केवळ अनुभवांशीच इमान राखण्याचे गुलज़ार यांचे आवाहन

कोणतीही राजकीय विचारसरणी ही परिपूर्ण नसते. त्यामुळे लेखक-कलावंताने कोणत्याही राजकीय पक्षांच्या विचारसरणीशी स्वत:ला जखडून घेऊ नये. लेखकाची बांधिलकी ही कायम अस्सल अनुभूती आणि ती ज्यांच्याबाबत आहे त्या लोकांशीच असायला हवी, असे प्रतिपादन मनस्वी कवी गुलज़ार यांनी शनिवारी ‘लोकसत्ता गप्पा’ या मुक्त संवादात्मक कार्यक्रमात केले.

आजचे राजकारण, सामाजिक वास्तव ते चित्रपट, कला-साहित्य अशा विविध विषयांवर या गप्पांमध्ये गुलज़ार यांनी मार्मिक टिप्पणी केली. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कला, साहित्य, उद्योग, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववंताचा सजग प्रतिसाद गुलज़ार यांना लाभत होता. ‘सर्जनशील लेखक’ आणि ‘कार्यकर्ता लेखक’ असे दोन्ही प्रवाह डाव्या विचारसरणीत पूर्वीपासून राहिले, त्यापैकी आपण ‘सर्जनशील डावे’ म्हणून राहणे पसंत केले, असे गुलज़ार यांनी सांगितले. स्वातंत्र्य चळवळीतील प्रगतीशील लेखक संघ, इप्टा, पीपल्स बुक्स हाऊस या डाव्या विचारांच्या सांस्कृतिक संघटनांच्या आठवणींना उजाळा देतानाही ते भावुक झाले. मात्र, आपण ‘सर्जनशील डावे’ असलो तरी डाव्या पक्षांत कधीही सहभागी झालो नाही. पक्षीय विचारसरणीच्या निष्ठेला बांधून घेऊन विचार आणि आविष्काराचे स्वातंत्र्य गमावून बसणे मी जाणीवपूर्वक टाळले. म्हणूनच ज्योती बसू यांना पंतप्रधानपदाची संधी असतानाही ती का टाळली, असा सवाल करण्याचे स्वातंत्र्य मला जपता आले. आजही १९१७ च्या रशियन क्रांतीच्या स्मृतिरंजनात रमलेली डावी चळवळ काळाच्या मागे पडली असल्याचे नमूद करतानाच, डाव्या नेत्यांची प्रामाणिकता, स्वच्छ चारित्र्य, जनतेशी बांधिलकी मात्र कौतुकास पात्र असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

‘हम अपने आप में ही बंद है’ अशा शब्दांत गुलज़ार यांनी सध्याच्या कप्पाबंद  आणि तुकडय़ा तुकडय़ांत विखुरलेल्या समाजवास्तवावर कोरडे ओढले. ईशान्य भारतात पूर येतो, हजारोंचे संसार पाण्यात वाहून जातात, शेकडोंचा जीव जातो. पण उर्वरित भारताला त्याचे काहीच सोयरसुतक नसते. हीच गोष्ट भारताच्या फाळणीच्या जखमेची. फाळणी देशाची झाली, परंतु उर्दू, हिंदी, पंजाबी, बंगालीव्यतिरिक्त अन्य भाषांमधील साहित्यात फाळणीच्या वेदना का उमटल्या नाहीत, असा व्यथित सवाल गुलज़ार यांनी केला. एक देश आणि एक समाज म्हणून आपले तुकडे आणि कप्पे पडले आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर ‘अपनी अँटिना खुली रखे’ असे सुचवत त्यांनी आसपासच्या घटनांबाबत संवेदना जपण्याचे आर्जवही केले.

सध्याची मुले खूप एकलकोंडी बनली आहेत आणि हे खूप धोकादायक आहे, असा इशारा गुलज़ार यांनी दिला. मुले आणि पालक यांच्यातला संवाद हरवत चालला आहे. मुलांना परीक्षेत मिळणारे गुण एवढाच पालकांसाठी त्यांच्या प्रगतीचा मानदंड उरला आहे. मुलांचे विश्व फुलविणारे साहित्यही हरवले आहे, असे नमूद करीत केवळ मराठी, मल्याळम आणि तामिळ या भाषा सोडल्यास सर्वत्र बालसाहित्याची वानवाच असल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हवाच!

हिंदी, उर्दूपेक्षाही मराठी भाषा प्राचीन आहे. या भाषेला प्रचंड वारसा आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायलाच हवा, असे गुलज़ार यांनी आवर्जून सांगितले.

मराठीशी अक्षर सोयरीक..

गुलज़ार यांचे मराठी भाषेशी असलेले नाते हे त्यांच्या पहिल्या मराठी पुस्तकातून थेट सोयरिकीत बदलणार आहे. ग्रेस, ढसाळ आदी मराठीतील काव्य प्रतिभांना जोखणारे, त्यांच्याशी झालेल्या संवादांचे अनुभव कथन असे हे आगामी पुस्तक असेल, असे ते म्हणाले. अस्सल शायरी, काव्य हळूहळू गतप्राण होत असताना ईशान्य भारतात धगधगते काव्य साकारत आहे. विविध भाषक काव्य संवेदना अनुवादित रूपात सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रकल्पावरही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.