एकांकिकेच्या विषयाचे बीज येतं लेखकाकडून. वर्षोनवष्रे हे बीज उराशी बाळगून संहितेच्या पटलावर लेखक प्रसुत होतो. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या निमित्ताने विषयाच्या बीजापासून संहितेच्या अंतिम ‘ड्राफ्ट’पर्यंतचा प्रवास लेखक मांडत आहेत. मुंबई विभागीय अंतिम फेरीत निवड झालेल्या सहा एकांकिकांच्या लेखकांच्या या अभूतपूर्व प्रवासाविषयी..

..तर पात्राचा पाठलागही करते

अनेक मित्रांकडून ब्रेकअपच्या कहाण्या ऐकल्या. दरवेळी नातेसंबंधात मुलगा चुकीचा आहे, अशीच समजूत असते. मात्र मुलींनाही अनेकदा कमिटमेंट नको असते. त्यांनाही कुठल्याच बंधनात राहण्याची इच्छा नसते, हे मित्रांशी बोलताना लक्षात आले. साधारण दीड वर्षांपूर्वी ही एकांकिका लिहिली होती. एकदा गोरेगावच्या फिल्म सिटीत गेले होते. काम झाल्यानंतर सीसीडीत कॉफी पिण्यासाठी गेले. अनेक दिवस हा विषय डोक्यात होता. त्या वेळी मला सुचतेय असे जाणवले आणि मी पटकन लॅपटॉप उघडला आणि लिहायला सुरुवात केली. साधारण साडेतीन तासांत एकांकिका लिहून पूर्णही झाली. त्यानंतर अनेक महिन्यांनी कीर्ती महाविद्यालयासाठी एकांकिकेबद्दल विचारणा करण्यात आली. एकांकिका तयार असली तरी त्यात बदल करण्याची गरज वाटली. सुरुवातीला एकांकिकेचे नाव ‘रॅपिड फायर’ होते. मात्र ते बदलून ‘लास्ट ट्राय’ करण्यात आले. आधी एकांकिकेत किशोरवयीन मुलांच्या भूमिका होत्या. मात्र दुसऱ्यांदा अधिक परिपक्वता यावी यासाठी मुलांचा वयोगट वाढवला.

विचारांच्या अफाट वेगाशी हस्तलिखिताचा ताळमेळ जुळत नाही. त्यामुळे चिडचिड होते. म्हणून लॅपटॉप सोयीचा वाटतो. एकांकिकाच नव्हे तर कुठल्याही लिखाणासाठी अनुभव खूप महत्त्वाचा असतो. आजही रस्त्यावर चालणारे एखादे पात्र आवडले तर मी त्या व्यक्तीचा पाठलागही करते. त्यानंतर आपल्या निरीक्षणशक्तीच्या जोरावर पात्रं उभी करतो. ‘लास्ट ट्राय’बाबतही तेच झाले आहे.

– स्वरदा बुरसे, (लास्ट ट्राय- कीर्ती महाविद्यालय)

‘ओवी’साठी जादूही शिकलो

कॅलिफोर्नियातील एका मुलीचा ब्लॉग माझ्या वाचनात आला. स्क्रिझोफेनियाने त्रस्त असलेल्या शालेय मुलीचे ते अनुभवकथन मला भावले. मी मानसिक आजारावरील पुस्तके वाचली. त्यात अच्युत गोडबोले यांचे ‘मनात’ हे पुस्तकही होते. माणसाने मनातील भीती दूर केली तर मानसिक आजार कमी होतात, असा संदर्भ होता. त्याचाच वापर मी एकांकिकेत केला. मी यापूर्वी दिग्दर्शन केले आहे. लेखक म्हणून फार अनुभव नाही. मात्र या वेळी मी स्वत:च लिहिण्याचे ठरवले. एक-दीड महिन्यात एकांकिका लिहून झाल्यानंतर साठय़े महाविद्यालयासोबत ती सादर करण्याचे निश्चित केले.

