‘लोकसत्ता गप्पा’मध्ये उस्ताद राशिद खान; संवादक संगीतकार राहुल रानडे

प्रत्येक कलावंताला आपल्या दुनियेतील अनेक प्रतिभावंत खुणावत असतात. उस्ताद राशिद खान यांच्यासाठी गुरूबरोबरच उस्ताद अमीर खाँ आणि पंडित भीमसेन जोशी यांची शैली सातत्याने खुणावत राहिली. त्यांच्या सादरीकरणात या दोन्ही महान कलावंतांच्या गायनशैलीच्या अनेक खाणाखुणा अगदी सहजपणे दिसू शकतात. लहानपणी संगीत न आवडणारे उस्तादजी या देशातील संगीताचे आश्वासक भविष्य कसे घडले, याचा उलगडा येत्या शुक्रवारी दि. १९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता गप्पा’मध्ये होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

संथ लयीतील ख्याल गायन हे राशिद खान यांच्या गायनाचे वैशिष्टय़. स्वरावरील हुकमत आणि प्रत्येक स्वरावर रुंजी घालत, त्याचा आनंद लुटत पुढच्या स्वराकडे जाणारे त्यांचे गायन, परंपरेचे वैभव उलगडून दाखवत असते. परंतु त्याच वेळी काळाच्या बदलत्या वेगाचा अंदाज घेत आपल्या गायनशैलीत केलेले बदल हे त्यांचे खास वैशिष्टय़ म्हणावे लागेल. वयाच्या अकराव्या वर्षी स्वरमंचावर आपली कला सादर करून रसिकांना थक्क करणाऱ्या राशिद खान यांनी आपले चुलत आजोबा निसार हुसेन खाँ यांच्याबरोबर कोलकात्यातील संगीत रिसर्च अकॅडमीत पाऊल ठेवले आणि तिथे त्यांना संगीतातील अनेक दिग्गज गुरूंचा सहवास लाभला. ‘आपा’ म्हणजे गिरिजादेवी यांच्याकडून त्यांना ठुमरी शिकायला मिळाली. त्यांची ठुमरी स्वत:च्या खास शैलीत सादर करून उस्ताद राशिद खान यांनी ठुमरीला एक वेगळाच बाज दिला.

प्रयोगशील कलावंत..

संगीत हाच ध्यास आणि स्वर हाच श्वास, हे उस्तादजींच्या बाबतीतील वास्तव ठरले आहे. ख्याल, ठुमरी यांसारख्या प्रकारांवर कमालीची हुकमत असणाऱ्या राशिदजींनी संगीतात अनेक वेगवेगळे प्रयोगही केले आणि ते रसिकप्रियही झाले. चित्रपट संगीतात त्यांनी गायलेली सगळी गीते लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत, याचे कारण त्यांच्या स्वरातील माधुर्य आणि भावात्मकता. स्वरांतून अतिशय ताकदीने व्यक्त होणाऱ्या भावना हे त्यांच्या गायनाचे खास अंग आहे. ते नव्या संगीताकडे कसे पाहतात, परंपरेत नवता कशी येते यांसारख्या प्रश्नांची उत्तरे ‘लोकसत्ता गप्पा’च्या या कार्यक्रमातून निश्चितच मिळू शकतील. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच आहे.

प्रायोजक

‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक एम. के. घारे ज्वेलर्स असून पॉवर्ड बाय महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (एमएडीसी), तन्वी हर्बल्स आणि इंडियन ऑइल आहे.