untitled-5

लांडगा, तरस यांच्याबरोबरच साप, वानर, हरीण, घुबड आदी १५ हजार जखमी प्राण्यांवर उपचार करून त्यांची प्रेमाने शुश्रूषा करून त्यांच्या अधिवासात सुखरूप नेऊन सोडणाऱ्या साप, सरडे, पाली यांच्याविषयीच्या अंधश्रद्धांचे निर्मूलन करणाऱ्या आपल्या यंदाच्या तिसऱ्या दुर्गा आहेत, सृष्टी सोनवणे.  त्यांचे ‘सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र’ अनेक जखमी प्राण्यांचे आश्रयस्थान झाले आहे. दुष्काळी भागातील प्राण्यांसाठी पाणवठे उभारणाऱ्या प्राणिमैत्रीण सृष्टी यांच्या कर्तृत्वाविषयी.

Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?
anna hazare arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा माणूस कधी…”

वन्यप्राण्यांवर आणि तेही जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करणे आणि आईच्या ममतेने सांभाळणे ही तशी धाडसाचीच गोष्ट. मात्र बीड जिल्ह्य़ातल्या शिरुरकासार तालुक्यातील तागडगाव येथे राहणाऱ्या सृष्टी सोनवणे मोठय़ा प्रेमाने या गोष्टी करतात. म्हणूनच आतापर्यंत त्यांनी १५ हजारांहून अधिक वन्यजीवांवर (यात लांडगा, तरस यांच्याबरोबरच साप, वानर, हरीण, घुबड आणि अन्य) उपचार करून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले आहे. प्राणिमित्र असणाऱ्या पतीने, सिद्धार्थने जखमी प्राण्यांना गोळा करून सृष्टी यांच्या हवाली करायचे, पुढे त्या प्राण्याला अधिवासात सोडेपर्यंत त्याची सगळी देखभाल सृष्टी यांनी करायची हा त्यांचा शिरस्ता. सृष्टी सर्पमित्रही आहेत. साप, सरडे, पाली यांच्याविषयीचे गैरसमज दूर करून अंधश्रद्धा निर्मूलनाचेही कार्य त्या करतात. आज त्यांचे ‘सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र’ अनेक जखमी प्राण्यांचे आश्रयस्थान झाले आहे.

शिरुरकासार तालुक्यातील तागडगाव हेच सृष्टी औसरमल यांचे गाव. तेथेच राहणाऱ्या त्यांच्या मामाचा मुलगा सिद्धार्थ सोनवणे हा त्यांचा लहानपणापासूनचा मित्र. लहानपणापासूनच सिद्धार्थला वन्यप्राण्यांचे आकर्षण. त्यातूनच मग साप पकडणे त्यांना जंगलात सोडणे, जखमी पशु-पक्ष्यांवर उपचार करून त्यांना बरे करणे हा नादच सिद्धार्थ यांना लागला. सृष्टी सिद्धार्थपेक्षा पाच सहा वर्षांनी लहान. सात-आठ वर्षांच्या असल्यापासून त्या सिद्धार्थबरोबर साप पकडायला, पक्ष्यांना हाताळायला शिकल्या. लहान वयातच वन्यप्राण्यांची भीती निघून गेली आणि त्याची जागा प्रेमाने घेतली. सृष्टी यांच्या वडिलांचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांना दहावीनंतर शिक्षण घेता आले नाही. मात्र सिद्धार्थकडून त्यांनी वन्यजीव संगोपनाचे धडे तन्मयतेने गिरवले.