मानसिक आजाराबरोबरच याला भयपटाची जोड देता यावी यासाठी जादूही शिकलो. जादूच्या अनेक चित्रफिती पाहिल्या. लेखक आणि दिग्दर्शक या दोन्ही बाजू एकाच वेळी सांभाळायची असल्याने सर्व बाजूंनी अभ्यास सुरू केला. माझी लिखाणाची पद्धत वेगळी आहे. आधी मी घटना बांधतो आणि त्यानंतर संवाद लिहितो किंवा दुसऱ्याला सांगतो. मला संहितेचा प्रसंग सुचला की मी लगेच लिहून काढतो. बऱ्याचदा विषय सुचला की लगेच मोबाइलवर ते टाइप करतो आणि नंतर लॅपटॉपवर ‘ड्राफ्ट’ करतो. यासाठी रात्रीची वेळ ठरलेली असते. घरात सर्वजण झोपल्यावर मी एकांकिका लिहायला घेतो. एके ठिकाणी टक लावून बघत राहणे किंवा फेऱ्या मारत असताना मला सुचतं आणि रात्रीतूनच ते लिहून काढतो. ‘ओवी’ हा भयपट असल्यामुळे यामध्ये वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्यात आल्या आहेत आणि प्रत्येक प्रयोगाला वेगळी जादू दाखविण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.

– अनिकेत पाटील, (ओवी-साठय़े महाविद्यालय)

मुंबई-पुणे प्रवासात ‘माइक’ला आवाज मिळाला

‘माइक’मध्ये रंगमंचावर एक व्यासपीठ उभं करण्यात आले आहे. शोषितांनी तयार केलेल्या या संरचनेचा आवाज ऐकला जात नाही ही सद्य:स्थिती आहे. एकदा अहमदनगरमध्ये राजकीय सभा ऐकण्यासाठी गेलो होतो. व्यासपीठावरील नेत्याचे भाषण जातिद्वेष निर्माण करणारे होते. त्याच वेळी मला ‘माइक’ची कथा सुचली. तो जिथे उभा आहे ते व्यासपीठ तयार करणाऱ्या कामगारांची कथा धर्म आणि जातिभेदाच्या पलीकडे आहे. यावर एकांकिका करण्याचे नक्की झाल्यावर स्टेज बांधणाऱ्या कामगारांशी अनेकदा गप्पा मारल्या. त्यातून त्यांची पाश्र्वभूमी समजून घेतली. यामध्ये वेगवेगळ्या जातिधर्माची माणसे असतात. त्यांचे स्वत:चे वेगळे विश्व आणि समस्या असतात. माणूस संरचना निर्माण करताना जातिधर्माचा विचार करीत नाही. मात्र स्वत:ला समाजाचा कैवारी समजणारे पुढारी याचा वापर राजकीय खेळीसाठी करतात. ही एकांकिका राजकीय व्यवस्थेवर नकळत भाष्य करणारी आहे.

‘माइक’ ही एकांकिका मुंबई ते पुणे बस प्रवासात लिहिली. खूप प्रवास करत असल्याने बहुतांश लिखाण प्रवासात होते. तेव्हा तुम्ही शांत असता. या दरम्यान माझा लॅपटॉप कायम सुरू असतो. विषय खूप साधा असल्यामुळे याला किती यश मिळेल याबाबत शंका होती. मात्र स्पर्धेत आल्यावर तिचे खूप कौतुक झाले.

