अंध मुलींसाठी निवासी वसतिगृह स्थापन करून त्यांना स्वावलंबी करणाऱ्या, ४५०० पुस्तकांचे ग्रंथालय उभारणाऱ्या, अंध असूनही समाजातील लोकांसाठी डोळसपणे काम करणाऱ्या आपल्या यंदाच्या सातव्या दुर्गा आहेत, राधा बोरडे. एम.ए.ला नागपूर विद्यापीठातून दुसऱ्या आलेल्या आणि आता ‘उत्कर्ष असोसिशन फॉर ब्लाइंड’ संस्थेमार्फत अंध व्यक्तींसाठी अनेकविध उपक्रम राबविणाऱ्या, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वत:ला घडवणाऱ्या राधा बोरडे यांच्या कर्तृत्वाविषयी.

लहानपणीच आजारात दृष्टी गमावूनही जिद्दीने सर्व कठीण परिस्थितीवर मात करत अंधांच्याच नव्हे तर डोळसांसमोरही स्वकार्यातून आदर्श निर्माण करणाऱ्या राधा बोरडे-इखनकर, ‘जगणं सर्व शिकवतं’ हे  अनुभवातूनच शिकलेल्या तत्त्वज्ञानाने त्यांना स्वच्या पलीकडे जाऊन परदु:ख समजून घेण्याची ताकद दिली आणि या ताकदीतूनच त्यांनी नागपूरमध्ये समाजोपयोगी कामे उभी केली आहेत. अंध आणि डोळसांसाठी वाचनालयाच्या स्थापनेबरोबरच ‘उत्कर्ष असोसिशन फॉर ब्लाइंड’ ही संस्था सुरू केली. त्याअंतर्गत अंध मुलींसाठी त्या ‘संस्कार’ निवासी वसतिगृह चालवतात. याशिवाय जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त पांढऱ्या काठय़ांच्या वाटपाबरोबर, दिवाळीचा फराळ आणि प्रत्येकी १० किलो तांदळाचे वाटप करून गरिबांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतात.

vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
nmmc chief dr kailas shinde visit municipal corporation hospitals in vashi
औषधचिठ्ठी न देण्याच्या धोरणाचे काटेकोर पालन करा; नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

मला शाळेत घाला नाही तर मी जेवणारच नाही, असे म्हणून ठिय्या आंदोलन केलेल्या राधाने अखेर अंध विद्यालयात प्रवेश घेतल्यावरच उपास सोडला आणि त्याच जिद्दीच्या जोरावर कायम प्रथम वर्ग मिळवला. इतकेच नाही तर नागपूर विद्यापीठात एम.ए.ला त्या दुसऱ्या आल्या.  पहिली आलेली मुलगी डोळस होती आणि राधांपेक्षा तिला फक्त एक गुण जास्त होता.  दरम्यान, त्यांचे  पुंडलिक बोरडे यांच्याशी विवाह झाला. तेही दृष्टीहीन आहेत. शिक्षक व्हायचे स्वप्न असलेल्या राधा यांनी बी.एड.ही केले आणि चार वर्षे लेक्चरर म्हणून कामही केले. मात्र मुलीच्या, मधुराच्या वेळी बाळंतपणाच्या गुंतागुंतीत त्यांना नोकरी सोडावी लागली, जी त्यांना त्या ‘अंध’ आहेत या कारणास्तव अद्याप मिळाली नाही. ते त्याचे शल्य असून लेक्चरर व्हायचं स्वप्न अद्याप त्या बाळगून आहेत. पण त्याने खचून न जाता समाजोपयोगी करण्याचे काम कोणत्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न करता त्या करतात.

सुमारे २४ वर्षांपूर्वीच त्यांनी ‘अंध महिला विकास बहुउद्देशीय संस्थे’च्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात केली होती. दृष्टी नसणे हे काही त्याच्या समाजकार्याच्या आड आले नाही. पुढे त्या संगीत विशारदही झाल्या आणि एमएस-सी.आय.टी. करून माहिती तंत्रज्ञानाबरोबरही स्वत:ला जोडून घेतले. कारण आजचीच नव्हे तर पुढच्याही पिढय़ा या संगणकाशीच जुळलेल्या असणार आहेत, हे त्यांना पक्कं माहीत आहे. आज त्या संगणक, मोबाइलचा वापर सहजपणे करतात.

