कैलाश खेर यांच्या अदाकारीला तुफान प्रतिसाद; शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या अखेरच्या दिवशीही हजारोंची उपस्थिती

सुफी संगीताला पॉप आणि रॉक संगीताची जोड देत संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या कैलाश खेर यांनी ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’मध्ये आपल्या गायकीने रसिकांची मने जिंकली. फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी आपल्या गाण्यांच्या तालावर त्यांनी अनेकांना ठेका धरण्यास भाग पाडले. त्यांच्या ‘कैलासा’ या जगप्रसिद्ध बँडसोबतच्या सादरणीकरणाने या फेस्टिव्हलची संगीतमय सांगता झाली.

शुक्रवारी उषा उत्थप यांनी डिस्कोगीतांचा नजराणा सादर केला. शनिवारी दुसऱ्या दिवशी महेश काळे यांनी शास्त्रीय संगीताचा नाविन्यपूर्ण अविष्कार घडविला. त्यानंतर रविवारी संध्याकाळी या साऱ्यावर कैलाश खेर यांच्या सूफी शैलीतील कैलासाने कळस चढविला. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आदी उपस्थित होते.

संस्कृत शिवस्तुतीने आपल्या रॉकबँन्डची सुरूवात करणाऱ्या कैलाश खेर यांनी पुढे सलग त्यांची एकाहून एक सरस लोकप्रिय गाणी सादर करीत उपस्थित हजारो श्रोत्यांना ताल धरायला लावले.  मै तो तेरे प्यार मे, तौबा तौबा या गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. तू जाने ना, या गाण्यांवर तर तरुणाई मंत्रमुग्ध झाली. उपस्थितांची दाद पाहून कैलाश खेर यांनीही छायाचित्रकारांकडे प्रेक्षकांना टिपण्याची विनंती केली. पिया की रंग दिनी ओढणी, तेरे बिन नही लगदा दिल मेरा ढोलना, डारो ना रंग या गाण्यांनी कार्यक्रमात रंग भरला. ‘तेरी दिवानी’ या प्रसिद्ध गाण्यावर उपस्थितांनी सुरात सूर मिसळला.

मध्यंतरानंतर पुन्हा सुरू झालेल्या मैफलीत ‘बाहुबली’तील ‘जय जय कारा’ ने रसिकांच्या मनाचा कैलाश खेर यांनी ताबा घेतला. त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जाणाऱ्या ‘अल्ला के बंदे’लाही खूप जोरदार प्रतिसाद मिळाला. पुढे ‘या रब्बा’ या भावनिक गाण्याने रसिकांना गंभीर केले. आपली वेगळी ओळख असलेल्या सुफी प्रकारातील ‘साफ तिलक सब छिन ली’ या गाण्याने कार्यक्रमात त्यांनी सुफी रंग भरले. पुढे मेरी माँ, या गाण्यातून त्यांनी आईला वंदना दिली. सैया या भावनिक गाण्याने मैफलीचा उत्तरार्ध सुरू झाला. ‘चक दे फट्टे’ या धमाल उडत्या गाण्याने त्यांनी रसिकांना नाचायला भाग पाडले. तब्बल अडीच तास रंगलेल्या या संगीत मैफलीत शेवटपर्यंत प्रेक्षकांनी आनंद लुटला.

अ‍ॅपमालिकेचे युग लवकरच

शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या अखेरच्या दिवशी रंगमंचावर ‘हॉर्न ओके प्लीज’ या झी वाहिनीच्या नव्या अ‍ॅपवाहिनीची झलक दाखविण्यात आली. एका विशिष्ट अ‍ॅपमार्फत ही मालिका मोबाईलवर पाहता येणार आहे. जय मल्हार फेम इशा केसकर या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. अभिनेत्री मनवा नाईक, वृषाली शिंदे आणि शिवांगी यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.

अंबरनाथच्या शिवमंदिरावर गीत साकारण्याची घोषणा

तब्बल वीस हजारांहून अधिक रसिकांनी तुडुंब भरलेले सभागृह पाहून अक्षरश: भारावून गेलेल्या कैलाश खेर यांनी अशी गर्दी आपण आपल्या दहा-बारा वर्षांच्या कारकिर्दीत मुंबई परिसरात कुठेही पाहिलेली नव्हती, अशी कबुली दिली. तसेच येथील प्राचीन शिवमंदिराची कीर्ती जगभर पोहोचविण्यासाठी हिंदी आणि मराठी भाषेत एक नवे स्वतंत्र गीत रचण्याची घोषणाही त्यांनी यावेळी हजारो रसिकांच्या साक्षीने केली.

महाशिवरात्र पुन्हा अवतरली

महोत्सवाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. मुख्य रंचमंचावरील कैलाश खेर यांचा लाईव्ह बँन्ड ऐकण्यासाठी तब्बल वीस हजार रसिक उपस्थित होते. त्यामुळे तिथे पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. त्याचबरोबर बाहेरील कलादालन, मिसळ उत्सव, नवोदित कलावंतांचे सादरीकरण, आकाश पाळणे इत्यादी ठिकाणीही तुडुंब गर्दी होती. संध्याकाळी पाच ते रात्री दहा यावेळेत या परिसरात तब्बल एक लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. गेल्या मंगळवारीच साजऱ्या झालेल्या महाशिवरात्रीनिमित्त येथे लाखो भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर पुन्हा रविवारी दर्दी कला रसिकांची गर्दी येथे पहायला मिळाली. त्यामुळे शिवमंदिर परिसरात महाशिवरात्र अवतरल्याचा भास अंबरनाथकरांना झाला.