इराणी लोकांच्या नववर्षांची सुरुवात दरवर्षी २१ मार्च रोजी ‘जमशेदी नवरोज’ हा सण साजरा करून होते. या दिवशी ‘बकलावा’ हा गोड पदार्थही सेवेत हजर असतो. पूर्वी केवळ राजा-महाराजांच्या थाळीमध्ये स्थानापन्न होणारा हा राजेशाही पदार्थ आता सर्वसामान्यही मोठय़ा चवीने   खात असले तरी त्याचा रुबाब अद्याप कमी झालेला नाही. असा हा ‘बकलावा’ १०९ वर्षे पारंपरिक पद्धतीने मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात केवळ एकाच ठिकाणी तयार केला जातो. ते ठिकाण म्हणजे भेंडी बाजार येथील ‘इराणीयन स्वीट्स पॅलेस’.

हसन इराणी यांचे आजोबा गुलाम अली यांनीही १९०९ साली ‘इराणीयन स्वीट्स पॅलेस’ची स्थापना करून सुका मेवा आणि गोड पदार्थ विकण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत पारंपरिक पद्धतीने येथे ‘बकलावा’ तयार केला जातो. ‘बकलावा’ तयार करण्याची तांब्याची एक थाळ ४० किलो वजनाची असून तिच्यामध्ये एकाचवेळी तब्बल शंभर किलो बकलावा तयार होतो. त्यासाठी सर्वप्रथम मैदा आणि गव्हाचं पीठ तूप टाकून एकत्र करून त्याची कणीक तयार करून घेतली जाते. ही कणीक एका मोठय़ा ओटय़ावर घेऊन खास बर्मा लाकडाने तयार केलेल्या भल्यामोठय़ा लाटण्याने ती लाटली जाते. लाटलेली मोठी रोटी थाळीमध्ये अंथरली जाते. जो असतो ‘बकलावा’चा पहिला थर. सुकामेवा मिक्सरमध्ये वाटल्याने तेल सोडतो. त्यामुळे हाताने कुटलेल्या बदाम, पिस्ता, अक्रोडचे थर त्याच्यावर लावले जातात. त्यांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी खास ग्लुकोज वापरलं जातं. सुक्यामेव्यावर पुन्हा एकदा रोटी पसरवली जाते. मग संपूर्ण थाळीची रवानगी होते लाकडाच्या भट्टीत. भट्टीत थाळी ठेवून दिली आणि काम झालं असं होत नाही. त्यावर बारीक नजर ठेवावी लागते आणि सतत ही थाळी फिरवावी लागते. कारण थाळीचा कुठलाही पृष्ठभाग अधिक तापल्यास पदार्थ जळण्याची आणि कमी तापल्यास कच्चा राहण्याची भीती असते. आणि यातच सारं कौशल्य दडलेलं आहे.  थाळी सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजली गेली आहे याचा अंदाज आला की ती बाहेर काढून त्यावर मध टाकून तीन दिवस ती तशीच ठेवली जाते. त्यामुळे ‘बकलावा’चे तीनही थर व्यवस्थितपणे मध शोषून घेतात. तीन दिवसांनी त्याला शंकरपाळ्यासारखा आकार देऊन त्याचे तुकडे केले जातात आणि बकलावा चाखण्यासाठी सज्ज होतो. पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या बकलावाची चव अद्याप मी स्वत:ही चाखलेली नसल्याने त्याबद्दल मी इथे काहीच लिहू शकणार नाही. पण एक किलो बकलावाची किंमत दीड हजाराच्या घरात असते. वर वर्णन केल्याप्रमाणे तूप, सुकामेवा असलेला, मधामध्ये मुरवलेला आणि लाकडाच्या भट्टीत भाजलेला हा पदार्थ वर्षांतून फक्त एकदाच तयार केला जातो.

हसन अली यांच्याकडे ‘बकलावा’मध्ये वापरला जाणारा सर्व सुकामेवा इराणमधील त्यांच्या स्वत:च्या शेतात पिकवला जातो आणि तो थेट भेंडी बाजारात आयात केला जातो. त्यामुळे सर्व सुकामेव्यांची प्रत आणि किंमत याची बरोबरी बाजारात होलसेल भावात मिळणाऱ्या सुक्यामेव्यासोबत होऊ  शकत नाही. म्हणूनच भारतातील नामांकित इराणी आणि पारसी लोकांचा नवरोज हसन अली यांच्या ‘बकलावा’ शिवाय साजराच होत नाही. ‘बकलावा’शिवाय अकबरी पिस्ता, माम्रा बदाम, इराणी अंजीर, मावा अंजीर, इराणी सुके लिंबू, व्हाइट मलबेरी, बेरी पुलावसाठी वापरली जाणारी आणि केवळ इराण, अफगाणिस्तानमध्येच उगवणारी रेड बेरी, गॅझ हा टर्कीश गोड पदार्थ, उंटाच्या दुधापासून तयार केलेली चॉकलेट्स, चीज बॉल, डाळिंबाची प्युरी, इराणीयन कॉटेज चीज असे पदार्थही मिळतात.

इराणीयन स्वीट्स पॅलेस

  • कुठे – १४३, बी ब्लॉक, हरून मंजिल, इमामवाडा रोड, भेंडी बाजार, मुंबई – ४००००९
  • कधी – सोमवार ते रविवार, सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत.
  • संपर्क – ९८७००१७८४७ किंवा iraniansweetspalace.com

 

– प्रशांत ननावरे

@nprashant

nanawareprashant@gmail.com