अभिजात संगीताच्या क्षेत्रातील नव्या दमाच्या दमदार कलावंतांसाठी स्वरमंच उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने अभिनव उपक्रम सादर केला आहे. त्याअंतर्गत ‘शागीर्द’ या कल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या सर्जनशील कलेने भारतीय अभिजात संगीताच्या जगातील असंख्य रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या दोन स्वरश्रीमंत कलावंतांच्या शिष्यांची ओळख या स्वरमंचाद्वारे होणार आहे. गानसरस्वती श्रीमती किशोरीताई आमोणकर यांच्या शिष्या तेजश्री आमोणकर आणि जगविख्यात संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ताकाहिरो अराई ‘शागीर्द’च्या पहिल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या दोन्ही कलावंतांची निवड त्यांच्या गुरूंनीच केली असून २२ जुलै रोजी दादर येथील शिवाजी मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते आपली कला सादर करणार आहेत. २५ जुलै रोजी हा कार्यक्रम ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे होणार आहे. दोन्ही दिवशी हा कार्यक्रम सायंकाळी पावणेसात वाजता सुरू होईल.
विशेष म्हणजे पृथ्वी एडिफिस प्रस्तुत ‘शागीर्द’ या मालिकेतील या पहिल्याच कार्यक्रमास या दोन्ही नव्या कलावंतांना आशीर्वीद देण्यासाठी त्यांचे गुरू पंडिता श्रीमती किशोरीताई आमोणकर आणि पंडित शिवकुमार शर्मा आवर्जून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार प्रवेश देण्यात येईल.