रंगभूमीवरील मातब्बरांसह अभिनेते मनोज वाजपेयी यांची खास उपस्थिती

रंगभूमी आणि चित्रपटांतील भविष्यातील तारे घडविणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची महाअंतिम फेरी  माटुंग्याच्या यशवंत नाटय़गृहात आज, शनिवारी रंगणार असून, त्यातून राज्याची लोकांकिका निवडली जाईल. यानिमित्ताने मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीतील मातब्बर कलाकार, दिग्दर्शक, निर्माते स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहणार असून प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.

राज्यभरातील शंभर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण नाटय़ाविष्कारातून सर्वोत्तम ठरलेल्या आठ एकांकिका या महाअंतिम नाटय़संग्रामात सादर होणार आहेत.

‘सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘पितांबरी’ सहप्रायोजित, पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ यांच्या सहकार्याने रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ या स्पर्धेचा भव्यदिव्य महाअंतिम सोहळा शनिवारी (१५ डिसेंबर) माटुंगा येथील यशवंत नाटय़गृहात सकाळी ९.३० पासून सुरू होईल.

मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालय- आनंद भवनची ‘देव हरवला’, ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘चौकट’, पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयाची ‘आशा’, नाशिकची एचपीटी, आर्ट्स आरवायके सायन्स महाविद्यालयाची ‘चलो सफर करे’, नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयाची ‘गटार’, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्यविभागाची ‘मादी’, कोल्हापूरच्या राजाराम बापू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाची ‘कस्तुरा’ आणि रत्नागिरीतील स. ह. केळकर महाविद्यालयाची ‘फुगडी’ या आठ एकांकिका महाअंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. त्यांच्यात ‘लोकसत्ता लोकांकिका’ हा बहुमान मिळवण्यासाठी नाटय़संग्राम रंगणार आहे.

या वेळी प्रथमच मनोज वाजपेयी हा नावाजलेला अभिनेता हा सोहळा अनुभवण्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. तरुण रंगकर्मीचा जल्लोष, नाटय़-चित्रपट वर्तुळातील जाणकारांची उपस्थिती आणि रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने हा नाटय़संग्राम रंगणार आहे. नाटय़पंढरीत गेल्या चार वर्षांत दर्जेदार आणि लोकप्रिय एकांकिका स्पर्धा म्हणून लौकिक मिळवणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेचा पाचव्या पर्वाचा हा शेवटचा अंक म्हणूनच स्मरणीय ठरणार आहे.

या स्पर्धेसाठी टॅलेन्ट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी ‘झी मराठी’ हे टेलिकास्ट पार्टनर आणि ‘एबीपी माझा’ न्यूज पार्टनर आहे.

  • कुठे : यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा, मुंबई</li>
  • कधी : आज, सकाळी ९.३०पासून.
  • प्रवेश : प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. प्रवेशिका कार्यक्रमस्थळी अर्धा तास आधी.