‘अभ्युदय बँके’च्या साहाय्याने ‘लोकसत्ता’चा उपक्रम
२१व्या शतकात विज्ञान, तंत्रज्ञानातील विकासाच्या जोरावर मानवाने प्रचंड प्रगती केली. मात्र, या प्रगतीबरोबरच काही समस्याही निर्माण झाल्या. या समस्यांच्या गर्दीतही स्त्रीने पुरुषाच्या बरोबरीने कर्तृत्वाच्या जोरावर जगाच्या पातळीवर प्रत्येक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. साक्षात दुर्गाशक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशाच स्त्रीशक्तीचा शोध ‘लोकसत्ता’ घेत आहे. येत्या नवरात्रोत्सवानिमित्त यंदाही ‘शोध नवदुर्गेचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘अभ्युदय बॅंक’ हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.
या उपक्रमासाठी नऊ ‘दुर्गा’ची निवड करण्यात येणार आहे. समाजात विधायक कार्य करत असताना नवी ओळख निर्माण करणाऱ्या अशा दुर्गाची माहिती आम्हाला हवी आहे. समाजातील ही ‘दुर्गा’ असेल तुमच्या आमच्यातलीच, परंतु धाडसी, नेहमीच्या चौकटीतील गोष्टींना टाळून नवे कार्य घडवणारी किंवा समाजातल्या वंचितांना मायेची सावली देणारी, त्यासाठी कदाचित समाजाच्या, कुटुंबीयांच्याही विरोधात जाऊन विधायक उपक्रम राबविणारी किंवा ही ‘दुर्गा’ असेल स्वत:मध्ये ऊर्जेला व्यापक करत एकाच वेळी तीन ते चार पातळ्यांवर काम करीत अव्वल स्थान पटकावणारी. सामाजिक, शैक्षणिक, लष्करी, आदिवासी, तंत्रज्ञान, विज्ञान अशा समाजातील
विविध क्षेत्रांमध्ये अशा ‘दुर्गा’ विविध पातळ्यांवर कार्य
करत असतात. विशिष्ट ध्येय समोर ठेवून त्या कार्य करत असतात. अशा धडाडीच्या दुर्गाची माहिती आपणही आमच्याकडे पाठवू शकता.
ही माहिती ईमेलद्वारे किंवा आमच्या कार्यालयीन पत्त्यावर ३० सप्टेंबपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामधून नऊ ‘दुर्गा’ची निवड करण्यात येणार असल्याने अंतिम निर्णय परीक्षकांचा असेल, याची नोंद या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांनी घ्यायची आहे.

आमचा पत्ता
लोकसत्ता शोध नवदुर्गेचा,
ईएल १३८, टी टी सी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई ४००७१० किंवा loksattanavdurga@gmail.com