महाराष्ट्रभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचे व्यासपीठ होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्रभरातील अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी दूरध्वनीद्वारे विनंती केल्यानंतर त्यांच्या आग्रहाला मान देत हा बदल केला आहे. त्यामुळे आता महाविद्यालयांतील नाटय़वेडे तरुण निर्धास्त होऊन तालमीला लागणार आहेत. याआधी २२ नोव्हेंबरपासून सुरू होणारी सॉफ्ट कॉर्नर प्रस्तूत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी आता नव्या वेळापत्रकानुसार ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक २५ नोव्हेंबर असेल. त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी नव्या संहितेची अटही शिथील करण्यात आली असून १ जानेवारी २०१४ आणि त्याच्यापुढे रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र मिळालेल्या एकांकिका सादर केल्या जाऊ शकतात. या स्पर्धेसाठी झी मराठी हे माध्यम प्रायोजक असतील. तर स्पर्धेतील लक्षणीय कलाकारांना उत्तम संधी मिळावी, यासाठी टॅलेण्ट सर्च पार्टनर म्हणून आयरीस प्रॉडक्शन्स ही कंपनी लक्ष देईल. सोबत स्पर्धेत तब्बल साडेतीन लाख रुपयापर्यंतच्या बक्षिसांची लयलुट होणार आहे.
55‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अर्जासंबंधी माहिती विचारण्यासाठी नाशिक, अहमदनगर, पुणे, मुंबई अशा सर्वच केंद्रांवरील दूरध्वनी खणखणू लागले. चौकशीसाठी येणाऱ्या दूरध्वनींपैकी अनेकांचा सूर विनंतीचा होता. अर्ज सादर करण्याच्या तारखा पुढे ढकलता येतील का, एवढय़ा कमी दिवसांत एकांकिका कशी बसणार, प्राथमिक फेरी पुढे ढकलता येईल का, अशी विचारणा अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी केली. महाराष्ट्रभरातील महाविद्यालये १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने त्याआधी अर्ज भरणे कठीण जाणार असल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.
या विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आता ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर असेल. तसेच विविध केंद्रांवरील प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल. याआधी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नव्या संहितेची अट होती. मात्र ही अट शिथील करून १ जानेवारी २०१४ आणि त्यापुढे रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र मिळालेल्या एकांकिका आता या स्पर्धेत सादर करता येणार आहेत. त्यातही विद्यार्थी लेखकांना प्राधान्य दिले जाईल. आठ केंद्रांवरील अंतिम फेरीतील विजेत्या एकांकिकांची महाअंतिम फेरी २० डिसेंबर रोजी मुंबईत रंगणार आहे. या आठ उत्कृष्ट एकांकिकांमधून २०१४ची लोकसत्ता लोकांकिका निवडली जाईल.