News Flash

कुजबुज.. ; ‘कृष्णनीती’मुळे आशीष शेलारच ‘बाटलीबंद’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि भाजपवर गेल्या चार दिवसांत जोरदार टीकास्त्र सोडले असले तरी भाजपकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रवक्ते माधव भांडारी आणि शिवसेनेविरोधात आक्रमकपणे बाजू मांडणारे मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलारही सध्या थंड आहेत. केंद्रात जीएसटीवरून भाजपची कोंडी झाली असल्याने आणि राज्यातही अनेक बाबींसाठी शिवसेनेचे सहकार्य आवश्यक असल्याने शिवसेनेविरोधात ‘ब्र’देखील काढू नका, असे भाजप नेत्यांना पक्षश्रेष्ठींचे आदेश आहेत. मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर शिवसेनेचा उल्लेख न करता राक्षसाला ‘बाटलीबंद’ करण्याच्या वल्गना अ‍ॅड. शेलार यांनी केल्या होत्या. त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘कृष्णनीती’ नुसार महापालिका निवडणुकीसाठी सामोरे जाऊ, असे सांगितले होते. पण या ‘कृष्णनीती’मुळे अ‍ॅड. शेलारच सध्या ‘बाटलीबंद’ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांची तलवार म्यानातच असल्याने त्यांनी मौन पाळणेच सध्या पसंत केले आहे.

दुखणे वेगळेच

कलंकित मंत्र्यांवरून विरोधकांच्या आक्रमक भूमिकेने विधान परिषदेचे कामकाज लागोपाठ दुसऱ्या दिवशी बंद पडले. या विषयावर चर्चा व सरकारचे उत्तर होऊनही विरोधकांचे समाधान झालेले नाही. विधान परिषदेत विरोधकांनी कलंकित मंत्र्यांचा विषय लावून धरला असला तरी विधानसभेचे कामकाज सुरळीत सुरू आहे. कलंकित मंत्र्यांपेक्षा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हा सारा खेळ सुरू असल्याचे विरोधकांच्या गटाचा कानोसा घेता समजते. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती (आता रिक्त) आणि विरोधी पक्षनेतेपद ही सर्व महत्त्वाची पदे राष्ट्रवादीकडे होती. परिणामी वरिष्ठ सभागृहाच्या कामकाजावर राष्ट्रवादीचा पगडा होता. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे विधान परिषदेत आगमन झाल्यापासून सारेच संदर्भ बदलले. राणे यांच्या आक्रमक तोफेमुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे किंवा अन्य नेत्यांना प्रसिद्धीच मिळेनाशी झाली. सारे राणे किंवा काँग्रेसच्या कलाने पहिल्या आठवडय़ाचे कामकाज झाले. आपले काही अस्तित्व जाणवत नाही याचे शल्य राष्ट्रवादीला होते. यातूनच राष्ट्रवादीने काँग्रेसवर कुरघोडी करण्याकरिता कामकाज लागोपाठ दोन दिवस रोखल्याची चर्चा आहे. साहजिकच प्रसिद्धी राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली. कामकाज होऊच द्यायचे नाही या राष्ट्रवादीच्या खेळीला काँग्रेसचा विरोध होता. पण दोन दिवस प्रसिद्धीचा झोत आपल्यावर राहील याची पुरेपूर खबरदारी राष्ट्रवादीने घेतली. छगन भुजबळांसारखा नेता तुरुंगात किंवा अन्य नेत्यांवर गैरव्यवहारांच्या आरोपांवरून चौकशीची टांगती तलवार असताना भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अचानक आक्रमक होण्यामागे स्वार्थापेक्षा परमार्थच जास्त होता.

फायबर व्याघ्रप्रेम’!

‘जबडय़ात घालुनी हात मोजतो दात, जात ही अमुची’ असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिल्यापासून सत्तेतील वाघ-सिंहाचे सख्य काहीसे बिघडले होते. मात्र मध्यंतरी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाघाची फायबरची प्रतिकृती भेट देण्यासाठी ‘मातोश्री’ गाठली, आणि वाघाला चुचकारले. ‘वाघ वाढले पाहिजेत’, असे उद्धव ठाकरे म्हणाले आणि मुनगंटीवारांनी मान हलवून त्याला पाठिंबाही दिला. एकंदरीत, वाघांना चुचकारण्याचे दिवस राज्यात सुरू झाले आहेत. आता तर चक्क मंत्रालयातच एका उमद्या वाघाची प्रतिकृती विराजमान झाली आहे. मंत्रालयात येणाऱ्या कोणासही या नकली वाघासोबत सेल्फी काढण्याचीही मुभा देण्यात येणार आहे. वाघाशी कसेही वागा, तो शांतपणे सेल्फी काढू देईल, असा संदेश तर सरकार जनतेला देत नाही ना, अशी कुजबुज लगेचच सुरू झाली आहे. वनमंत्री मुनगंटीवार तर वाघांच्या प्रदेशातच वावरणारे असल्याने, फायबरचे वाघ उपद्रवकारक नाहीत, या खात्रीनेच मंत्रालयाच्या उघडय़ा प्रांगणात वाघाला जागा दिल्याचे बोलले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 1:46 am

Web Title: loksatta kujbuj 6
Next Stories
1 नागपूरची श्रेया तिवारी आणि नांदेडचा संघशील भद्रे ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते
2 Bjp and Shiv Sena alliance: भाजपला शह देण्यासाठी सेनेची भीमशक्तीशी नवी जवळीक!
3 ‘लोढा’च्या संचालकांविरूध्द भाडेकरू न्यायालयात!
Just Now!
X