– संदीप दंडवते, (माइक – टी. के. टोपे महाविद्यालय)

कुठेही बसून लिहू शकतो

एकांकिका लिहायला घेतली तेव्हा राजकीय परिस्थितीवर भाष्य करावे, असे डोक्यात नव्हते. पोलिसांचे पात्र निवडले आणि त्यानुसार सध्या महत्त्वाच्या असणाऱ्या घटनांचा अभ्यास सुरू केला. या वेळी विद्यार्थी चळवळ, रोहित वेमूला प्रकरण, राजकीय नेत्यांचे घोटाळ्यांची चर्चा होती. यावर वेगळ्या पद्धतीने भाष्य करता येईल असे वाटले. सरळ संहिता पूर्ण करण्याऐवजी आम्ही एक घटना ठरवतो, त्यावर चर्चा होते आणि प्रसंग बसवितानाच संहिताही लिहिली जाते. यामुळे कथेत आणि प्रसंगात लवचीकता राहते. साधारणपणे विषय सुचला की कागदावर उतरवतो. संहिता लिहिताना याचा उपयोग होतो. मी कुठेही बसून लिहू शकतो. त्यासाठी शांततेची गरज वाटत नाही. ही एकांकिकाही सुचेल तशी टिपून ठेवली होती. चर्चा करून त्याचे संवाद लिहिले.

– तुषार जोशी, (केस नं.. – म. ल. डहाणूकर महाविद्यालय)

‘ही कथा माझ्या आईचीच’

आठवीपासून घराजवळील पारशी कॉलनीतील ग्रंथालयात बसून मी अभ्यास केला. इथेच मी ‘श्यामची आई’ ही एकांकिकाही अवघ्या तीन दिवसांत लिहिली. तिचे अनेक स्पध्रेत खूप कौतुक झाले असले तरी त्याच्या निखळ आनंदापासून मी मुकलो आहे. कारण ती माझ्या आईची कथा आहे. तो विषय माझ्या आयुष्यातलाच आहे. काही वर्षांपूर्वी आईला आकडीचा त्रास सुरू झाला होता. औषधांचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होत असल्यामुळे तिच्या वागणुकीतील बदल जाणवत होता. ती खूप हट्टी झाली. लहान मुलांची निरागसता तिच्यात उतरली असली, तरी आईचा ‘बालहट्ट’ कसा घ्यावा हेच कळत नव्हते. मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवणारी आई खूप चिडचिडी झाली होती. त्यामुळे घरातील वातावरणही बदलले होते.

सिडनॅहमसाठी मी यापूर्वीही अनेक एकांकिका लिहिल्या आहेत. यंदाच्या वर्षी आयएनटी दहा दिवसांवर असताना हातात चांगला विषय नसल्यामुळे आपण सहभागी व्हायचे नाही असं सर्वानी ठरवलं होतं. महाविद्यालयाच्या कट्टय़ावर चर्चा झाल्यानंतर विचार करतच घराच्या दिशेने चालू लागलो. अचानक आईचा विषय डोक्यात आला आणि या विषयावर एकांकिका करण्याचे ठरवले. दहा दिवसांत एकांकिका लिहून बसविणे कठीण होते. मात्र आम्ही हे आव्हान पेलले. तीन दिवसांत एकांकिकेचा अंतिम ड्राफ्ट पूर्ण झाला. आम्ही चाळीत राहतो आणि त्यात घरात कायम तणावाचे वातावरण असल्यामुळे नेहमी लायब्ररीत जाऊन लिहितो. संहिता लिहिताना फार वेळ लागला नाही. कारण ही कथा माझ्यात आयुष्यातील असल्यामुळे एकांकिकेतील पात्रही डोळ्यासमोर स्पष्ट होते. नाटकाच्या गरजेनुसार काही घटनांमध्ये बदल करण्यात आला. मात्र कलाकारांच्या अभिनयामुळे ‘श्यामची आई’ जिवंत झाली. प्रेक्षकांना ही एकांकिका आपल्या घरातली वाटते. सर्वानी ‘श्यामची आई’ला उचलून धरलं. त्यावर माझी मुलाखतही आली. मात्र यातून मला निखळ आनंद कधी मिळालाच नाही. कारण ती माझ्या आईची आहे. यात माझं स्वत:च असं काही नाहीच.

– स्वप्निल जाधव, (श्यामची आई – सिडनॅहम महाविद्यालय)

(संकलन आणि शब्दांकन – मीनल गांगुर्डे)