‘लोकसत्ता गप्पा’मध्ये पं. सत्यशील देशपांडे यांच्याकडून सूर, ताल, शब्दांचा त्रिवेणी संगम

सूर, लय, ताल आणि शब्दांच्या सुंदर मिलाफाने सजलेल्या एका आगळ्या मैफिलीमुळे संगीतप्रेमींची शनिवारची संध्याकाळ शब्दश अविस्मरणीय ठरली. भारतीय शास्त्रीय संगीताचा चौफेर अभ्यास, इतिहासाचा अफाट व्यासंग आणि वर्तमानाचे पुरेपूर भान असा त्रिवेणी संगम साधत ज्येष्ठ संगीतज्ज्ञ पं. सत्यशील देशपांडे यांनी आपल्या अनोख्या शैलीतून भारताच्या कानाकोपऱ्यातील संगीताची सुरेल सफर तर रसिकांना घडविलीच, पण ज्यांच्यामुळे संगीत क्षेत्र समृद्ध झाले अशा गायकांच्या शैलीच्या लडी उलगडत एका अनोख्या दुनियेची सहज ओळखही घडविली. या सफरीमध्ये संगीताचे जाणकार, दर्दी आणि संगीत क्षेत्रातील दिग्गज तर सहभागी होतेच, पण केवळ ‘कानापुरतेच’ संगीत जाणणाऱ्या नवख्यांनीही या सफरीचा आनंद तितक्याच उत्साहाने पुरेपूर लुटला.

‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रमातील हे दुसरे ‘सांगीतिक गप्पां’चे पर्व विख्यात गायक, संगीतज्ज्ञ आणि समीक्षक पं. सत्यशील देशपांडे यांनी आपल्या अमोघ शैलीतून सर्वागांनी सजविले. प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिराच्या सभागृहात निमंत्रितांच्या उपस्थितीत झालेल्या या आगळ्यावेगळ्या मैफिलीत रंगलेल्या गप्पा, पं. देशपांडे यांनी उलगडलेल्या शास्त्रीय संगीताच्या लय आणि लकबींचा आगळा बाज, रसिक श्रोत्यांसोबत झालेली प्रगल्भ प्रश्नोत्तरे आणि आपल्या संगीत साधनेचा संपूर्ण प्रवास यातून श्रवणसुखाच्या पर्वणीचा एक अविस्मरणीय लाभ सोबत घेऊनच रसिक श्रोते घरोघरी परतले. दोन तासांहून अधिक चाललेल्या या मैफिलीत पं. देशपांडे यांनी त्यांचे गुरू पं. कुमार गंधर्व यांच्या संगीतमय जीवनप्रवासाचा पटही हलकेच उलगडून दाखविला. संगीत हे समाजजीवन समृद्ध करणारे माध्यम आहे.

‘सुरमयी गप्पां’च्या या प्रवासात समरसून साथ देणाऱ्या रसिकांना या दोन तासांच्या मैफिलीतून संगीताची नेमकी ओळख तर पं. सत्यशील देशपांडे यांनी करून दिलीच, पण उत्स्फूर्त संगीताचा पं. कुमार गंधर्वाचा बाज शास्त्रीय संगीताला नवी मिती देऊन गेल्याने त्यांची गायकी श्रेष्ठ ठरली, हेही त्यांनी रसिकांना मार्मिकतेने पटवून दिले. गाण्यात काहीतरी आकलनीयता असली पाहिजे. ती कुमारजींच्या गायकीत होती. ते उत्स्फूर्ततने आणि बालसुलभ कुतूहलाने गायचे, आणि प्रत्येक सुराकडेही बालसुलभ भावनेनेच पाहायचे. त्यामुळे त्यांची गायकी प्रामाणिक होती.

अशी गायकी मनाला आगळा आनंद देऊन जाते, म्हणून किशोरीताईंची एखादी न जमलेली मैफिलही झुबिन मेहताच्या सिंफनीहून आगळा आनंद देणारी ठरते. कारण त्या मैफिलीत अगोदरपासून तालीम करून घोटविलेले नसते, तर एक नवा, अनपेक्षित आनंद त्यामधून सापडतो. कुमारजींनी कधीच गाण्याचा ‘फॉम्र्युला’ बांधून दिला नाही. कारण संगीत ही ‘पाठ करून घेण्याची’ गोष्टच नाही, आपले ‘घराणे’ प्रस्थापित व्हावे असे त्यांना कधीच वाटले नाही, ती त्यांची इच्छाही नव्हती, असे सांगत पं. देशपांडे यांनी कुमारांच्या काही बंदिशींचा साज या आगळ्या गप्पांच्या सोहळ्यावर चढविला, तेव्हा एका अनोख्या तृप्तीचा आनंद अवघ्या मैफिलीवर दाटून गेला. भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या संगीत परंपरांचा हळुवार आणि मर्मज्ञ परामर्ष घेत, त्यातील बऱ्यावाईटावर नेमकेपणाने आणि अत्यंत संयतपणे अभ्यासपूर्ण भाष्य करत आणि वर्तमानातील नेमके संदर्भ जोडून त्यावर विनोदाची झालर चढवत पं. देशपांडे यांनी या मैफिलीला अशी काही उंची दिली, की मैफिलीतील सूर आणि शब्दांचा सुंदर संगम कानात साठवतच प्रत्येक रसिक घरोघरी परतला..

पं. देशपांडे म्हणाले..

  • मुखडा सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत सुडौल हवा
  •  संगीत हे मानवी संवेदनांचे वाहन आहे
  • गायकांनी आपला प्रवाह सुरू ठेवायला हवा, त्याचं डबकं होता कामा नये.

कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तान्त पुढील रविवारी ‘लोकरंग’मध्ये..