सिद्धार्थ आणि त्याच्या समविचारी मित्रांनी २००१ मध्ये ‘वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सँक्च्युअरी असोसिएशन’ (डब्ल्यूपीएसए) ही संस्था स्थापन केली. या संस्थेअंतर्गत त्यांनी जखमी प्राणी गोळा करायचे आणि त्यांच्यावर उपचार, शुश्रूषा आदी गोष्टी सृष्टी यांनी करायची हे ठरूनच गेलेले. एखादा प्राणी जखमी सापडला तर दूरदूरहून या दोघांशी संपर्क साधला जाऊ लागला. एकच आवड आणि ध्येय झालेल्या सृष्टी आणि सिद्धार्थ यांनी २०१० मध्ये विवाह केला. त्यांचा विवाहदेखील त्यांच्या या अनोख्या आवडीची साक्ष देतो. या दोघांनी पक्षीदिनी सौताडा जंगलात फुलांच्या हाराऐवजी सर्पाचे हार एकमेकांच्या गळ्यात घातले आणि आलेल्या पाहुण्यांनी बियांच्या अक्षता टाकून त्यांना आशीर्वाद दिले. यावेळी आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते सव्वाशे वृक्षांचे रोपणही केले गेले. पुढे त्यांची मुलगी सर्पराज्ञी हिच्या जन्मदिनी २०१२ मध्ये ११ एकराच्या माळरानावर ‘सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र’ सुरू केले. या केंद्रात वन्यजीवांसाठी ५० x २० आकाराचे आठ पिंजरे उभे केले आहेत. वस्तीपासून दूर वनात थाटलेल्या त्यांच्या संसारात तहानेने व्याकूळ होऊन जखमी झालेला लांडगा, तरस, देवी रोगामुळे अंध झालेला मोर, गारपिटीने जखमी झालेले पक्षी, शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडलेले हरीण, माकड, उदमांजर, घोरपड,  घुबड, तीतर, बगळे, पोपट, कावळे, साप, अजगर असे प्राणी-पक्षी वन्यजीव हेच सृष्टीचे आप्तेष्ट झाले आणि वन्यजीवांचा सांभाळ हेच सृष्टी यांचे जगणे झाले आहे. सृष्टी इतक्या लीलया साप आणि सर्व प्राणी हाताळतात की पाहणाऱ्यांचाही ठोका चुकतो. प्राणी स्वत:हून कधीच हल्ला करत नाहीत मग ते जखमी का असेना, त्यामुळे अद्याप आपल्याला अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागले नसल्याचे सृष्टी आवर्जून सांगतात.

बीड जिल्ह्य़ातच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्य़ातही कोणी वन्यजीव जखमी अथवा अनाथ सापडला की ‘सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रा’त आणले जातात. या केंद्रात आणल्या जाणाऱ्या प्रत्येक प्राण्याची नोंद वनविभागाकडे करण्यात येते. प्राण्यांना झालेली दुखापत छोटी असेल तर त्यांच्यावर केंद्रातच उपचार केले जातात. मात्र मोठय़ा जखमा, दुखापतींसाठी बीड, शिरुर इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन तज्ज्ञांकडून उपचार करून घेतले जातात. त्यानंतर त्यांना पुनर्वसन केंद्रात पूर्णपणे बरे होईपर्यंत ठेवले जाते. पूर्ण उपचारानंतर त्यांना पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडले जाते. सृष्टी सांगतात, ‘पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय चौधरी, डॉ. नीलेश सानप यांची वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी मोलाची मदत होते.’ प्राण्यांच्या देखभालीविषयी सृष्टी सांगतात, ‘प्राणी शाकाहारी असतील तर त्यांच्यासाठी चार ते पाच हजार रुपयांचा खर्च येतो. तर मांसाहारी प्राण्यासाठी हाच खर्च दहा हजारांच्या घरात जातो.’ सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राला शासकीय मान्यता असली तरी कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. त्यांचा आणि केंद्राचा उदरनिर्वाह हा त्यांच्या सहा एकर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर चालतो. असे असतानाही प्राण्यांचे कुटुंब आणि स्वत:चे एकत्र कुटुंब यांच्या खर्चाचा मेळ तिशीही न गाठलेल्या सृष्टी उत्तमरीत्या घालतात. म्हणूनच मराठवाडय़ासारख्या दुष्काळी भागात आसपासच्या परिसरात आपल्या वन्यजीव केंद्रामार्फत प्राण्यांसाठी पाणवठे उभे करण्याचे काम त्या करू शकतात.

सृष्टी आणि त्यांच्या केंद्रासमोरची मोठी अडचण म्हणजे जखमी प्राण्यांची वाहतूक. त्यासाठी त्यांच्याकडे गाडी नाही. अनेकदा मिळेल त्या वाहनातून प्राण्याला केंद्रात घेऊन यावे लागते. त्याचप्रमाणे पुनर्वसन केंद्रात निसर्ग परिचय केंद्रही सुरू करण्याचा सृष्टी यांचा मानस आहे. शिवाय प्राण्यांसाठी अनेकदा पिंजरेही कमी पडतात. मात्र निसर्ग संवर्धन आणि पर्यावरणप्रेमापोटी झोकून देऊन काम करणे कधीच संपणार नसल्याचे सृष्टी सांगतात. आतापर्यंत १५ हजारांच्या वर वन्यप्राण्यांनाही जीव लावणाऱ्या, त्यांची शुश्रूषा करणाऱ्या सृष्टी यांच्या कर्तृत्वाला सलाम!

– वसंत मुंडे