‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक भैरप्पा यांचे मत; विशिष्ट वैचारिकतेतून लिहिणाऱ्या साहित्यिकांवरही टीका
भारतात कायमच असहिष्णुता होती. ब्रिटिशांची ‘फोडा आणि झोडा’ हीच नीती साम्यवाद्यांनी अणि काँग्रेसने अंगीकारली. त्यांच्या वैचारिक स्थैर्यास प्रचलित व्यवस्थेत आव्हान मिळाल्याने ही आवई आताच सुरू झाली, असे निसंदिग्ध प्रतिपादन गेले अर्धदशक केवळ कानडीच नव्हे तर मराठीसह भारतीय साहित्य वर्तुळावरही आपल्या विद्वत्तेबरोबर लोकमान्यतेनेही अधिराज्य करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भरप्पा यांनी केले.
राजकारण, समाजकारण, वैचारिकता, संस्कृती अशा जीवनाला स्पर्श करणाऱ्या विविध क्षेत्रांचा सखोल अभ्यास असलेले ललित लेखक भरप्पा यांनी ‘लोकसत्ता गप्पा’च्या पहिल्याच कार्यक्रमाचे पर्व शनिवारी सायंकाळी संस्मरणीय केले. सुमारे दोन तास चाललेल्या या मुक्त संवादात भरप्पा यांनी सुसंस्कृत जगण्याला भिडणाऱ्या सर्व प्रश्नांना स्पर्श केला. साहित्य, नाटय़-चित्रपट, राजकारण, प्रशासन आदी क्षेत्रातील निवडक मान्यवरांच्या साक्षीने भरप्पा यांनी आपल्या सखोल चिंतनशील लेखनामागील प्रवास प्रक्रिया उलगडली.
साहित्यामागची प्रेरणा, कथा, विचार, पात्रं प्रत्यक्ष कागदावर उतरविताना होणारा प्रवास, साहित्याविषयीचा निकोप दृष्टिकोन बाळगूनही त्यावर ठरावीक वैचारिकतेचे होणारे आरोप आणि त्यातून उद्भवणारे वाद अशा वेगवेगळ्या मुद्दय़ांवर रसिक श्रोत्यांनी विचारलेले प्रश्न कानडीत भरप्पांपर्यंत पोहचवित साहित्यिका उमा कुलकर्णी यांनी भरप्पा यांना बोलते केले. भरपा यांच्या सिद्धहस्त लेखणीची ओळख मराठी रसिकांना आहेच. या गप्पांच्या निमित्ताने पर्व, आवरण, वंशवृक्ष या आपल्या कादंबऱ्यांमधील पात्रे, ती रचण्यामागची प्रेरणा याविषयी सांगत भरप्पा यांनी ही मफल उत्तरोत्तर रंगवीत नेली. सर्वसाधारणपणे लेखक आपली राजकीय मते चाणाक्षपणे मांडतात. परंतु, भरप्पा कोणाचाही आणि कोणताही मुलाहिजा न ठेवता मुक्तपणे बोलत गेले आणि उपस्थितांची त्याला उत्स्फूर्त दाद मिळत गेली. जेएनयूत सध्या सुरू असलेल्या वादावरही रोखठोख भूमिका मांडत गेली अनेक वष्रे केवळ डाव्या विचारांच्या संघटना आणि विचारवंत या संस्थेवर कशा अधिराज्य गाजवीत आहेत, हे भरप्पा यांनी सांगितले. क्रांती घडविणे किंवा बदल आणणे हे सकस साहित्याचे उद्दिष्ट नसते; तर रस, ध्वनी आणि औचित्य हे सकस साहित्याचे खरे लक्षण आहे. म्हणूनच मी कुठल्या अमुक एका विचारधारेच्या चौकटीत लिहीत नाही. कारण, ठरावीक विचारसरणीच्या चौकटीत लिहिलेले साहित्य काळाच्या कसोटीवर टिकत नाही, अशा शब्दांत भरप्पा यांनी विशिष्ट वैचारिकतेतून लिहिणाऱ्या साहित्यिकांवरही कोरडे ओढले. मराठीजनांची अविभाज्य भाग असलेली निर्वषि गप्पांची संस्कृती पुनरुज्जीवित व्हावी, या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सांगितले.
केसरी या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत, तर हॉस्पिटॅलिटी पार्टनर एकेए आणि टेलिव्हिजन पार्टनर झी चोवीस तास आहे. कार्यक्रमाचे प्रक्षेपण ‘झी चोवीस तास’वर दाखविले जाणार आहे.

क्रांती घडविणे किंवा बदल आणणे हे सकस साहित्याचे उद्दिष्ट नसते; तर रस, ध्वनी आणि औचित्य हे सकस साहित्याचे खरे लक्षण आहे. म्हणूनच मी कुठल्या अमुक एका विचारधारेच्या चौकटीत लिहीत नाही. कारण, ठरावीक विचारसरणीच्या चौकटीत लिहिलेले साहित्य काळाच्या कसोटीवर टिकत नाही.
– एस. एल. भैरप्पा,