मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यापासून एकनाथ खडसे यांचा संताप काही कमी झालेला नाही. आपले मंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच गेल्याने नाथाभाऊंचे लक्ष्य अर्थातच फडणवीस आहेत. दोन दिवसांपूर्वी ‘त्यांचे’  थोबाड फुटले, असे नाथाभाऊंनी सांगितले होते. आता ‘त्यांचे’  म्हणजे कोणाचे हे गुलदस्त्यातच राहिले. कलंकित मंत्र्यांच्या विरोधातील चर्चेत भाग घेताना खडसे यांनी भावनांना वाट करून दिली. आपले कोणी ऐकत नाही वा कोणाशी बोलायचे हेच कळत नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली.  लक्ष्य अर्थातच मुख्यमंत्री होते. मग खडसे यांना विरोधी बाकांवरून उत्तेजन मिळत गेले. खडसे यांची टोलेबाजी सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक चिठ्ठी  खडसे यांना पाठविली. भाषण सुरू असताना शिपाई ही चिठ्ठी घेऊन गेला, तेव्हा खडसे यांनी या चिट्ठीकडे न बघितल्यासारखेच केले. काही वेळातच मुख्यमंत्री सभागृहाबाहेर निघून गेले. मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना पाठविलेल्या चिठ्ठीत नेमके काय दडले होते किंवा चिठ्ठी पाठविल्यावर मुख्यमंत्री लगेचच सभागृहाबाहेर का पडले, याचे विविध तर्कवितर्क मांडले जाऊ लागले. एक मात्र झाले, खडसे यांनी मनातील भावनांना वाट करून देताना मुख्यमंत्र्यांची चांगलीच अडचण केली. आधीच बाहेरचा रस्ता दाखवून मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना योग्य तो संदेश दिला आहे. आता अधिक बोलले तर काय, अशी कुजबुज भाजपच्या आमदारांमध्ये सुरू झाली.

 

Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”

पेट्रोल हवे तर हेल्मेट घाला

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे हेल्मेटप्रेम सर्वश्रुत आहे. कधी हेल्मेट सक्तीचा फतवा काढायचा तर कधी मागे बसलेल्यांसाठी हेल्मेटची सक्ती जाहीर करायची, असे अनेक उपक्रम त्यांनी राबवून पाहिले. परंतु आपल्याकडे कायदा पाळणाऱ्यांपेक्षा तोडणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे रावतेंची हेल्मेटसक्ती फारशी चालली नाही. त्यामुळे रावते यांनी गुरुवारी विधानसभेत थेट यापुढे पेट्रोल हवे असेल तर हेल्मेट घालावेच लागेल, असे सांगितले. पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींनीही हेल्मेट असल्याशिवाय पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही, असा फतवा जारी केला आहे. तोच फतवा रावते यांनी आज विधानसभेत जारी केला. रावते यांच्या या भूमिकेचे स्वागत करताना हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांचे काय असा सवाल करत अजित पवार यांनी त्यांना चिमटा काढला. दुचाकीवरील पोलीसच नव्हे तर अधिकारीही हेल्मेट घालत नाहीत, याकडे अजितदादांनी लक्ष वेधले, तेव्हा यापुढे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे रावते यांनी सांगितले खरे. परंतु ती नेमकी करणार कोण, असा सवाल काही आमदारांनी हळूच विचारला. त्यातही पुणेकरांना हेल्मेटचे माहात्म्य रावते कसे समजावणार? तेथे तर सर्वपक्षीय आमदारांनीच या हेल्मेट सक्तीला विरोध केला आहे. खड्डय़ातील एसटी चांगली करण्याचे डोक्यात घेण्याऐवजी आमच्या डोक्यावर हेल्मेटचे ओझे लादण्याचा अट्टहास कशासाठी, असा मिश्कील सवाल काही आमदार सभागृहाच्या आवारात करताना दिसत होते.

 

अर्धवट उत्तरात सदस्यांचे हित

विधिमंडळात सदस्यांकडून दोन दोन महिने आधी प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र या प्रश्नांना मंत्र्यांकडून अनेकदा त्रोटक उत्तरे देऊन वेळ मारून नेली जाते.  मात्र एखाद्या मंत्र्याचे त्रोटक-अर्धवट उत्तर सदस्यांसाठी किती फायद्याचे ठरू शकते याचा अनुभव आज विधान परिषदेने घेतला. प्रश्नोत्तराच्या तासात पात्र शाळांना अनुदान देण्यास सरकारकडून होत असलेल्या विलंबाबाबत चर्चा रंगली होती. प्रश्न विचारण्यात शिक्षक आमदार आघाडीवर होते.  शिक्षणमंत्री विनोद तावडे मात्र प्रत्येक सदस्याच्या एकाच प्रश्नाला उत्तर देत होते. त्यावर अस्वस्थ झालेल्या सदस्यांनी मंत्री प्रश्नांची उत्तरे देत नसल्याची तक्रार सभापतींकडे केली. त्यावर तावडे यांनी दिलेल्या उत्तराने या आमदारांची बोलती बंद झाली. नजीकच्या काळात अनेक शिक्षक मतदारसंघांत निवडणुका आहेत. त्यामुळे आपण शिक्षकांचे प्रश्न कसे आणि किती सोडविले हे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदस्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे सर्वच शिक्षक आमदारांना अनुदानाचा प्रश्न आपण कसा मार्गी लावला हे सांगण्याची संधी मिळावी म्हणून त्यांचे हित जपण्यासाठीच आपण त्रोटक उत्तरे देत होतो. मंत्र्यांच्या या उत्तराने सभागृहात हशा पिकला.

 

अकरावी प्रवेशासाठी सचिनचाही दूरध्वनी

अकरावी ऑनलाइन प्रवेशातून निर्माण होत असलेल्या गोंधळामुळे पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने हजारो विद्यार्थी व पालक नाराज आहेत.अनेक आमदारांनी प्रवेश न मिळालेल्या किंवा चुकीच्या, गैरसोयीच्या महाविद्यालयात प्रवेश दिल्याची उदाहरणे दिली. तेव्हा अ‍ॅड. आशीष शेलार यांनी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचाही आपल्याला दूरध्वनी आल्याचे सांगितले. त्यांच्या वाहनचालकाच्या मुलाला पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याची तक्रार तेंडुलकर यांनी शेलार यांच्याकडे केली. शेलार यांनी हे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणले खरे, पण त्या मुलाला गुणवत्तेनुसारच प्रवेश मिळेल, असे स्पष्ट करून तावडे यांनी लक्ष घालण्यास चक्क नकार दिला.