ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची उपस्थिती; महाअंतिम फेरीत आठ एकांकिकांचे सादरीकरण

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या दुसऱ्या पर्वाचा महाअंतिम प्रयोग शनिवारी, १७ ऑक्टोबरला प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात रंगणार आहे. राज्यभरातून प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी अशा चाळणीतून कठोर मेहनत घेऊन महाअंतिम फे रीपर्यंत धडक मारलेल्या नाटय़वेडय़ा तरुणाच्या पाठीवर ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्याकडून शाबासकीची थाप मिळणार आहे.
‘यातनाघर’, ‘वासनाकांड’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘युगान्त’ सारखी सरस आणि वेगळ्या पठडीतील नाटक देणारे नाटककार महेश एलकुंचवार यांच्याकडून या विद्यार्थ्यांना नाटय़ाविष्काराचे नवे धडे गिरवायला मिळणार आहेत. याशिवाय, मराठी चित्रपट-नाटय़ वर्तुळातील अनेक नामांकित चेहरे या महाअंतिम फे रीसाठी उपस्थित राहणार आहेत.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत व ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेसाठी ‘अस्तित्व’ संस्थेचेही महत्त्वाचे योगदान लाभले आहे. पॉवर्ड बाय ‘केसरी’ ‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम फेरीच्या प्रवेशिका १६ ऑक्टोबरपासून रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे उपलब्ध होणार आहेत. स्पर्धेसाठी टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’चे सहकार्य लाभले आहे. ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे या कार्यक्रमाचे टॅलेण्ट पार्टनर तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी झाले आहेत.
आठ शहरांमधून तरुणाईच्या कल्पक नाटय़ाविष्काराशी जोडली गेलेली ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबईच्या ‘एक्सप्रीमेंट’पासून नागपूरच्या ‘विश्वनटी’पर्यंत विविधांगी विचार मांडणाऱ्या आठ शहरांच्या आठ एकांकिकांचा सामना महाअंतिम फेरीत होणार आहे. या वर्षी औरंगाबादमधून ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाली होती. त्यानंतर नागपूर, रत्नागिरी, नगर, नाशिक, पुणे, मुंबई आणि ठाणे अशा आठ शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडली. राज्यभरातून १३३ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.
प्रत्येक महाविद्यालयाची एकेक एकांकिका हे गणित आजमावता १३३ एकांकिकांशी लढत देऊन या आठ एकांकिका महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या आहेत. गेल्या वर्षी ‘लोकांकिका’चा बहुमान पुण्याच्या आयएलएस विधी महाविद्यालयाने ‘चिठ्ठी’ या एकांकिकेसाठी पटकावला होता. पुण्यासह रत्नागिरी आणि मुंबईच्या महाविद्यालयांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले होते. ‘लोकांकिका’च्या दुसऱ्या पर्वात ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ होण्याचा बहुमान कोणाला मिळणार याचे उत्तर शनिवारी महाअंतिम फेरीत मिळणार आहे.

महाअंतिम फेरीत सादर होणाऱ्या
आठ एकांकिका
ठाणे : ज्ञानसाधनाची ‘मित्तर’
नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाची ‘व्हॉट्सअॅप’
मुंबई : म. ल. डहाणूकर महाविद्यालयाची ‘एक्सप्रीमेंट’
पुणे : ‘जार ऑफ एल्पिस’
नागपूर : विठ्ठलराव खोब्रागडे महाविद्यालयाची ‘विश्वनटी’
औरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठ नृत्यविभागाची ‘भक्षक’
नगर : पेमराज सारडा महाविद्यालयाची ‘ड्रायव्हर’
रत्नागिरी :गोगटे जोगळेकरची ‘महा भोग’