मुंबई : मराठी रंगभूमीवरील दर्जेदार आणि वेगळे नाटय़प्रयत्न  अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावेत यासाठी ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमाद्वारे नव्या नाटकांना प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेनुरूप निर्माते यशवंत देवस्थळी आणि नाटय़संपदा कला मंच प्रस्तुत ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ या नव्या नाटकावर ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ची मोहोर उमटली आहे. या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांचे आहे.

आधुनिक मराठी रंगभूमीच्या जन्मापासून म्हणजेच  १८४३पासून ते १९८३ सालापर्यंतच्या तिच्या प्रवासातले टप्पे अधोरेखित करणारे हे नाटक आहे. रसिक आणि रंगभूमी यांच्यातील पती-पत्नीचे कल्पित नाते आणि या नात्यातील चढउतार यांवर हे नाटक बेतले आहे. त्यांच्या संसारातील प्रणय, अनुराग, लटकी भांडणं,  संशयकल्लोळ, समरप्रसंग असे सर्वसाधारण संसारांत घडणारे सगळे अध्याय ‘चि. सौ. कां. रंगभूमी’च्या संसारातही घडतात. परंतु या सगळ्यावर मात करत त्यांच्यातले नाते आजही अक्षय आहे ते त्यांच्या परस्परांवरील निस्सीम प्रेमामुळेच! या साऱ्याचे दर्शन घडवणारे हे नाटक!

या वाटचालीत मराठी रंगभूमीवर मैलांचे दगड ठरलेल्या नाटकांतील प्रवेश आणि संगीत रंगभूमीच्या अवीट ठेव्याची झलक दर्शवणारी अजरामर नाटय़पदे.. तीही आजच्या तरुण कलावंतांच्या पिढीने सादर केलेली.. हेही या नाटकाचे महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ ठरावे.

या नाटकाच्या सर्जनशील प्रक्रियेबद्दल संपदा जोगळेकर-कुळकर्णी म्हणाल्या की, ‘‘संगीत मत्स्यगंधा या नाटकाचं दिग्दर्शन करताना संगीत रंगभूमीचा सखोल अभ्यास झाला. या अभ्यासाचे पुढे काय करायचे ते मला कळेना. मी निर्माते अनंत पणशीकरांसोबत या विषयावर अनेकदा बोलत असे. त्यातूनच ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ नाटकाचे बीज मनात रुजले. मराठी रंगभूमीची वाटचाल हा गाभा केंद्रस्थानी ठेवून मी रंगभूमी आणि रसिक यांच्यातील नाते उलगडण्याचा प्रयत्न यात केला आहे. त्याकरता मैलांचे दगड ठरलेल्या नाटकांतील प्रवेश निवडताना आम्हाला खूप कष्ट पडले. कारण गेल्या सुमारे १४० वर्षांतील नाटकांमधून हे प्रवेश निवडायचे होते. तसेच संगीत रंगभूमीची वैभवपताका असलेली नाटय़पदेही त्यात समाविष्ट करायची होती. आणि हे सर्व पुन्हा नाटकाच्या फॉर्ममध्ये तीन तासांत बसवायचे होते. ही कसरत करताना दमायला झाले. परंतु निर्मितीचा सर्जनशील आनंदही तितकाच मिळाला.’

नाटय़निर्मितीच्या क्षेत्रात प्रथमच उतरलेले निर्माते यशवंत देवस्थळी म्हणाले : ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ चित्रपटाची निर्मिती केली. त्यानंतर अनेक जण सिनेमा आणि नाटकांचे प्रस्ताव घेऊन येत होते. परंतु मला उत्तम संहिता सापडल्याशिवाय या क्षेत्रात उतरायचे नव्हते. निर्माते अनंत पणशीकर यांनी ‘सं. मत्स्यगंधा’च्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव आणला होता. परंतु काही अडचणींमुळे ते झाले नाही. त्यानंतर ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ हे नाटक घेऊन पणशीकर आले. संपदाने वाचलेले नाटक मला आवडले. संगीत रंगभूमीचा वैभवशाली काळ ते आजच्या रंगभूमीपर्यंतचा प्रवास रेखाटणारे हे नाटक काहीसे वेगळे होते. त्याची कथाकल्पना मला आवडली. यानिमित्ताने नव्या, तरुण कलावंतांना रंगभूमीवर आपला हुन्नर दाखवायची संधी देता येईल, हाही विचार मनात होताच. आजच्या पिढीसमोर चांगले संगीत येणे गरजेचे आहे, असे मला नेहमीच वाटत आले आहे. ते या नाटकाच्या निमित्ताने करता येईल, हाही एक उद्देश होता. एखादी कलात्मक निर्मिती करायची म्हटली की धाडस हे करावेच लागते. अर्थात मी आणि अनंत पणशीकर यांनी नाटकाच्या अर्थकारणाचाही नीट विचार केला आहे. सगळ्या स्तरांतील प्रेक्षकांना भावेल अशा नाटय़निर्मितीचा हा प्रयत्न आहे.’

‘सं. मत्स्यगंधा’ या नाटकामुळे अनंत पणशीकर हे संपदा जोगळेकरांच्या संपर्कात आले. त्यानंतर संगीत रंगभूमीसंदर्भात वेळोवेळी चर्चा करताना या नाटकाचे बीज लेखिका संपदा जोगळेकरांच्या मनात आले. त्यानंतरच्या लेखनप्रक्रियेतही या दोघांमध्ये चर्चा, विचारविनिमय होत राहिला. त्याचेच फलित म्हणजे ‘चि. सौ. कां. रंगभूमी’ हे नाटक! ‘रसिकांना मराठी रंगभूमीच्या वैभवशाली काळाचे दर्शन घडवणारे हे नाटक गतरम्यतेचा आनंद देईलच; शिवाय रंगभूमीवर घडलेल्या स्थित्यंतरांचेही अवलोकन त्यांना करता येईल,’ असा विश्वास निर्माते अनंत पणशीकर यांनी व्यक्त केला.