपचार करणे, आपत्कालीन प्रसंग ओळखून डॉक्टरांशी  संपर्क साधणे, गर्भवती महिलांना गोळ्या देणे अशा गोष्टींचे प्रशिक्षण त्यांनी दिले. हे कार्य करत असतानाच डॉ. सुजाता यांनी या भागातील माता कुपोषणाकडे प्रामुख्याने लक्ष पुरवले. गर्भवतींना लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या देणे, योग्य आहार कसा मिळेल हे पाहणे, येथील महिलांना निरोगी आणि स्वच्छ राहण्याचे महत्त्व पटवून देणे, विविध आजार, साथी यांचा सामना कसा करायचा याबाबत महिलांची शिबिरे आयोजित करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम डॉ. सुजाता गोडा यांनी सुरू केले. त्यातूनच येथे जन्मदर तर वाढलाच शिवाय प्रसूतीसाठी दवाखान्यात येण्यापर्यंत येथील महिलांचा विश्वासही वाढला. गेल्या काही वर्षांत त्यांनी त्यांच्या टीमसह दोन हजारहून अधिक आदिवासी स्त्रियांच्या प्रसूती केल्या आहेत.

येथील बाल कुपोषणाच्या मुख्य समस्येचे कारण म्हणजे अल्पवयीन आणि कुपोषित माता. हे टाळण्यासाठी त्यांनी किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन सुरू केले. त्याचे फलस्वरूप म्हणजे आता येथील बालविवाहांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहे, विशेष म्हणजे येथील आदिवासी मुलीच आता आपल्या पालकांना लहान वयात लग्न करण्याचे धोके समजावून सांगत विरोध करत आहेत.

कुपोषणावर काम करणे म्हणजे काही महिन्यांचे काम नव्हे, तर तेथील आदिवासींच्या दोन-तीन पिढय़ांवर काम करायला लागणार आहे. हे लक्षात घेऊनच आता डॉ. सुजाता आणि त्यांच्या स्वास्थ्यसेविका भोपोलीसह २५ गावांमध्ये आणि जवळपास १५० पाडय़ांमध्ये काम करत आहेत.  पुढील पाच वर्षांत ही गावे कुपोषणमुक्त करण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यामुळे या परिसरातील महिलेची प्रसूती कुठेही होवो पण त्यांची नऊ महिने काळजी

डॉ. सुजाता आणि त्यांच्या स्वास्थ्यसेविका घेत असतात. त्यांची औषधे, आहाराविषयीच्या सूचना यांच्याकडे डॉ. सुजाता यांची करडी नजर असते.

भोपोली येथे ‘ढवळे ट्रस्ट’च्या माध्यमातून दहा बेडचे हॉस्पिटल सुरू असून यामार्फतही त्यांनी हजारो रुग्णांना सेवा दिली आहे. येथील महिला किंवा रुग्णांवर केवळ औषधोपचार करून भागणार नाही तर त्यांना योग्य आहार घेता यावा यासाठी त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करणेही गरजेचे आहे, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून बचतगट सुरू केले. सरकार ग्रामीण भागातील लोकांसाठी चालवत असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, विहिरी खोदणे अशीही कामे केली. यामुळे येथील महिलांची पाठदुखीची तक्रार दूर करण्यात काही अंशी त्यांना यश आले. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी ट्रस्टच्या मदतीने पालघर येथे रुग्ण सहायकाचे प्रशिक्षण सुरू केले. हे प्रशिक्षण पूर्ण केलेले अनेक जण आज विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत. या अभ्यासक्रमासाठी मुलांना समजेल, रुचेल अशा शब्दांत पुस्तक लिहिण्याचे कामही सध्या त्या करत आहेत.

त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती करण्यास येथील लोकांना उद्युक्त करणे, पर्यावरण जाणीव व संवर्धन या दृष्टीने रानभाज्या मेळावा सुरू करणे अशा अनेक कामांमध्ये त्यांचा सहभाग आहे. ग्रामसभा, शाळेत मुलांसाठी व खास महिलांसाठी सभा घेणे, समाज प्रबोधनाचे काम करणे, याबरोबरच व्यसनमुक्ती करणे आदी विविध कामांमध्ये डॉ. सुजाता  मार्गदर्शन करतात. खरूज या रोगावरही त्या ट्रस्टच्या माध्यमातून संशोधन करत आहेत. त्याचप्रमाणे ढवळे ट्रस्टमध्ये सहभागी होणाऱ्या नवोदित डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचे कामही त्या करत असतात. हे काम एकटीचं नाही तर इथवर येईपर्यंत सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाच्या सहभागातूनच झालं आहे याचा वारंवार नम्रपणे त्या उल्लेख करतात.

पालघर जिल्ह्य़ातील आदिवासींच्या जीवनात आरोग्याची पहाट आणणाऱ्या डॉ. सुजाता यांच्या कर्तृत्वाला सलाम!

डॉ. सुजाता गोडा

सदस्य, डॉ. एम.एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट भोपोली, ता. विक्रमगड, जिल्हा पालघर

संपर्क – ९८३३४३७३४३

  • विमप्रस्तुत लोकसत्ता दुर्गा २०१६चे सहप्रायोजक आहेत केसरी.
  • नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत एबीपी माझा’.