विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांचे अस्तित्व जाणवले. आता त्याचे सारे श्रेय नारायण राणे यांना दिले जाते. कारण राणे यांच्या विधिमंडळातील आगमनाने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार सारेच आक्रमक झाले. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यापासून पाच अधिवेशनांमध्ये विखे पाटील आपला प्रभाव पाडू शकले नव्हते, पण सहाव्या म्हणजेच सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात त्यांची छाप पडली. सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तसेच कलंकित मंत्र्यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या भाषणाची वाहवा झाली. विखे पाटील यांची बुधवारी मात्र चांगलीच अडचण झाली. महाड दुर्घटनास्थळी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता, पण मुंबई-गोवा मार्गावर झालेल्या वाहतुकीच्या प्रचंड कोंडीमुळे रस्ते मार्गे जाणे योग्य ठरणार नाही, अशी सूचना पोलिसांकडून करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी महाडला हेलिकॉप्टरने जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी विरोधी नेते विखे पाटील आणि अखंड महाराष्ट्राच्या मुद्दय़ावर शब्दाला मान देऊन विरोधकांची साथ सोडलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना बरोबर येण्याचा निरोप दिला. दुपारी सारे विधान भवनात एकत्रित बाहेर पडले. मुख्यमंत्री आणि विखे-पाटील एकत्र म्हटल्यावर छायाचित्रकार आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या भुवया उंचावल्या. उद्या वृत्तपत्रात हेच छायाचित्र प्रसिद्ध होईल आणि काँग्रेसमध्ये त्याची लगेचच प्रतिक्रिया उमटू शकते याचा अंदाज आल्यानेच विखे पाटील यांनी मुद्दामच मागे राहणेच पसंत केले. मग मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे बरोबर पुढे निघाले तर विखे पाटील मागे मागे राहिले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 4, 2016 2:10 am