महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामध्ये आपले वेगळेपण सिद्ध करत नाटय़वेडय़ा तरुणाईच्या मनात घर केलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या अनोख्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचे बिगूल वाजले आहे. या पाचव्या पर्वाच्या प्राथमिक फेरीला १ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

आजूबाजूला अनेक राजकीय, सामाजिक घटनांनी जोर धरला आहे. अनेकदा या घटना, त्याचे समाजमनावर होणारे परिणाम आणि विशेषत: तरुणाईच्या त्याच्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया एकांकिकांमधून फार प्रभावीपणे उतरताना दिसतात. आताही ‘मी टू’पासून ते पुढच्या वर्षीच्या निवडणुकांपर्यंत अनेक विषय तरुणाईला खुणावत असतील यात शंका नाही. तुमच्या या विचारांना एकांकिकेच्या नाटय़ातून वळणवाट देत लोकांपर्यंत पोहोचविण्याची अनोखी संधी सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’च्या निमित्ताने तुमच्यासमोर आहे. तरुण सर्जनशील मनांचे विचारप्रतिबिंब रेखाटणारा ‘लोकांकिकां’चा हा कॅनव्हास फक्त तेवढय़ापुरताच मर्यादित राहत नाही. तर कधी अभिनयाच्या, दिग्दर्शनाच्या, लेखनाच्या किंवा नेपथ्याच्या माध्यमातून उमटणारी ही तरुण सर्जनशील प्रतिभा त्या क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर ठेवण्याची संधी ही ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या माध्यमातून महाविद्यालयीन स्पर्धकांना मिळते. गेल्या चार वर्षांत असे अनेक तरुण कलाकार या स्पर्धेने टेलीव्हिजन आणि चित्रपट विश्वाला दिले आहेत. या स्पर्धेचे हे वैशिष्टय़च त्याचे वेगळेपण ठरले आहे.

राज्यभरातील आठ शहरांमधल्या, तिथल्या गावागावातून महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुण मनांना ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत व्यक्त होता येणार आहे. १ डिसेंबरपासून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर आणि कोल्हापूर अशा आठ विभागांतून स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात होणार असून स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. स्पर्धेच्या नेहमीच्या स्वरूपाप्रमाणे याहीवर्षी प्राथमिक फेरी, विभागीय अंतिम फेरी आणि त्यानंतर महाअंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करून ‘लोकसत्ता लोकांकिका’चा बहुमान मिळवण्यासाठी स्पर्धकांना चुरशीचा सामना करावा लागणार आहे. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’साठी सुरुवातीपासूनच टॅलेंट सर्च पार्टनर म्हणून बरोबर असलेले ‘आयरिस प्रॉडक्शन’ याही वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर चमकणाऱ्या कलावंतांना रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी देणार आहेत.