News Flash

कुजबुज : बोंडअळीचा भाजपला विसर

विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कापूस पट्टय़ात गुलाबी बोंडअळीने घातलेल्या थैमानाचे तीव्र पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. यासंदर्भात विरोधकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर सरकारकडून उत्तर न आल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ही लक्षवेधी पुढे ढकलली. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते राज्य सरकारवर भडकले. शेतकरी अडचणीत असताना सरकार कुणाला पाठिशी घालते आहे असा आरोप करीत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी आणि ही लक्षवेधी आत्ताच चर्चेला घ्यावी अशी विरोधकांची मागणी होती. त्यावर सत्ताधारी पक्षाने याबाबतचा प्रस्ताव चर्चेला आणला असून त्यावरील चर्चेदरम्यान आपल्या भावना मांडा असे समजावत अध्यक्षांनी पुढील कामकाज पुकारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सरकारच्या वतीने अनिल बोंडे यांनी मांडलेल्या प्रस्तावात सगळे विषय आहेत मात्र बोंड अळीचा साधा उल्लेखही नसल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदनाच्या निदर्शनास आणताच सत्ताधाऱ्यांची फजिती झाली.

योग्य वेळी ‘बॉम्ब’..

अधिवेशनाच्या एक दिवसाआधी काटोलचे आमदार आशीष देशमुख यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दावर मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. मुख्यमंत्र्यांनी मात्र त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. बुधवारी त्यांना प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विधानभवन परिसरात गाठले. परंतु, त्यांनी बोलण्यास नकार दिला. पत्रकारांनी बोलण्याचा आग्रह केल्यानंतर त्यांनी योग्य वेळी ‘बॉम्ब’ टाकणार असल्याचे संकेत दिले.

विधान परिषदेत ‘बापट काका..’

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून गदारोळ झाल्याने विधान परिषदेत तिसऱ्या दिवशीचे कामकाज होऊ शकले नाही. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना तेथे रंगला. घोषणाही देण्यात आल्या. त्यात राष्ट्रवादीचे सदस्य अमरसिंह पंडित यांनी सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांच्याकडे पाहून दिलेली ‘बापट काका’ ही हाक सर्वाचे लक्ष वेधून घेणारी होती.

हर्षवर्धन जाधव यांचा संताप

सभागृहात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू दिले नाही, नाही म्हणून शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे दिले. सभागृहात कामकाज होऊच नये म्हणून सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात साटेलोटे आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. दरम्यान, बारामती मतदारसंघात सभागृहातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा साखर कारखाना असल्यामुळे ते जाणीवपूर्वक सभागृहात चर्चा होऊ देत नसल्याचेही हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात जळजळ

दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यात जळजळ होत होती. बुधवारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनाही असाच त्रास सुरू झाला. विधानभवन परिसरातील डॉक्टरांनी दोघांवरही उपचार केले.

वर्दीतील माणुसकीचा प्रत्यय

एरव्ही मंत्र्यांच्या गाडय़ांना जाण्यासाठी वाट मोकळी हवी म्हणून नागरिकांच्या गाडय़ा थांबवण्याचे प्रकार आपण शहरात पाहतो. पण, आज मुख्यमंत्री सचिवालयासमोर तैनात पोलिसांनी वेगळ्या कारणासाठी गाडय़ा थांबवत माणुसकीचा प्रत्यय दिला. अगदी व्यस्त कार्यक्रमातही एका पोलिसाने रस्त्यावरून जाणारी रिक्षा थांबवली. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आजीला इच्छितस्थळी पोहोचवण्याची सूचना केली आणि रिक्षाचालकाला स्वत:च पैसेही दिले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 1:11 am

Web Title: loksatta kujbuj 13
Next Stories
1 पालिकेच्या उत्सवी उधळपट्टीस बंदी
2 राज्यात बोचरी थंडी
3 ‘शाळाबाह्य़’ मुलांच्या शोधात शिक्षक!
Just Now!
X