येत्या गुरुवारी नवी मुंबईकरांशी संवाद

गुंतवणूक का व कशी करावी? खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ जेथे शक्य नाही, तेथे गुंतवणूक करणे खरेच शक्य आहे काय? अशा छोटय़ा मोठय़ा गुंतवणुकीतून काय साधता येईल? गुंतवणुकीचे उपलब्ध असलेले वेगवेगळे प्रकार, त्यांचा परतावा, जोखीम आणि सुरक्षिततेचे घटक हे सर्व पडताळून गुंतवणुकीचे सुयोग्य गणित जुळवून देणारा ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रम येत्या गुरुवारी, ११ फेब्रुवारीला नवी मुंबईत होत आहे.

‘दिशा डायरेक्ट’ प्रस्तुत आणि न्यू इंडिया अश्युरन्स कं. लि.चे प्रायोजकत्व लाभलेले ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चे हे मार्गदर्शन सत्र, येथील मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ सभागृह, सेक्टर ६, वाशी येथे सायंकाळी ५.३० वाजल्यापासून सुरू होईल. कोणत्या गुंतवणुकीचा पर्याय, केव्हा निवडावा? जास्त व सुरक्षित परतावा केव्हा व कुठून मिळेल हे नवी मुंबईकरांना, आर्थिक नियोजनांतील तज्ज्ञ वसंत माधव कुळकर्णी, मिलिंद अंध्रुटकर आणि आशीष ठाकूर यांच्याकडून जाणून घेऊन, त्यांच्याशी थेट संवादही साधता येईल. गुंतवणूक करून पैसा वाढतो यापेक्षा ठरलेल्या स्वप्न-उद्दिष्टांची पूर्ततेची निर्धास्तता येते. सर्वसामान्य मराठी पगारदारांना पडणारे गुंतवणूकविषयक स्वाभाविक प्रश्नांचे  सोप्या भाषेतील, सुबोध उदाहरणे आणि दृकश्राव्य सादरीकरणासह तज्ज्ञांकडून या उपक्रमांतून होणारे निराकरण गुंतवणूकदारांसाठी निश्चितच उद्बोधक ठरावे. उपस्थितांना आपले नेमके प्रश्न या कार्यक्रमांतून थेट तज्ज्ञांना विचारता येतील. या कार्यक्रमाला प्रवेश खुला व विनामूल्य आहे. तथापि, सभागृहाची मर्यादित आसनक्षमता पाहता प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेश दिला जाईल.