महाराष्ट्राला लाभलेली तडफदार आणि अभ्यासू वक्त्यांची परंपरा पुढे नेण्यासाठी आणि राज्यभरातील कसदार वक्त्यांना पारखण्यासाठी ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेच्या मुंबई विभागाची अंतिम फेरी आज, मंगळवारी रंगणार आहे. सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर येथे सायंकाळी पाच वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होईल. प्राथमिक फेरीतून निवडलेले सात वक्ते नवीन विषयांवर आपली भाषणे
सादर करतील. ‘नाथे समूह’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफाइस’ यांच्या सहकार्याने राज्यभरात आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ, जनकल्याण सहकारी बँक आणि तन्वी हर्बल यांचे सहकार्य मिळाले आहे.
समाजकारण, राजकारण, साहित्य, माध्यमे यांना स्पर्श करणाऱ्या, तरीही रोजच्या जगण्याशी संबंध असलेल्या, विचाराला चालना देणाऱ्या विषयाची मांडणी करण्याच्या आव्हानाला स्पर्धकांना सामोरे जायचे आहे. विषयाचे सादरीकरण, भाषेचे सौंदर्य आणि समर्पक वापर, आशय, परिणाम, शैली अशा मुद्दय़ांच्या आधारे परीक्षण करण्यात येणार आहे. या फेरीत अव्वल ठरलेले स्पर्धक राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत दाखल होतील.
उद्या ठाणे विभागात चुरस!
ठाण्याची विभागीय अंतिम फेरी उद्या, बुधवारी होणार आहे. शेठ एनकेटीटी महाविद्यालय सभागृह, खारकर आळी, ठाणे (प.) येथे सायंकाळी पाच वाजता या फेरीला सुरुवात होईल. या वेळी सूत्रसंचालक धनश्री लेले यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका लोकसत्ता ठाणे कार्यालय, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले मार्ग, नौपाडा, ठाणे (प.) येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध होणार आहेत.
मुंबईच्या प्रवेशिका : कार्यक्रमस्थळी उपलब्ध  

नायगावकर, दळवी यांचे मार्गदर्शन
साहित्य क्षेत्राबरोबरच वक्तृत्वातही आपला ठसा उमटवणारे दिग्गज या फेरीचे परीक्षण करणार आहेत. या वेळी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर आणि नाटककार प्रशांत दळवी यांचे स्पर्धकांसाठी व्याख्यान होणार आहे. ‘वक्तृत्त्वाचे प्रयोग’ या विषयावर ते बोलतील. नायगावकर हे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यंगावर मार्मिकपणे बोट ठेवणारे कवी म्हणून ओळखले जातात. तर दळवी यांची ‘चारचौघी’, ‘ध्यानीमनी’, ‘चाहूल’, ‘सेलिब्रेशन’ अशी नाटके गाजली आहेत.     
मुंबई
दि. ३ फेब्रुवारी २०१५
वेळ : संध्याकाळी ५ वाजता
स्थळ :  सावरकर राष्ट्रीय स्मारक, महापौर बंगल्याजवळ, शिवाजी पार्क, दादर.