महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेला गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्ती आणि इतर सजावटीच्या साहित्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान रोखण्यासाठी ‘पर्यावरणस्नेही गणेशोत्सव’चा प्रसार करण्याचा निर्धार मूर्तिकार व गणेश मंडळांचे पदाधिकारी यांनी ‘लोकसत्ता’च्या पुढाकाराने झालेल्या परिषदेत व्यक्त केला. पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाला मिळत असलेला हा प्रतिसाद पाहून या विधायक चळवळीला सरकार सर्वतोपरी मदत करील, असे पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी जाहीर केले.
‘लोकसत्ता’ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने ‘पर्यावरणस्नेही गणेश उत्सव गोलमेज परिषद’ बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडली. यात सहभागी झालेले शहरातील मूर्तिकार, गणेशमूर्तीचे वितरक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांनी एकमुखाने पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची चळवळ आणखी जोमाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्याच्या पर्यावरण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ आणि सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे संयोजक नरेश दहिबावकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
मुंबईतील १ लाख ८० हजार घरगुती, तर ११,४०० सार्वजनिक गणेशमूर्तीपैकी जास्तीत जास्त मूर्ती या पर्यावरणस्नेही असतील, या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे नरेश दहिबावकर म्हणाले.  
दोन हजारांहून अधिक घरगुती मूर्ती असलेल्या वस्त्यांमध्ये विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी केली. ‘हरित गणेश’ ही संकल्पना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) रुजवली. ही चळवळ म्हणजे आता आंदोलन झाले असल्याचे अहिर म्हणाले. केवळ कायद्याच्या धाकावर नाही, तर जनजागृतीतून समाजात परिवर्तन घडू शकते. आज पर्यावरणस्नेही मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकार तयार आहेत. त्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. ‘आपण एक हात पुढे करा, सरकार तुम्हाला दोन हातांनी मदत करील,’ अशी ग्वाही अहिर यांनी दिली. यात ‘लोकसत्ता’सारख्या विश्वासार्ह वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले.
आपण पृथ्वीचे काही देणे लागतो, अशी आपली भूमिका आहे. या चळवळीशी संबंधित सर्वाच्या अडचणी आणि गरजा काय आहेत आणि सरकार त्यासाठी काय करू शकते हे या निमित्ताने समजले. निर्माल्याची शास्त्रीय विल्हेवाट लावण्याकडे विशेष लक्ष देण्याची हमी, मेधा गाडगीळ यांनी दिली. ‘इको फ्रेंडली’ गणेशमूर्ती मुंबईत कुठे मिळतात याची सूची गाडगीळ यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. या उपक्रमासाठी ‘झी २४  तास’चे सहकार्य आहे.