News Flash

‘पर्यावरणस्नेही गणेशोत्सवा’ची मुहूर्तमेढ रोवणारा परिसंवाद

सामाजिक प्रबोधनाचे माध्यम म्हणून सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आज ज्या पद्धतीने साजरा केला जातो ते पाहता भक्तांच्या मनात मांगल्य असले तरी आजूबाजूच्या वातावरणातील मांगल्य हरवत

| July 26, 2014 05:59 am

सामाजिक प्रबोधनाचे माध्यम म्हणून सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आज ज्या पद्धतीने साजरा केला जातो ते पाहता भक्तांच्या मनात मांगल्य असले तरी आजूबाजूच्या वातावरणातील मांगल्य हरवत चालले आहे. गणेशोत्सवादरम्यान होणारे पाण्याचे प्रदूषण, ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी ‘पर्यावरणस्नेही गणेशोत्सवा’ची संकल्पना लोकांच्या मनात रुजवणे आवश्यक झाले असून त्यासाठी ‘लोकसत्ता’ने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने एका विशेष परिसंवादाचे आयोजन केले आहे.
मोठय़ा प्रमाणावर साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात मोठमोठय़ा गणपतीच्या मूर्ती, गणेशमूर्ती बनवण्यासाठी केला जाणारा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रचंड वापर, रासायनिक रंग यामुळे प्रदूषणाची समस्याही मोठी होत चालली आहे. याशिवाय, विविध मंडळांमधून गणेशोत्सवादरम्यान वाजवण्यात येणारी गाणी, ऑर्केस्ट्रा यामुळे ध्वनिप्रदूषणाची समस्याही निर्माण झाली आहे. हे टाळण्यासाठी पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती मोठय़ा संख्येने उपलब्ध करण्यापासून ते आणखी काय उपाययोजना करता येतील यावर पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती तयार करणारे मूर्तीकार, गणेशमूर्तीचे वितरक आणि सावर्जनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी ३० जुलै रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘पर्यावरणस्नेही गणेश उत्सव संकल्प अभियान – २०१४’ या कार्यक्रमात विचारविनिमयासाठी एकत्र येणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असून यात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
नावातच ‘मंगलमूर्ती’ असलेल्या श्री गणेशाच्या आगमनामुळे वातावरणात पावित्र्य येण्याऐवजी पर्यावरणाचे आणि पर्यायाने सामाजिक प्रश्नांचे मोहोळ उभे राहू लागले असल्याने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘पर्यावरणस्नेही गणेश उत्सव संकल्प अभियान-२०१४’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाच्या विचारांची मुहूर्तमेढ रोवण्याच्या दृष्टीने ‘लोकसत्ता’ने पहिले पाऊल टाकले आहे. कार्यक्रमात सहभागी होण्याकरता  mpcb.ecobappa@gmail. com या ईमेलवर पूर्वनोंदणी करता येईल. या कार्यक्रमाला ‘झी २४ तास’ टेलिव्हिजन पार्टनर असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 5:59 am

Web Title: loksatta forum for environment friendly ganesh festival
टॅग : Ganesh Festival
Next Stories
1 सलमान खान खटल्यातील बहुतांश कागदपत्रे गहाळ
2 जिल्हा विभाजनापाठोपाठ ठाणे तालुक्याचेही त्रिभाजन
3 आधी पाण्याचे स्त्रोत, मगच बांधकाम परवानग्या!
Just Now!
X