पुढे अंध आणि डोळसांमधील दरी कमी व्हावी, एकमेकांची जीवनपद्धती समजावी या हेतूने राधा यांनी २००४ मध्ये ‘लुई-राम’ वाचनालय घरातच अपुऱ्या जागेत सुरू केले. त्यांचे काम पाहून एका सद्गृहस्थांनी ५०० रुपयांच्या मासिक भाडय़ावर मोठी जागा वाचनालयासाठी दिली. आज या ग्रंथालयात २००० ब्रेल लिपीतील पुस्तकांसह ४५०० पुस्तके असून त्याचा लाभ सगळेच जण घेत आहेत. पण एवढय़ापुरते काम मर्यादित न ठेवता अंध व्यक्तींसाठी ठोस काही तरी करावे, या उद्देशाने त्यांनी ‘उत्कर्ष असोसिशन फॉर ब्लाइंड’ ही संस्था २०१२ मध्ये सुरू केली. त्याअंतर्गत ‘संस्कार’ नावाचे निवासी वसतिगृह केवळ अंध मुलींसाठी त्या चालवतात. आता त्यांच्याकडे वसतिगृहासाठी हक्काची जागा आहे. सध्या येथे आठवी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या १० मुली आहेत. त्यांच्याकडे पूर्ण वेळ लक्ष द्यावे लागत असल्याने आणि  मुलींना कठीण वाटणारे विषय त्या स्वत: शिकवत असल्याने सध्या तरी त्यापेक्षा जास्त मुली त्यांना घेता येत नाहीत. अत्यंत गरीब, ग्रामीण भागातल्या या मुलींच्या शालेय वस्तूंपासून ते दैनंदिन जेवणापर्यंतच्या सर्व गोष्टी  केवळ दात्यांच्या माध्यमातून पूर्ण कराव्या लागतात. त्यासाठीचा खर्च महिना ४० हजार रुपये आहे.

अंध मुलींना स्वयंपाक शिकवणे हा एक त्यांचा आवडता उपक्रम. देणगीदार मिळाला की त्या शिबीर घेतात. त्यासाठी मुंबई, नाशिक, अकोला, चाळीसगांवहूनही मुली येतात. अंध असली तरी प्रत्येकीला स्वत:चे जेवण करता आले पाहिजे, या विषयी त्या आग्रही आहेत. किमान चहा, नाश्ता, भाजीपोळी, वरणभात करता आले की या मुलींचे पुढे काहीही अडणार नाही, ही त्यांची या मागची भूमिका. अन्यथा या मुली त्यांच्या कुटुंबीयांसाठी लोढणे ठरतात. या निवासी शिबिरात अशा काही मुली येतात ज्यांना लागेल, पडेल, अपघात होईल या भीतीमुळे कुटुंबीयांनी स्वयंपाकघरात पायही ठेवायला दिलेला नसतो. त्यांना अगदी गॅसची शेगडी कशी असते, ती कशी पेटवावी, भाज्या कशा कापाव्यात, बटाटे कसे सोलावेत इतक्या छोटय़ा गोष्टींपासून प्रशिक्षण द्यावे लागते. अनेक मुली यामुळे स्वावलंबी झाल्या आहेत.

जागतिक पांढरी काठी दिन दरवर्षी

१५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. यावर्षी उत्कर्ष संस्थेच्या माध्यमातून राधाताई २३ ऑक्टोबरला हा दिन साजरा करणार आहेत. दिवाळी देशभरात साजरी केली जाते. पण अशीही काही अंध व्यक्तींची घरे असतात, जिथे दोन्ही वेळचे रोजचे जेवणही मिळत नाही इतकी गरिबी असते. या दोन्हीचा समन्वय साधून अंध व्यक्तींना पांढऱ्या काठय़ांचे वाटप केले तर जातेच पण दिवाळीचा फराळ आणि प्रत्येकी १० किलो तांदूळ वाटप केले जाते. दरवर्षी ४० ते ५० अंध व्यक्ती याचा लाभ घेतातच, पण डोळस गरीब लोकांचाही समावेश असतो. या कार्यक्रमासाठी त्यांना दरवर्षी अडीच ते तीन क्विंटल तांदूळ लागतो. एव्हाना राधाताईंनी दोन क्विंटल तांदूळ मिळवलेत आणि आणखी मिळवणे सुरूच आहे.

संसार, अगदी रोजचा स्वयंपाकही स्वत: करणाऱ्या राधा यांना घर आणि संस्था सांभाळताना अनेकदा  तारेवरची कसरत करावी लागते. वाईट अनुभवही येतात, पण त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याने प्रत्येक गोष्टीतून त्या मार्ग काढतातच. कित्येकांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी, पुस्तकांसाठी, घरखर्चासाठी आर्थिक मदत त्या करतात. पण त्यांचेही आर्थिक स्रोत मर्यादित असल्याने ती मदत कमी पडते. समाजातल्या दानशूरांनी सढळ हाताने मदत केल्यास त्यांचा हा मदतीचा, ज्ञानयज्ञ असाच चालू राहील असे त्यांना वाटते. स्वत: दृष्टीहीन असूनही गरजूंसाठी डोळसपणे काम करणाऱ्या राधाताईंना आमचा सलाम!

राधा बोरडे

प्लॉट क्र. ५१ महालक्ष्मी नगर क्र.३ मानेवाडा, नागपूर ४४००२७

४२३६३७६१४

  • ‘विम’ प्रस्तुत ‘लोकसत्ता दुर्गा २०१६’चे सहप्रायोजक आहेत केसरी.
  • नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत ‘एबीपी माझा’.