‘मुझे वो मुकाम ना देना.. जिनसें होकर मैं गुजर चुका हूँ’ या त्यांच्याच काव्यपंक्तीतून त्यांच्या जीवनाचा मार्ग कसा ध्येयनिष्ठ होता, याची प्रचिती करून देत ‘लोकसत्ता गप्पां’च्या माध्यमातून पंडित मुकुल शिवपुत्र या सूरांच्या अनभिषिक्त सम्राटाचे एकेक पैलू रसिकांसमोर उलगडत गेले. रागदारी, रियाज, श्रुती ते कलाकाराची सर्जनशीलता, त्याची प्रतिभा कशी असते, अशा हरएक मुद्यावर आपले अनुभवी अंतरात्म्यातून आलेले बोल ऐकवत पंडित मुकुल शिवपुत्र यांनी ज्ञानाचे भांडार रसिकांसमोर खुले केले. ‘लोकसत्ता’ आयोजित ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमातून रंगलेल्या या ‘मुकुल’गप्पांची अनुभूती रसिकांना २२ एप्रिलला ‘झी २४ तास’ या वाहिनीवर घेता येणार आहे.

‘लोकसत्ता’ आयोजित, ‘केसरी’ आणि ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’ सहप्रायोजित, पॉवर्ड बाय ‘एलआयसी’ असलेल्या ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमाचे प्रसारण ‘झी २४ तास’ वाहिनीवर शनिवारी, २२ एप्रिल रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२ या वेळेत करण्यात येणार आहे. ‘लोकसत्ता गप्पा’च्या माध्यमातून पंडित मुकुल शिवपुत्र यांच्याशी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी संवाद साधला होता. संगीत, नाटय़-चित्रपट आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा गप्पांचा कार्यक्रम रंगला होता. विलक्षण प्रतिभा असलेला, अद्भुत, अवलिया गायक अशी पंडित मुकुल शिवपुत्र यांची ओळख आहे. कुमार गंधर्वाच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या पंडित मुकुल शिवपुत्र यांचे अवघे जीवनच सूरांच्या संगतीत व्यतीत झाले. लहानपणापासूनच संगीताचे संस्कार कशापध्दतीने त्यांच्यावर होत गेले इथपासून ते स्वत: संगीतसाधना करत, शास्त्रीय संगीत, सूर-श्रुती यांचा अभ्यास करून आपली एक वेगळी प्रतिभा निर्माण करणारे पंडित मुकुल शिवपुत्र हे रसायन कसे घडले हे या गप्पांमधून पहिल्यांदाच लोकांपर्यंत पोहोचले. विलक्षण ताकदीच्या या गायकाचे हे बोल ऐकण्याची संधी ‘झी २४ तास’ वाहिनीवरून रसिकांना मिळणार आहे. ‘झी २४ तास’ हे या कार्यक्रमाचे टेलीव्हिजन पार्टनर होते.